Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०४ मार्च २०१९ दुपारी १.०० वा.
****
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम प्रतिनिधीत्वाला समर्थनाचा
फ्रान्सनं पुनरुच्चार केला आहे. पुनर्गठीत होत असलेल्या या परिषदेत, भारत, जपान आणि
जर्मनीच्या कायमस्वरुपी सहभागासह संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा विस्तार, हा परिषदेच्या
पुनर्गठनाचा महत्त्वाचा पहिला टप्पा ठरेल, असं फ्रान्सनं म्हटलं आहे.
****
राज्य सरकारनं धनगर समाजाला सवलती घोषित केल्यानंतर
आता बंजारा समाजानं देखील आपल्या आरक्षणा सोबतच इतर मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू केला
आहे. महसूल राज्यमंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी सरकारनं बंजारा आरक्षणाबाबत
ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे असं म्हटलं आहे.
****
विद्यापीठांमधल्या
विद्यार्थ्यांच्या तक्रारींचं निराकरण कारण्यासाठी, राज्य सरकार, कृषी विद्यापीठांव्यतिरिक्त,
इतर सर्व विद्यापीठांमध्ये लोकपालांची नियुक्ती करणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे
यांनी ही माहिती दिली. ही नेमणूक येत्या दोन ते तीन महिन्यात केली जाईल, विद्यापीठांमध्ये
लोकपालाची नियुक्ती करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य असेल, असं तावडे यांनी सांगितलं.
****
एसटी
महामंडळाच्या वतीनं पंढरपूर इथं, ३३ कोटी रुपये खर्च करुन भव्य भक्तनिवास
आणि सुसज्ज असं बसस्थानक बांधण्यात येणार आहे. हे
भक्त निवास, वारकरी संप्रदायाच्या प्रथा, परंपरेला
समर्पित करत असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. हे
भक्त निवास आणि नियोजित
बसस्थानकाचं भुमिपूजन, संत नामदेवांचे वंशज माधव महाराज
नामदास, संत एकनाथांचे वंशज रावसाहेब गोसावी महाराज आणि संत
तुकारामांचे वंशज संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
महाशिवरात्रीचा उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. हिंगोली जिल्ह्यात
औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे
वार्ताहर ...
महाशिवरात्रीच्या निमित्ताने
देवस्थान समितीच्या वतीने २ मार्च ते ९ मार्च पर्यंत वार्षिक उत्सवाचे आयोजन केले आहे.
पर्व काळास प्रारंभ होताच, रात्री १२.३० वाजता, खासदार राजीव सातव, आमदार डॉ. संतोष
टारफे, संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार पांडुरंग माचेवाल यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात
आला. रात्री २ वाजेनंतर मंदीर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आले आहे.
दोन दिवस सुट्टया असल्याने, देशभरातून भक्त औंढ्यात दाखल झाले आहेत. अन्नदान व उपवासाच्या
फराळाची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली
आहे. आकाशवाणी बातम्यासाठी रमेश कदम, हिंगोली.
****
एनरॉन प्रकल्पाप्रमाणे नाणार प्रकल्प
पुनरुज्जीवीत केला जाणार नाही, अशी अपेक्षा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण
यांनी व्यक्त केली आहे. ते काल नांदेड इथं पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना भाजप युतीवर
शिक्कामोर्तब करताना, मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रिया रद्द
करण्याची अधिसूचना काढली. अशाच प्रकारचा निर्णय शिवसेना भाजपनं १९९५ साली एनरॉन बाबत
घेतला होता, मात्र सत्तेत येताच, युतीनं हा प्रकल्प पुनरुज्जीवीत केला, याकडे चव्हाण
यांनी लक्ष वेधलं. चव्हाणांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेच्या प्रवक्त्या
अर्चना कायंदे यांनी, शिवसेना, नाणार प्रकल्पाची अवस्था, एनरॉन किंवा आदर्श गृहनिर्माण
संस्था घोटाळ्यासारखी होऊ देणार नाही, असं नमूद केल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे.
****
भारत आणि इंग्लड महिला क्रिकेट संघादरम्यान, गुवाहाटी
इथं सुरु असलेल्या, टी ट्वेंटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर १६१
धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन षटकात दोन बाद
२३ धावा झाल्या होत्या.
*****
***
No comments:
Post a Comment