Friday, 24 July 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.07.2020....Afternoon Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
देशभरात आतापर्यंत ८ लाख १७ हजार २०९ रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात या आजारातून मुक्त होणाऱ्यांचं प्रमाण ६३ पूर्णांक ४५ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या चोवीस तासात देशात कोविडबाधा झालेले नवे ४९ हजार ३१० रुग्ण आढळले, त्यामुळे देशातल्या कोविड-19 च्या रुग्णांची एकूण संख्या १२ लाख ८७ हजार ९४५ झाली आहे. सध्या देशातल्या विविध राज्यांमधल्या रुग्णालयांमध्ये ४ लाख ४० हजारावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासात ३४ हजार ६०२ रुग्ण बरे झाले, एका दिवसांत रुग्ण बरे होण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. देशभरातला मृत्यूदरही दोन पूर्णांक ३७ शतांश टक्के झाला आहे. काल देशभरात ७४० रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ३० हजार ६०१ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या एक हजार २९० प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोविड संसर्ग चाचण्या केल्या जात आहेत. यापैकी ८९७ सरकारी प्रयोगशाळा असून, ३९३ खासगी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमधून आतापर्यंत एक कोटी ५४ लाख २८ हजारावर नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.
****
कोविड-19 शी निगडीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ- सी पी सी बी नं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वापरलेले मास्क आणि हातमोजे आधी तुकडे करुन ते कागदामध्ये ७२ तास गुंडाळून ठेवावेत आणि त्यानंतरच ते फेकून द्यावेत अशी सूचना सी पी सी बी नं केली आहे. शॉपिंग माल, संस्था तसंच इतर कार्यालयांनी पीपीई कीट बाबतही हीच काळजी घ्यायची आहे असही सी पी सी बी नं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ७४ रुग्णांचे अहवाल आज सकाळी कोरोना विषाणू बाधित आले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातल्या ५४, ग्रामीण भागातल्या १५ तर शहरात येणाऱ्या रस्त्यांवरच्या नाक्यांवर केलेल्या तपासणीत आढळलेल्या ५ रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णवाढीमुळे जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची एकूण संख्या आता १२ हजार ४२१ झाली आहे. त्यापैकी ७ हजार १७८ रुग्ण बरे झाले, तर ४२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ८१७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात आज दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. यापैकी एक ५० वर्षीय कोविडग्रस्त परभणी शहरात फिरोज टॉकीज परिसरातला तर दुसरा ५२ वर्षीय कोविडग्रस्त पूर्णा शहरातला रहिवासी असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चंद्रपूर जिल्ह्यात आज पहाटे तेलंगणा राज्यातल्या एका ७५ वर्षीय महिलेचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू आहे. परंतू या मृत्यूची नोंद तेलंगणा राज्यात होणार असल्याचं, प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यात एकूण ३३६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण असून, यातले २०२ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या १३४ रुग्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कोव्हिड सुश्रुषा केंद्रात उपचार घेत असून, या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहर आणि जिल्हात काल संध्याकाळी दमदार पाऊस झाला असून कन्नड तालुक्यातील हरसवाडीला जाणारा पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान वैजापूर तालुक्यातही मुसळधार पाउस झाला असून मन्याड साठवण तलाव शंभर टक्के भरला आहे.
****
धुळे शहरात काल मध्य रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागातील घरात पाणी साचले असुन शहरातील पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे शहरातील फरशी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात जनतेला सहभागी करून घेण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्याबाबत केंद्र सरकारनं सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्यात सुरक्षित अंतर राखून सर्व नियमांचं पालन करण्याचे तसंच मोठ्या स्वरुपात आयोजनांना परवानगी देऊ नये, असं म्हटलं आहे.
****
अयोध्येतल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा जबाब आज नोंदवण्यात आलं. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या लखनौ इथल्या विशेष न्यायालयात दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत ९२ वर्षीय अडवाणी यांचा जबाब नोंदवण्यात आला. याच प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा जबाब काल याच पद्धतीनं नोंदवण्यात आला होता.
****
प्रसिद्ध नृत्यांगना अमला शंकर यांचं आज कोलकाता इथं निधन झालं. त्या १०१ वर्षांच्या होत्या.
****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 16 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 16 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...