Saturday, 23 March 2019

Tex - AIR News Bulletin Aurangabad 23.03.2019......18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 March 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मार्च २०१९ सायंकाळी ६.००

****

राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारमधल्या लोकसभेच्या जागांसाठी ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये भाजपनं सध्याच्या सात खासदारांना उमेदवारी नाकारली असून यात शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. भाजप, संयुक्त जनता दल आणि लोकजन शक्ती पक्षाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. पटना साहिब या जागेसाठी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना नावडा ऐवजी बेगुसरायमधून, केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह पूर्व चंपारणमधून तर अश्विनी कुमार चौबे यांना बुक्सार इथून उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी हाजीपूरमधून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान ऐवजी त्यांचे बंधू पशुपतीकुमार पारस हे निवडणूक लढवणार आहेत.

****

दिव्यांग मतदारांसाठी मतदान करणं सोयीचं व्हावं म्हणून निवडणूक आयोगानं पी डब्ल्यू डी हे नवीन ॲप तयार केलं आहे. या ॲपद्वारे दिव्यांगांसाठी मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हिलचेअरची मागणी इ. सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. या वर्षी राज्यात दोन लाख २४ हजार दिव्यांग मतदारांची संख्या आहे.

****

लातूर मतदार संघात भारतीय जनता पक्षाकडून सुधाकर श्रृंगारे, काँग्रेसकडून मच्छिंद्र कामंत तर वंचित बहुजन आघाडीतर्फे राम गारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपनं लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे.

जालना लोकसभा मतदार संघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार खासदार रावसाहेब दानवे आणि काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यात सरळ लढत होणार आहे. दानवे यांच्या विरोधात औताडे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

धुळे इथं आज शिवजयंतीनिमित्त जमलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपने उमेदवार म्हणून डॉ.सुभाष भामरे यांना बदललं तरच भाजपचा प्रचार करु असा इशारा दिला आहे.

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या अजनाळे शिवारातील पेट्रोल पंप चालकाविरुध्द शासकीय योजनेचा फलक न काढल्याबद्दल आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज कै.अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा घेण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघातून पक्ष कोणताही असो मात्र मतदान फक्त माथाडी नेत्यालाच करा, असं आवाहन माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी यावेळी केलं. या मेळाव्याला आजपर्यंत पहिल्यांदाच कोणत्याही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते.

****

दिल्लीतल्या एका न्यायालयानं फेरा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी देशातून पलायन केलेल्या विजय मल्ल्याची बंगळूरूमधल्या मालमत्तांवर टाच आणण्याचा आदेश दिला आहे. बंगळूरू पोलिसांनी सक्तवसूली संचलनालयाच्या माध्यमातून न्यायालयाच्या अगोदरच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयानं सदरचे नवे आदेश दिले आहेत. १० जुलैपर्यंत या मालमत्तांवर टाच आणण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. गेल्या वर्षी आठ मे रोजी बंगळूरू पोलिस आयुक्तांच्या माध्यमातून मल्ल्याच्या मालमत्तांवर टाच आणून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिल्लीतल्या न्यायालयानं दिले होते.

****

ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे अभ्यासक आणि निरूपणकार प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाठक यांचं आज नाशिक इथं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.  त्यांची २५ पुस्तके, विविध संपादने आणि गौरव ग्रंथामध्ये लिखाण प्रसिद्घ आहे. त्यांच्या चार पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे वांङमय पुरस्कार तसेच संत सेवा पुरस्कार, संत साहित्य पुरस्कार, विष्णुदास कवी पुरस्कार असे विविध पुरस्कारही त्यांना मिळाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

मलेशियातल्या अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेतील भारत आणि जपान यांच्यातील पहिल्या सामन्यात आज भारतीय संघानं जपानवर दोन - शून्य असा विजय मिळवला. वरूणकुमार आणि सिमरनजितनं प्रत्येकी १ गोल करत भारताला २-० असा विजय मिळवून दिला. भारताचा दुसरा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. 

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा २०१९ सालचा प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वांङमय पुरस्कार वसईच्या संगिता अरबुने यांना जाहीर झाला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...