Tuesday, 22 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.09.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 September 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत संमत झालं. या सुधारणेमुळे भरड धान्य, कडधान्य, तेलबिया, तेल, कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले जातील. या वर्षी जून महिन्यात केंद्र सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल. या सुधारणेनंतर शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळणार असल्याचं तसंच मागणी आणि पुरवठा साखळीत संतुलन राखता येणार असल्याचं, अन्न अणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. धान्याचं उत्पादन आणि साठवणुकीसाठी हे विधेयक सहायक ठरेल, असंही दानवे म्हणाले. संसदेनं संमत केलेल्या या सुधारणा विधेयकामुळे सरकारला आता युद्ध तसंच दुष्काळी परिस्थितीत अन्न धान्याचा नियंत्रित पुरवठा करता येणार आहे.

****

देशात कोविड बाधितांचं संसर्गमुक्त होण्याचं प्रमाण ८० पूर्णांक ८६ शतांश टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. गेल्या २४ तासांत देशात एक लाख एक हजार ४६८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यामुळे देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात या संसर्गाचे नवे ७५ हजार ८३ रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरातली कोविडग्रस्तांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजार ६६३ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात एक हजार ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ८८ हजार ९३५ झाली आहे.

****

ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज पहाटे साताऱ्यात निधन झालं, त्या ७९ वर्षांच्या होत्या. सातारा इथं एका टीव्ही मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं, त्यांना १७ तारखेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, काल सायंकाळनंतर प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांनी कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत नाटकांपासून अभिनयाला प्रारंभ केलेल्या आशालता यांनी, संगीत संशय कल्लोळ, संगीत शारदा, संगीत मृच्छकटीक, मत्स्यगंधा, रायगडाला जेव्हा जाग येते, गारंबीचा बापू, भाऊबंदकी, वाऱ्यावरची वरात, गुंतता हृदय हे आदी नाटकांमधून विविध भूमिका रंगवल्या.

उंबरठा, नवरी मिळे नवऱ्याला, गुपचुप गुपचुप, गंमत जंमत, माहेरची साडी, आदी मराठी चित्रपटांसह अपने पराये, अंकूश, वो सात दिन, आहिस्ता आहिस्ता, शौकीन, नमक हलाल, जंजीर, कुली, सदमा आदी हिंदी चित्रपटातूनही अनेक भूमिका साकारल्या. दूरदर्शनवरच्या मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केला. महाश्वेता या दूरदर्शन मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ८५ झाली आहे. आजपर्यंत एकूण ८७९जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे, २४ हजार २८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण ५ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मुंबईत काल उपनगरी रेल्वेप्रवास करून सविनय कायदेभंग करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महासचिव संदीप देशपांडे यांच्यासह चार जणांना मुंबईत रेल्वे पोलिसांनी आज अटक केली. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत मुंबईतल्या उपनगरी रेल्वेतून सध्या सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी नाही. या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याच्या मागणीसाठी मनसेनं हे आंदोलन केलं होतं.

****

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आणि आसपासच्या परिसराला आज पहाटे पुन्हा भूकंपाचे ३ धक्के बसले. सुमारे साडे तीन रिश्टर स्केलचे हे धक्के जाणवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या जवळपास २ वर्षांपासून या भागाला कमी अधिक प्रमाणात हे धक्के जाणवत असून अद्याप याचं कारण समजू शकलेलं नाही.

****

ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल झालेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वीस झाला आहे. आज सकाळपर्यंत जवळपास वीस लोकांना या इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू असून इसापूर येथील उर्ध्व पेनगंगा प्रकल्पातून नदीपात्रातही २७ हजार १२३ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार असून नदी काठावरील गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन धरण पूरनियंत्रण कक्षानं केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...