आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जुलै २०२० सकाळी ११.००
वाजता
****
आषाढी एकादशी आज सर्वत्र
साजरी होत आहे. कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आपापल्या घरी राहूनच
एकादशी साजरी करावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान पंढरपुरात मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज पहाटे विट्ठल रुक्मिणीची
शासकीय महापूजा केली. यंदा मुख्यमंत्र्यांसोबत या महापूजेचा मान विठ्ठल मंदिरात वीणा
पहारा देणारे वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसया बढे
यांना मिळाला. कोरोना विषाणूच्या संकटातून संपूर्ण जगाला मुक्त करण्याचं साकडं मुख्यमंत्र्यांनी
विट्ठलाला घातलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
१९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात ११५ पुरूष, तर ७७ महिला आहेत. यापैकी ११६
रुग्ण महानगरपालिका हद्दीतले तर ग्रामीण भागातले ७६ रूग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना विषाणू
बाधित २६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ७५३ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज २७ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात आता एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या
५८० झाली आहे. तर आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
परभणी जिल्ह्यात नवे तीन
कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. यात शहरातल्या ममता कॉलनी, रामकृष्ण नगर आणि पाथरी इथल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची संख्या
११८ झाली आहे.
****
कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव
नाशिक शहर पोलीस दलातही झाला आहे. आज इंदिरानगर पोलिस ठाण्यातल्या एका हवालदाराचा या
आजारामुळं मृत्यू झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आकाशवाणीची मराठीतली राष्ट्रीय
बातमीपत्रं आजपासून पुन्हा सुरु झाली. सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी, दुपारी दीड वाजता
आणि रात्री सव्वा नऊ वाजता ही बातमीपत्रं प्रसारित होतील.
****
No comments:
Post a Comment