Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 November 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
**
दहशतवादाच्या वाढत्या आव्हानांविरोधात आंतरराष्ट्रीय
समुदायानं एकत्र येण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
** कांदा
व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा २५ टनावरून दीड हजार टन करण्याच मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारकडे मागणी
** केंद्र
सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधात काँग्रेस पक्षाचं
राज्यभर सत्याग्रह आंदोलन
** राज्यात
आणखी पाच हजार ५४८ कोविड बाधितांची नोंद, ७४ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू
** मराठवाड्यात
१४ रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ४५४
रुग्णांची नोंद
** आणि
** बंजारा
समाजाचे धार्मिक गुरू पोहरादेवीचे मठाधीश डॉ. रामराव महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
****
दहशतवादाच्या वाढत्या आव्हानांविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यायला
हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. गुजरात मधल्या केवाडिया इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी'
जवळ आयोजित 'राष्ट्रीय एकता दिवस' समारंभात ते काल बोलत होते. भारतानं दहशतवादविरोधी लढ्यात अनेक निष्पाप
जीव गमावले असून, पुलवामा सारख्या घटनेचं राजकारण न करता देश
हितालाच प्राधान्य द्यायला हवं, असं ते म्हणाले. या
हल्ल्यावर विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड
झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशातले शेतकरी, कष्टकरी आणि
गरिबांच्या कल्याणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार काम करत असून,
संरक्षण क्षेत्रातही भारत स्वावलंबी बनत असल्याचं पंतप्रधानांनी
नमूद केलं.
****
दरम्यान, देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई
पटेल यांना त्यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं.
पंतप्रधानांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी
पंतप्रधानांनी उपस्थित असलेल्या अर्ध सैनिक दलाच्या जवान-अधिकारी आणि नागरिकांना
एकतेची शपथ दिली. तसंच विविध सुरक्षा दलांच्या जवानांचं
पथसंचलन यावेळी झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती
एम व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही
नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला
पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना
अभिवादन केलं.
****
सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती, इंदिरा
गांधी यांची पुण्यतिथी आणि महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
परभणी महानगरपालिकेच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना
अभिवादन करण्यात आलं.
विभागात सर्वत्र सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात
आलं, तसंच एकतेची शपथ घेण्यात आली.
****
कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या
कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा २५ टनावरून वाढवून दीड हजार टन एवढी
करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
केंद्र सरकारकडे केली आहे. तसं पत्र त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे. केंद्र
शासनानं आता बाजार समितीतल्या कांदा खरेदीच्या दिनांकापासून
ग्रेडींग, पॅकेजिंगसाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. हा
कालावधीही खूप कमी असून, तो सात
दिवसांचा करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं
आहे.
रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे देशातलं अग्रगण्य राज्य असून, एकूण उत्पादनाच्या एक तृतियांश उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं.
देशाच्या एकूण कांदा निर्यातीतही महाराष्ट्राचा वाटा ८० टक्के असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे. मागच्या रब्बी हंगामात कांदा उत्पादनाचं
क्षेत्र वाढलं असून अंदाजे १०० लाख टन कांद्याचे उत्पादन
झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, बटाट्यांच्या दरवाढीवर नियंत्रण
घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं १० लाख टन बटाट्याची आयात करायचा निर्णय
घेतला असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. बटाट्यांच्या वाढत्या दरांवर
नियंत्रण आणण्यासाठी सरकार आवश्यक पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले.
****
दरम्यान, नाशिक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार
समितीमध्ये काल एक हजार ७३० क्विंटल उन्हाळ कांद्याची तर ९० क्विंटल लाल कांद्याची
आवक झाली. उन्हाळ कांद्यासाठी किमान एक हजार ६० ते कमाल सहा हजार १९५, आणि सर्वसाधारण पाच हजार ४०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. तर लाल
कांद्यासाठी किमान १ हजार २८० ते कमाल ४
हजार ३१२ आणि सर्वसाधारण कांद्याला ४ हजार २०१ रुपये प्रति
क्विंटलचा भाव मिळाला.
****
केंद्र सरकारनं लादलेल्या शेतकरी कायद्याविरोधातला लढा
तीव्र करत काँग्रेस पक्षानं काल राज्यभर सत्याग्रह आंदोलन केलं. सरदार वल्लभभाई
पटेल जयंती आणि माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, वर्धा मधल्या सेवाग्राम आश्रमसमोर या आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी
बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, महात्माजींनी
आम्हाला न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला, त्याच
मार्गानं आम्ही जात असून, सर्वधर्मसमभावाची प्रार्थना करून
हे आंदोलन करत असल्याचं सांगितलं.
नांदेड इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या
नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला. तसंच नवा मोंढा ते महात्मा गांधी
पुतळ्यापर्यंत ट्रॅक्टर मार्च काढण्यात आला.
उस्मानाबादमध्ये प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली
आंदोलन करण्यात आलं.
परभणी जिल्हा आणि शहर काँग्रेसच्या वतीनंही आंदोलन करण्यात आलं, शेतकरी आणि कामगारविरोधी भूमिका घेत कायदे केले जात
असल्याबद्दल यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.
लातूर इथंही काँग्रेस भवनासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं.
यासोबतच राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयीही काँग्रेस नेते, पदाधिकारी यांनी सत्याग्रह करून शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांना विरोध
व्यक्त केला.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या जनजागृतीसाठी केंद्र सरकारनं
सुरु केलेल्या मोहिमेत सहभागी होत, माजी
भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं
आहे.
****
ऊस उत्पादक
शेतकऱ्यांना
यंदाच्या हंगामात एक रकमी रास्त आणि किफायतशीर
दर- एफआरपी देण्याची तयारी साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी
सहकारी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची
काल कोल्हापूरमध्ये संयुक्त बैठक झाली. शुगर
ॲक्टनुसार उसाचा एक रकमी रास्त आणि किफायतशीर दर- एफआरपी
देण्याचं ठोस आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास
मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. मात्र तोडणीसाठीची १४ टक्के वाढीव रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी सोबत द्यावी,
तीन टप्प्यांत एफआरपीबाबत घेतलेले करार रद्द करावेत, या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिली. त्यामुळे येत्या उद्या होणाऱ्या ऊस परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात
येणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील
यांनी सांगितलं.
दरम्यान,
बीड जिल्ह्यातले अनेक उसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरात ऊसतोडणीसाठी जाऊ लागले आहेत.
दिड महिन्याच्या संपानंतर १४ टक्के वाढ या कामगारांना मिळाली आहे.
****
राज्यात काल दिवसभरात आणखी पाच हजार ५४८ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १६ लाख
७८ हजार ४०६
झाली आहे. राज्यभरात काल ७४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या
विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४३ हजार ९११ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. तर काल सात हजार ३०३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.
राज्यात आतापर्यंत १५ लाख दहा हजार ३५३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून,
सध्या एक लाख २३ हजार ५८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला, तर नव्या ४५४ रुग्णांची नोंद
झाली. नांदेड जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी
४९ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात काल ५१ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर
नव्या ७० रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद, परभणी आणि हिंगोली
जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात
नवे ९८, परभणी जिल्ह्यात ३७, तर
हिंगोली जिल्ह्यात नवे सहा रुग्ण आढळून आले.उस्मानाबाद जिल्ह्यात ४५
तर बीड जिल्ह्यात ९८, कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
****
मुंबईत
काल ९९२ नवे रुग्ण आढळले तर ३२ जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात २४८ नवे रुग्ण आढळले
तर एक जणाचा मृत्यू झाला. सातारा १५६, सिंधुदुर्ग
२१, भंडारा ७७, गडचिरोली
५१, वाशिम १९, रत्नागिरी सात, अहमदनगर २६०, बुलडाणा ५५ आणि गोंदिया जिल्ह्यात ३८ नवे रुग्ण आढळले.
****
बंजारा समाजाचे धार्मिक गुरू आणि वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथले मठाधीश
डॉ. रामराव महाराज यांचं परवा मध्यरात्री मुंबईत खाजगी रुग्णालयात दीर्घ आजारानं
निधन झालं, ते नव्वद वर्षांचे होते.
त्यांच्या पार्थिवावर आज पोहरादेवी इथं अंत्यसंस्कार होणार
आहेत. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
रामराव महाराज यांनी समाजाची केलेली सेवा आणि त्यांच आध्यात्मिक ज्ञान कधीही
विसरता येणार नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
तर, डॉ. रामराव महाराज यांनी संत सेवालाल
महाराज यांचा वारसा चालवताना समाजातल्या अनिष्ट प्रथांवर नेहमीच प्रहार केला आणि जनजागृतीचं मोठं कार्य केलं.
त्यांच्या निधनानं संपूर्ण समाजाचं मोठं नुकसान झालं आहे, असं
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास विभागाचे कार्य
सांभाळणारे उमरगा इथले जयंत पाटील यांचं काल रस्ता अपघातात निधन झालं. त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय
शेतीच्या माध्यमातून स्वावलंबी बनवलं होतं. पुणे इथल्या सर्वांगीण
ग्राम विकास संस्थेचं कामही ते करत होते.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातले
विलासअप्पा पाटील यांचंही काल निधन झालं. पाटील भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष तसंच लोणी गावचे माजी सरपंच
होते.
****
अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सर्वेक्षण यादीतून
वगळलेल्या परभणी तालुक्यातल्या १७ गावांचाही सर्वेक्षण यादीत समावेश करण्यात आला
आहे. भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी काल ही
माहिती दिली. या यादीतून परभणी
तालुक्यातल्या आसोला, कारेगाव, टाकळी
कुंभकर्ण, नांदापूर, साडेगाव, मिर्झापूर, वाडी दमई, तट्टू जवळा,
ताड लिंबला, पांढरी पोरजवळा, पाथरा, ब्रह्मपुरी, ब्राह्मणगाव,
पारवा, कौडगाव आणि जांब
या गावांना वगळण्यात आलं होतं. आता या गावांचा सर्वेक्षण यादीत समावेश करण्यात आला आहे.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे
आणि एकमेकातल्या सुरक्षित अंतर
राखण्याचं आवाहन नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक
देविदास फुलारी यांनी आवाहन केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात देवगाव फाटा ते जिंतूर या
रस्त्याच्या दुरूस्ती कामाला काल खासदार संजय जाधव आणि
आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत सुरुवात
करण्यात आली. या रस्त्यासाठी १२ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
****
हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल खानापूर चित्ता इथं वाळू
चोरी करणारे तीन ट्रॅक्टर पकडले. वाळू आणि ट्रॅक्टर असा एकूण १७ लाख ४० हजार
रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला असून, सहा
जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि तरुणांना स्वावलंबी बनवणे यासाठी आत्मनिर्भर
भारत योजना एक मैलाचा दगड ठरेल, असं मत संसदीय कार्य राज्यमंत्री
संजय बनसोडे यांनी यांनी व्यक्त केलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या
उदगीर इथं आयोजित आत्मनिर्भर भारत अभियान समारोप प्रसंगी ते काल बोलत होते.
केंद्रामार्फत राबवली जाणारी आत्मनिर्भर भारत ही योजना लातूर जिल्ह्यातल्या
प्रत्येक पात्र लाभार्थी पर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळेल
यासाठी शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत अशा सूचनाही बनसोडे यांनी यावेळी दिल्या.
****
परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, कोणत्याही
निकषाविना शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये मदत
द्यावी, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीनं केली आहे.
समितीच्या वतीनं काल जिल्हा प्रशासनाला मागणीचं निवेदन देण्यात आलं.
राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांनीही शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तात्काळ
नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनू पंतप्रधान नरेंद्र मोदी
आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिलं आहे.
**////**
No comments:
Post a Comment