Tuesday, 25 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिरात ध्वजारोहण

·      देशाचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा शपथविधी

·      युवकांच्या माध्यमातून समाजात तसंच राजकारणात परिवर्तन शक्य, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      समाजाच्या मुख्य धारेत परतण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सशस्र कारवाई थांबवण्याचं नक्षलवाद्यांचं सरकारला आवाहन

आणि

·      ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतल्या राम मंदिराला भेट देणार आहेत. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून राम मंदिराच्या कळसावर त्यांच्या हस्ते औपचारिक ध्वजारोहण होईल. सप्त मंदिर, शेषावतार मंदिर, तसंच माता अन्नपूर्णा मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत.

****

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी काल शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. न्यायमूर्ती सूर्य कांत संवैधानिक, आणि दिवाणी कायदेक्षेत्रातले तज्ज्ञ असून २०१९ पासून  सर्वोच्च न्यायालयात न्यायदान करत आहेत. सरन्यायाधीशपदाचा त्यांचा कार्यकाळ १५ महिन्यांचा असेल.

****

नव तरूणाईच्या माध्यमातून समाजात तसंच राजकारणात परिवर्तन शक्य असल्याचं मत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. इंडियाज इंटरनॅशनल मुव्हमेंट टू युनायट नेशन्स अर्थात आय आय एम यू एन च्या यूथ कनेक्ट या संवाद सत्रात ते काल बोलत होते. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपचे ४० टक्के उमेदवार हे तरुण असतील, असं फडणवीस यांनी सांगितलं. अटल सेतू, मुंबईतील सागरी किनारा मार्ग आणि मेट्रोसारखे प्रकल्प ही फक्त सुरूवात असून, येत्या पाच वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापलट केला, जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री इंटर्नशीप योजनेमुळे अनेक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी मदत झाल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

सशस्त्र संघर्ष सोडून समाजाच्या मुख्य धारेत येण्याची इच्छा व्यक्त करत, नक्षली संघटनेच्या एमएमसी झोन अर्थात महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड प्रदेश समितीने १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरक्षा दलांची कारवाई स्थगित करावी अशी मागणी केली आहे. या संघटनेनं आपल्या मागणीचं पत्रक तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे जारी केलं आहे.

****

गेल्या आठवड्यात लागू झालेल्या नवीन कामगार कायद्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुविधा तसंच सुलभता प्राप्त होणार आहेत. भारतीय जनता मजदूर सेलच्या राज्य प्रदेशाध्यक्ष ज्योती सावर्डेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली…

बाईट- ज्योती सावर्डेकर

****

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीमध्ये बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे. या महोत्सवात काल एआय हॅकेथॉन सादरीकरण झालं. इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र येऊन नावीन्यपूर्ण एआय-आधारित प्रणाली तयार करणार आहेत.

****

ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण धर्मेंद्र यांचं काल दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं, ते एकोणनव्वद वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. शोले, चुपके चुपके, सीता और गीता, ड्रीम गर्ल, दी बर्निंग ट्रेन, मेरा नाम जोकर, अपने, लाईफ इन अ मेट्रो, अशा अनेक सिनेमांमधून आपल्या अभिनयाची अमिट छाप रसिकांच्या मनावर उमटवणारे धर्मेंद्र यांनी लोकसभेत राजस्थानातल्या बिकानेर मतदार संघाचं प्रतिनिधीत्वही केलं होतं. धर्मेंद्र यांच्या सहा दशकांच्या प्रर्दीर्घ कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेणारा हा वृत्तांत..

‘‘आठ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबातल्या लुधियाना जिल्ह्यात जन्मलेले धर्मसिंह देओल उर्फ धर्मेंद्र यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या एका स्पर्धेतून चित्रपट निर्मात्यांचं लक्ष वेधून घेतलं. १९६० साली दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. प्रारंभीच्या काळात दुल्हन एक रात की, बहारें फिर भी आयेगी, अनपढ, फुल और पत्थर.. अशा अनेक चित्रपटातून विविध भूमिका साकाररलेल्या धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत झालेली अनेक गाणीही प्रचंड लोकप्रिय ठरली.

सत्तरच्या दशकात धर्मेंद्र यांनी अनेक ॲक्शनपटातून काम करत, हिंदी चित्रपटातली चॉकलेट हिरोची चौकट मोडून ही मॅन ही आपली नवी ओळख निर्माण केली. धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिनय केलेला शोले हा चित्रपट सार्वकालिक प्रसिद्ध चित्रपट म्हणून ओळखला जातो. १९९७ साली फिल्मफेयरच्या वतीने धर्मेंद्र यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, तर केंद्र सरकारनेही पद्मभूषण पुरस्काराने धर्मेंद्र यांचा गौरव केलेला आहे.’’

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात, वैविध्यपूर्ण भूमिका करणारा लखलखता तारा निखळल्याची भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली.

छत्रपती संभाजीनगर इथले माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी धर्मेंद्र यांच्या तत्कालीन औरंगाबाद भेटीला उजाळा देत, त्यांच्या उमद्या स्वभावाबद्दलच्या आठवणी समाज माध्यमावरून सामायिक केल्या.

****

शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातून गेल्या दोन दिवसात एकूण १८ जणांना अटक केली. रविवारी रात्री सात तर काल आणखी ११ आरोपींना अटक करण्यात आली. सगळ्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

****

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल तुळजापूर इथं मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत निघालेल्या या फेरीत विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती बाबत घोषणा देत, फलक तसंच सेल्फी पॉईंटद्वारे मतदारांचं प्रबोधन केलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथल्या नूतन विद्यालयात स्वीप मतदार जागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी ‘वोट फॉर सेलू’ अशी भव्य मानवी साखळी करून लोकशाही बळकटीकरणाचा सामुदायिक संदेश दिला. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह चव्हाण, यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केलं.

****

जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी काल परतूर इथं भेट देत नगरपंचायत निवडणुकीसंबंधी तयारीचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश त्यांनी यवेळी दिले.

****

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय महिला बालविकास विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. बालकामगार सर्वेक्षण, बालभिक्षेकरी पुनर्वसन आणि बाल आरोग्य तपासणी बरोबरच बालस्नेही ग्रामपंचायत विकसित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पुढाकार घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

****

हवामान

बीड इथं काल राज्यात सर्वात कमी १४ अंश तापमानाची नोंद झाली. जळगाव इथं १५ पूर्णांक एक, अहिल्यानगर – १५ पूर्णांक सात, परभणी – १७, छत्रपती संभाजीनगर – १७ पूर्णांक चार, तर धाराशिव इथं १८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: