Wednesday, 1 July 2020

Text - AIR News Bulletin, Aurangbad 01.07.2020....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 July 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जुलै २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; प्रत्येक नागरिकाला पाच किलो धान्य आणि एक किलो हरभरा डाळ देणार.

·      आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल रूख्माईची महापूजा, कोरोना विषाणूच्या महामारीतून जगाला मुक्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विठूरायाच्या चरणी साकडं.

·      मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      राज्यात आणखी चार हजार ८७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण, २४५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      औरंगाबादमध्ये चार तर जालन्यात दोन रुग्णांचा मृत्यू, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणीमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ.

आणि

·      संपूर्ण वीज देयक एकरकमी भरल्यास, देयकात दोन टक्के सूट देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

****

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काल देशवासियांना संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. आगामी काळात येणाऱ्या सण उत्सवादरम्यान देशातला एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेबाबत अधिक माहिती देताना पंतप्रधान म्हणाले –

अस्सी करोड लोगोंका मुफ्त मे अनाज देनेवाली ये योजना अब जुलाई, अगस्त, सितंबर, अक्तुबर, नवंबर भी लागू रहेगी। सरकारद्वारा इन पांच महिनों के लिए अस्सी करोड से ज्यादा गरीब भाई-बहनों को हर महिने, परिवार के हर सदस्य को पांच किलो गेंहू या पांच किलो चावल मुफ्त मुहय्या कराया जाएगा। और साथ ही प्रत्येक परिवार को हर महिने एक किलो चना भी मुफ्त दिया जायेगा। साथियों, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना के इस विस्तार में नब्बे हजार करोड रूपये से जादा खर्च होंगे। और अगर इसमें पिछले तीन महिने का खर्च भी जोड ले तो ये करीब करीब देढ लाख करोड रूपया हो जाता है।

प्रामाणिक करदाते तसंच शेतकऱ्यांच्या योगदानामुळे ही योजना राबवणं शक्य झालं असून, या सर्वांना नमन करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर पाहिला, तर इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. टाळेबंदीसारखे उपाय आणि निर्णय योग्यवेळी घेतल्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले. मात्र आता टाळेबंदी उठवताना नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढताना दिसत असून, ही बाब चिंताजनक असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाचा पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक सर्वांना नियम एकसारखेच आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना विषाणुशी लढण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे, असं आवाहन करतानाच पंतप्रधानांनी, बदलत्या हवामानात नागरिकांनी प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी, कोविड प्रतिबंधासाठी नियमांचं गांभीर्यानं पालन करावं, उद्यापासून सुरू होणाऱ्या अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यातही नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत, आदी सूचना केल्या.

दरम्यान, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. या योजनेत तांदूळ आणि हरभरा डाळ देण्यात येत असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतल्या सुमारे सात कोटी लोकांना याचा लाभ होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल कोरोना विषाणूवर औषध संशोधनासंबंधीची एक आढावा बैठकही पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी या औषधासाठीची चतु:सुत्री नमूद केली. हे औषध परवडणाऱ्या दरात असावं, सर्वांसाठी सहज उपलब्ध असावं, अतिसंवेदनशील वर्गाचा प्राधान्यानं विचार व्हावा आणि या औषधाचं संशोधन तसंच उत्पादन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं निश्चित कालमर्यादेत व्हावं, हे चार मुद्दे ध्यानात ठेवून संशोधनाचं हे राष्ट्रीय कार्य करावं, असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज पहाटे पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. आषाढी एकादशीच्या या महापूजेसाठीचा वारकऱ्यांचा मान यंदा मंदिरात पहारा देणारे विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि त्यांच्या पत्नी अनुसया बढे यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांनीही यावेळी महापूजा केली. या महापूजेनंतर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूच्या संकटातून संपूर्ण जगाला मुक्त करण्याची विठ्ठलाकडे मागणी केली. ते म्हणाले –

मानवानं हात टेकलेले आहेत. आपल्याकडे काही औषध नाही. काही नाही. काही नाही. हे असं तोंडाला पट्टी बांधून किती दिवस, कसं जीवन जगायचं. संपूर्ण आयुष्य असं अडकून गेलेलंय. म्हणून मी साकडं घालतेलंय की लवकरात लवकर नव्हे, माझी तर इच्छा आहे की आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचं संकट नष्ट होवो आणि संपूर्ण जगाला पुन्हा एकदा आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त होवो अशी माझी विठुरायाच्या चरणी मी साकडं घातलेलंय. मातेच्या चरणी साकडं घातलेलंय.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर, मंदिर समितीचे गहिनीनाथ औसेकर महाराज यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिंगण मासिकाचं प्रकाशन झालं, तसंच त्यांनी स्वत: काढलेल्या ‘पहावा विठ्ठल’ या छायाचित्र संग्रहाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. यात्रा अनुदानाचा पाच लाख रुपयांचा धनादेश पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांना देण्यात आला.

यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात वारकऱ्यांना येण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सर्व भाविक तसंच वारकरी यंदा घरी थांबूनच एकादशीचा सोहळा साजरा करत आहेत. 

मात्र राज्यभरातल्या प्रमुख पालख्यांना मोजक्या वारकऱ्यांसह वाहनाद्वारे थेट एकादशीच्या दिवशी पंढरपुरात येण्याची सूचना देण्यात आली होती, त्यानुसार राज्यभरातल्या संतांच्या पालख्या काल राज्य परीवहन महामंडळांच्या बसद्वारे पंढरपुरात दाखल झाल्या. संत ज्ञानेश्वर तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी पुणे जिल्ह्यातून अनुक्रमे आळंदी आणि देहू इथून प्रस्थान केलं. संत निवृत्तीनाथांची पालखी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरहून तर रुक्मिणी देवींची पालखी अमरावती जिल्ह्यातल्या कौंडिण्यपुरातून पंढरपुरात पोहोचली. पैठण इथून संत एकनाथ महाराजांची पालखीही काल एस टी महामंडळाच्या वातानुकूलित बसमधून पंढरपुरात दाखल झाली.

या पालख्या वाखरी पालखी तळाच्या ठिकाणी आल्यानंतर आरोग्य विभागाकडून सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

****

राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं आषाढी वारीला परवानगी न देण्याची राज्य सरकारची भूमिका योग्यच आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी ते पंढरपूर पायी नेण्याची वारकरी सेवा संघाची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायमूर्ती पी बी वराळे आणि न्यायमूर्ती सुरेन्द्र तावडे यांच्या खंडपीठानं काल यासंदर्भातल्या सुनावणीदरम्यान, यंदाची आषाढी वारी सरकारी सुरक्षा तत्वानुसार करणं सर्वांच्या हिताचं आहे, असं स्पष्ट मत व्यक्त केलं.

****

मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मराठी भाषा विभागाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. सरकारी आदेश, परिपत्रके यात मराठी भाषेचाच वापर व्हायला पाहिजे, यासाठी सरकारकडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. टाळेबंदी संदर्भातल्या सूचना काही विभागांनी इंग्रजी भाषेत दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं देसाई यांनी सांगितलं.

****

राज्यात काल आणखी चार हजार ८७८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एक लाख ७४ हजार ७६१ झाली आहे. काल २४५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं सात हजार ८५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एक हजार ९५१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ९० हजार ९११ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ७५ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणूग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद शहरातला रोकडिया हनुमान कॉलनीतल्या एका ५८ वर्षीय पुरुषाचा, बुढीलेनमधल्या ४४ वर्षीय महिलेचा तसंच रेल्वेस्टेशन भागातल्या राहुलनगरमधल्या एका ७१ वर्षीय वृद्धेचा समावेश आहे, याशिवाय फुलंब्रीतल्या फतेह मैदान भागातल्या एक जणाचा या आजारानं मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात या संसर्गामुळे २६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या पाच हजार ५६५ झाली आहे. जिल्ह्यात काल २८२ नवे बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद महापालिका हद्दीतल्या २१९ तर ग्रामीण भागातल्या ६३ रूग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातले दोन हजार ७४१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाले असून, सध्या दोन हजार ५६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेनं ‘स्वॅब संकलन आपल्या दारी’ मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत कोरोना विषाणू बाधित रुग्ण राहत असलेल्या घरापासून २०० ते ५०० मीटरपर्यंतच्या घरातल्या नागरिकांची कोरोना विषाणूची चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेची पथकं अशा वसाहतींमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांच्या स्वॅबचे नमुने घेणार आहे.

दरम्यान, शहरातल्या शिवाजीनगर भागामध्ये तीन दिवस जनता संचारबंदी पाळण्यात येत असून, काल या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परिसरातल्या सर्व आस्थापना काल पूर्णपणे बंद होत्या. कोरोना विषाणूचं वाढतं प्रमाण बघता माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी शिवाजीनगर मधल्या नागरिक आणि व्यापाऱ्यांशी चर्चा करुन जनता संचारबंदी पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

****

जालना जिल्हा रुग्णालयात काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या पंधरा झाली आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यात काल दिवसभरात आणखी ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ५५४ झाली आहे. उपचारानंतर विषाणूमुक्त झालेल्या १५ रुग्णांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत ३१५ रुग्ण या आजारातून बरे झाले असून बाधित १६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

लातूर जिल्ह्यात काल आणखी २२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये लातूर शहरातले १६, चाकुर तालुक्यातले दोन, तर उदगीर तालुक्यातला एक रुग्ण आहे.

****

नांदेड जिल्ह्यात काल आणखी १४ कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. यात नांदेड शहरातले १०, मुखेड तालुक्यातले तीन, तर हदगाव तालुक्यातला एक रुग्ण आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ३८७ झाली आहे. त्यापैकी २८३ रुग्ण बरे झाले असून, १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या नांदेड जिल्ह्यात ८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उमरगा तालुक्यातले सहा, परंडा तालुक्यातले दोन, तर सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातला एक जण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या २२९ झाली आहे. त्यापैकी १७३ जण बरे झाले असून, ११ रुग्णांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

परभणी जिल्ह्यात काल तीन नवे कोविडग्रस्त रुग्ण आढळले. यापैकी परभणी शहरातल्या दोन आणि झरी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ११५ झाली आहे.

दरम्यान, सोनपेठ आणि जिंतूर शहरात रुग्ण आढळून आल्यानंतर या दोन्ही शहरात उद्यापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

****

मुंबईत काल आणखी ९०३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ९३ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ७३९ नवे रुग्ण, तर ३१ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल २०९ रुग्ण आढळले, तर चार जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात २६६, रायगड २६३, जळगाव १४४, सोलापूर ३५ तर अहमदनगर जिल्ह्यात काल २९ नवे रुग्ण आढळले.

****

राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून, या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याची टीका, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे. ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते. रुग्णांसाठी सोयीसुविधा, पुरेशा खाटा आणि रुग्णवाहिका पुरवण्या ऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी वाढवण्याची घोषणा करून सर्वसामान्य जनता, मजूर आणि गोरगरिबांवर अन्याय केल्याची टीका भोसले यांनी केली.

****

आकाशवाणीची मराठीतली राष्ट्रीय बातमीपत्रं आजपासून पुन्हा सुरु होत आहेत. सकाळी नऊ वाजून २० मिनिटांनी, दुपारी दीड वाजता आणि रात्री सव्वा नऊ वाजता ही बातमीपत्रं प्रसारित होतील.

****

संपूर्ण वीज देयक एकरकमी भरल्यास, राज्य सरकार देयकात दोन टक्के सूट देणार असल्याचं, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केलं.  ते काल वार्ताहरांशी बोलत होते. टाळेबंदीच्या काळात मीटर रिडींग न घेता, सरासरी वीज वापराच्या आधारे वीज देयकं देण्यात आली होती, मात्र जे लोक घरांना कुलूप लावून गावी गेले होते, त्यांच्या घरी प्रत्यक्ष मीटर रिडींग घेऊन देयकात दुरुस्ती केली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं. वर्क फ्रॉम होम या संकल्पनेमुळेही या काळात वीज देयक अधिक आलं असल्याचं राऊत यांनी नमूद केलं.

****

शिवसेना सदैव कोविड रुग्णांवर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचं, औरंगाबाद इथल्या लोकप्रतिनिधींनी म्हटलं आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाठ यांनी काल औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांची भेट घेतली, त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून सर्व डॉक्टर, परिचारिका तसंच इतर कर्मचारी करत असलेल्या परिश्रमाला तोड नसून या सर्वांचं मनोधर्य उंचावणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव नगरपालिकेचं नगराध्यक्षपद रिक्त झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती देण्याचे आदेश त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. विद्यमान नगराध्यक्ष सहाल चाऊस हे भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात मागील चार महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यामुळे सध्या हे पद रिक्त आहे.

दरम्यान, नगराध्यक्षपदाचा कार्यभार आपल्याकडे देण्याची मागणी उपनगराध्यक्षा सुमन मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात कोणताही निर्णय दिलेला नाही.

****

केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षानं काल लातूर इथं आभासी सभा- व्हर्च्युअल रॅली केली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या सभेला संबोधित करताना, केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. रेल्वे बोगी प्रकल्पावर आधारीत उद्योग याच भागात व्हावेत यासाठी रेल्वेमंत्री आणि इतर संबंधिताकडे आग्रह धरू असं त्यांनी आश्वासन दिलं.

****

लातूर शहर महानगरपालिकेनं टाळेबंदी तसंच साथरोग कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –

लातूर शहर महानगरपालिकेने मास्क न घालून फिरणाऱ्याच्या विरोधात आणि शारीरिक अंतर न पाळणं, वेळेच्या नंतर दुकानं उघडे ठेवणं, हॉटेलमध्ये लोकांना सर्विस देणं या सगळ्याच्या विरोधात कडक कारवाई सुरू केलेली आहे. मास्क न वापरणाऱ्याला मास्क देण्याच्या महापालिकेच्या या उपक्रमाविषयी बोलताना महापालिकेच्या उपायुक्त वसुधा फड यांनी सांगितलं “जे लोक मास्क वापरत नाहीयेत, त्या लोकांविरूध्द दंडात्मक कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आणखी एक उपक्रम महापालिकेने हाती घेतला आहे. ज्या लोकांना दंड लावण्यात आलेला आहे त्यांना महापालिकेच्या वतीने मास्कपण देण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज जवळपास ५० ते ६० लोकांना महानगरपालिकेच्या वतीने मास्कपण वाटप करण्यात आलेले आहेत.” फक्त दंड वसूल करणं एवढंच काम न करता त्याचं मास्क देऊन प्रबोधन करण्याचं कामही लातूर शहर महानगरपालिकेनं केलं आहे. अरूण समुद्रे, आकाशवाणी बातम्यांसाठी, लातूर.

****

परभणी शहरातही मास्क न लावता फिरणाऱ्या ३१ नागरिकांविरूद्ध कारवाई करण्यात आली, त्यांच्याकडून सहा हजार दोनशे रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शाखेला अन्न धान्याच्या वीस पाकिटं प्राप्त झाली आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष तसंच राज्य अन्न सुरक्षा समितीचे सदस्य संपतराव जळके यांच्या प्रयत्नातून हे साहित्य जमा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी काल एक बालविवाह रोखला. वैजापूर तालुक्यातल्या करंजगाव इथं अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनंत कुलकर्णी आणि महिला तक्रार निवारण केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जावळे यांनी अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांची भेट घेऊन, त्यांचं समुपदेशन केलं.

****

परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातल्या मंगरुळ शिवारातल्या शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबिन बियाणे उगवण न झाल्याप्रकरणी कृषी विभागाच्या पथकानं काल पंचमाने केले. मराठवाडा कृषि विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.ए. के. गोरे, पंचायत समितीचे तालुका कृषि विस्तार अधिकारी एस.टी. तमशेटे यावेळी उपस्थित होते.

****

नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आलेल्या चक्रीवादळांमुळे अवकाळी पाऊस झाला होता. या पावसानं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं होतं. या नुकसान भरपाई पोटी राज्य सरकारनं नांदेड जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५१ कोटी ६५ लाख रुपयांचं अनुदान मंजूर केलं आहे. हे अनुदान जिल्हास्तरावर प्राप्त झालं असून येत्या आठवड्यात शेतकऱ्यांना ते वाटप करण्यात येणार आहे.

****

परभणी आणि शहर आणि परिसरात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातल्या सखल भागासह गांधी पार्क, शिवाजी चौक भागात रस्त्यावर पाणी वाहू लागलं. नांदेड जिल्ह्यातही काल पाऊस झाला.

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता, स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

****

No comments: