Monday, 4 March 2019

Tex- AIR News Bulletin Aurangabad 04.02.2019 Evining Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 March 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ मार्च २०१९ सायंकाळी ६.००

****

वायूसेनेच्या विमानांनी पाकिस्तानच्या जंगलामध्ये बॉम्ब टाकले असतील, तर पाकिस्तानने त्यावर प्रत्युत्तर का दिलं, असा सवाल वायूसेना प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी विचारला आहे. ते आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. बालाकोटमध्ये आम्ही लक्ष्यावर अचूक प्रहार केला, या कारवाईत किती दहशतवादी ठार झाले, ते मोजण्याचे काम हवाई दल करत नाही. सरकार त्याबाबत माहिती देईल, असं धनोआ म्हणाले.

मिग-२१ बायसन हे पूर्णपणे सक्षम विमान, उच्च गुणवत्तेचं रडार तसंच क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

सशस्त्र सैन्यादलावर आपल्याला अभिमान असला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या जामनगर इथं विविध विकास योजनांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आयुष्मान भारत योजनेबद्दल बोलतांना पंतप्रधानानी, जगातला सगळ्यात मोठा आरोग्य देखरेख कार्यक्रम राबवला जात असून, याअंतर्गत उच्च दर्जाची आरोग्यसेवा गरिबांसाठी उपलब्ध करुन दिल्याचं, सांगितलं.

****

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द आपल्यासाठी अंतिम असल्याचं, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यात कथित वादासंदर्भात आज जालन्यात, खोतकर यांच्या निवासस्थानी, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार दानवे, यांनी, खोतकर यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर खोतकर बोलत होते. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं, सुभाष देशमुख यांनी सांगितलं. तर आपल्यातला वाद मिटला, असं दानवे यांनी स्पष्ट केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

देशाच्या विकासात कामगारांचं महत्त्वाचं योगदान असल्याचं, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी म्हटलं आहे. यवतमाळ इथं आज बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्याचं वाटप करतांना ते बोलत होते. जिल्ह्यात विविध स्तरावर मेळावे घेऊन कामगारांची नोंदणी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

अकोला जिल्ह्यात शहापूरच्या जंगलात एक वाघीण मृतावस्थेत आढळली आहे. अकोल्याचे पोलीस उप अधीक्षक सुनील सोनोने यांनी, ही वाघीण चार ते पाच दिवसांपूर्वी मरण पावल्याची शक्यता वर्तवली आहे. वाघीणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, या तपासणीनंतरच वाघीणीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं, भाविकांनी आज महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, वेतनवाढीच्या मागणीसाठी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे महाशिवरात्रीनिमित्त होणारे जादा कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचं, विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यात परळी इथं, सुमारे चार लाखावर भाविकांनी वैद्यनाथाचं दर्शन घेतल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. महाशिवरात्रीनिमित्तानं राज्याच्या विविध जिल्ह्यांसह परराज्यातल्या भाविकांनीही दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. जालना तसंच परभणी जिल्ह्यातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या १८ हजार बसेसमध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करुन, त्या एलएनजी गॅसवर चालवल्या जाणार आहेत. परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवकर रावते यांनी पंढरपूर इथं ही माहिती दिली. तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला नफ्यात आणण्यासाठी, हा निर्णय घेतला असून, यामुळे दरवर्षी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा नफा होईल, असा अंदाज रावते यांनी व्यक्त केला.

****

पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यात, वैतरणा नदी किनाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं हस्तगत करण्यात आली आहेत. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पालघर पोलिसांनी ही कारवाई केली. या ठिकाणावरून २४ इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि सुमारे साडे आठ किलो स्फोटकं जप्त केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे, एक जेसीबी आणि ट्रकही पोलिसांनी जप्त केला असून, ट्रक मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

गुवाहाटी इथं झालेला पहिला टी ट्वेंटी सामना, इंग्लडच्या महिला संघानं ४१ धावानं जिंकला आहे.

//*************//


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...