Wednesday, 1 July 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 01.07.2020....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 July 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जुलै २०२० दुपारी १.०० वा.

****

वस्तू आणि सेवा करदात्यांचं पाचशे रुपये विलंब शुल्क माफ करण्यात आलं आहे. जुलै २०१७ पासून जुलै २०२० या कालावधीकरता जीएसटीआर थ्री बी फॉर्म भरणाऱ्या करदात्यांसाठी ही सूट देण्यात आली आहे. मात्र यासाठी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत कर विवरण पत्र भरणं आवश्यक आहे. दरम्यान, जून महिन्यात वस्तू आणि सेवा करापोटी ९० हजार ९१७ कोटी रुपये महसूल जमा झाला असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी सुरक्षा दलावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका सैनिकाला वीरमरण आलं, तर तीन सैनिक जखमी झाले. बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर इथं झालेल्या या हल्ल्यात एक नागरिकही ठार झाला आहे. या संपूर्ण भागाची नाकेबंदी करण्यात आली असून, दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

कोविड संक्रमणासोबतच्या लढाईत पुढच्या फळीत असलेल्या डॉक्टरांचं संपूर्ण देश कौतुक करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज डॉक्टर दिनाच्या निमित्ताने केलेल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी, या संकटकाळात डॉक्टर तसंच परिचारिका भगवंताचं रूप असल्याचं म्हटलं आहे. देशासाठी सेवा देणाऱ्या सर्वांचा सन्मान करणं हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही डॉक्टराचं अभिनंदन केलं आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देत असलेल्या अमूल्य योगदानासाठी जावडेकर यांनी डॉक्टरांचे तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार्टर्ड अकांउटंट अर्थात सनदी लेखापाल दिनानिमित्त देशातल्या सनदी लेखापालांचा गौरव केला आहे. देशाची मजबूत आणि पारदर्शी अर्थव्यवस्था सुनिशिचित करण्यामध्ये सनदी लेखापाल महत्वाची भूमिका निभावत असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटल आहे.

****

गेल्या २४ तासात देशात १८ हजार ६५३ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले, देशात आता कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या पाच लाख ८५ हजार चारशे ९३ झाली आहे. काल एका दिवसात या आजारानं ५०७ जणांचा मृत्यू झाला. देशातल्या मृतांची संख्या १७ हजार ४०० झाली आहे. सध्या देशात दोन लाख २० हजार ११४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत देशात या आजारानं तीन लाख ४७ हजार नऊशे ७९ लोक बरे झाले असल्यानं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९ पूर्णांक ४३ शतांश टक्के झालं असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात ११५ पुरूष, तर ७७ महिला आहेत. यापैकी ११६ रुग्ण महानगरपालिका हद्दीतले तर ग्रामीण भागातले ७६ रूग्ण आहेत. आतापर्यंत एकूण पाच हजार ७५७ कोरोना विषाणू बाधित आढळले असून दोन हजार ७४१ रुग्ण बरे झाले आहेत. २६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या दोन हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

जालना जिल्ह्यात आज २७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात आता एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या ५८० झाली आहे. तर आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

****

परभणी जिल्ह्यात नवे तीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची संख्या ११८ झाली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात आज ४ नवे कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळून आले. यात नांदेड शहरातल्या अनिकेतनगर भावसार चौक, आनंदनगर, एकम दर्गा इतवारा इथल्या प्रत्येकी एका आणि कंधार तालुक्यातल्या सोमठाणा उमरज इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. या चारही महिला रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ३९१ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत २८३ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या ७९ रूग्ण रूग्णालयात उपचार घेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

कोरोना विषाणू संक्रमणाच्या प्रार्श्वभूमीवर मुंबईतला जगप्रसिद्ध असलेला लालबागच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव या वर्षी रद्द करण्यात आला आहे. लालबागच्या भव्य गणेश मूर्तीची यंदा प्राणप्रतिष्ठा होणार नाही. गणेशोत्सवाला होणारी गर्दी पाहून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यंदा गणेशोत्सव आरोग्य उत्सव म्हणून साजरा करण्याचं या मंडळानं ठरवलं आहे. उत्सव काळात ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरं, फ्लाझमा संकलन, यासारखे उपक्रम चालवले जाणार आहेत. मुख्यमंत्री मदत निधीला २५ लाख रूपये देण्यात येणार असल्याचंही मंडळानं जाहीर केलं आहे.

****

हरितक्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आज औरंगाबाद इथं त्यांना जिल्हा काँग्रेसच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी उपस्थित राहून वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहिली.

****

वन महोत्सव सप्ताहाला आजपासून सुरूवात होत आहे. या सप्ताहानिमित्त पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकांना आपल्या आसपासच्या परिसरात झाडं लावण्याचं आवाहन केलं आहे.

****

No comments: