Saturday, 23 March 2019

Tex- AIR News Bulletin Aurangabad 23.03.2019......20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 March 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ मार्च २०१९ - २०.००

****

कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षानं आज आपल्या युतीचं जागा वाटप जाहीर केलं. यानुसार कॉंग्रेस २६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागा लढवणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. ५६ राजकीय पक्ष आणि संघटनांनी आघाडीला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

दोन्ही पक्षांनी आपल्याकडचे दोन मतदार संघ मित्र पक्षांना देण्याचा निर्णय घेतला असूल त्यानुसार काँग्रेस पक्ष पालघर मतदार संघ, बहुजन विकास आघाडीला तर अन्य एक मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हातकणंगले मतदार संघ शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यासाठी सोडला असून अमरावती मतदार संघ अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षासाठी सोडणार आहे.

****

भारतीय जनता पक्षानं आज आपल्या आणखी ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात तेलंगणा ६, उत्तर प्रदेश तीन, पश्चिम बंगाल आणि केरळमधल्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं दिल्ली इथं ही माहीती दिली.



दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे भोपाळ मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ही माहिती दिली.



जनता दल धर्मनिरपेक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा तुमकूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचं, आज स्पष्ट झालं. काँग्रेस आणि जनता दलाचे संयुक्त उमेदवार म्हणून ते उद्या नामनिर्देशन पत्र भरणार असल्याचं जनता दलाचे प्रवक्ते रमेश बाबू यांनी सांगितलं.

पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी-पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. उधमपूर आणि जम्मू मतदारसंघांमधून पीडीपीचे उमेदवार निवडणूक लढवणार नसल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

****

राज्यातून काही विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या निर्णयामागे, संबंधित जागा हमखास जिंकून येणं, हाच उद्देश असल्याचं, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत बोलत होत्या. इतर पक्षातून नेते आयात करण्याच्या मुद्यावर बोलताना, मुंडे यांनी, संबंधित नेत्याचं त्या क्षेत्रातलं काम आणि भाजपची विचारधारा स्वीकारण्याला त्याची मंजूरी, यावर असा निर्णय घेतला जातो, असं त्या म्हणाल्या.

भाजपनं आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारीत, चार विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिलेली नाही. यामध्ये अहमदनगरचे दिलीप गांधी, दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण, सोलापूरचे शरद बनसोडे आणि लातूरचे सुनील गायकवाड यांचा समावेश आहे.

****

लातूर मतदार संघात भारतीय जनता पक्षाकडून सुधाकर श्रृंगारे, काँग्रेसकडून मच्छिंद्र कामंत तर वंचित बहुजन आघाडीतर्फे राम गारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. भाजपनं लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे.

धुळे इथं आज शिवजयंतीनिमित्त जमलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, भाजपने उमेदवार बदलला, तरच उमेदवाराचा प्रचार करु असा इशारा दिला आहे. भाजपने धुळ्यातून डॉ.सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे.

****

शिर्डी मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले भाजपचे नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या मतदार संघात काँग्रेसनं भाऊसाहेब कांबळे यांना, तर, शिवसेनेनं सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

****

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या अजनाळे शिवारातील पेट्रोल पंप चालकाविरुध्द शासकीय योजनेचा फलक न काढल्याबद्दल आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

***

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात आज भाजप सेना युतीच्या पदाधिकाऱ्यांचा यवतमाळ इथं मेळावा पार पडला. दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी तसंच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

***

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणं हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष ट्रॅजॅनो डीमेलो यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. भाजपचे मित्र पक्ष असलेल्या दोन पक्षांच्या आमदारांची उपमुख्यमंत्रिपदी नेमणूक करणं म्हणजे मतदारांवर प्रभाव टाकणं असून, निवडणूक आयोगानं या नियुक्ती तात्काळ रद्द कराव्यात, असं या तक्रारीत काँग्रेसनं म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...