Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 01 November 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात आज
पाळल्या जात असलेल्या काळ्या दिवसाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी
सरकारचे सर्व मंत्री आज काळ्या फिती बांधून काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही आपल्या हाताला काळी फित
बांधून काम सुरु केलं आहे. राज्यातली जनता ही सीमा भागात
अडकलेल्या मराठी भाषिक बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी असून कर्नाटक सरकारकडून सीमा
भागातील मराठी भाषिकांवर अद्यापही होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही
हाताला काळी पट्टी लावून काम करत असल्याचं पाटील यांनी आज सांगलीत सांगितलं.
****
देशात
खरीप हंगामातील धानाची खरेदी वेगानं सुरु असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून पंजाब,
हरयाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदिगड, जम्मू आणि काश्मीर, केरळ तसंच
गुजरात या राज्यातून ही खरेदी केली जात आहे. आतापर्यंत १९७ लाख मेट्रीक टन धानाची खरेदी
करण्यात आली असल्याचं केंद्रीय ग्राहक कार्य, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं
सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी साडे तेवीस टक्क्यानं अधिक आहे. याशिवाय
तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगाना, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान
आणि आंध्रप्रदेश या राज्यातून ४५ लाख १० हजार मेट्रीक टन डाळी आणि तेलबियांची किमान
हमी भावानं खरेदी करण्यात आली आहे.
****
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९१ पुर्णांक ५४ दशांश झाला असून
देशात आतापर्यंत ७४ लाख ९१ हजार ५१३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे की, गेल्या २४
तासांत देशात ४६ हजार ९६४ नवे रुग्ण आढळले तर ५८ हजार ६८४ रुग्ण या आजारातून बरे
झाले आहेत. रुग्ण आजारातून बरे होण्याचं प्रमाण वाढत असून देशातल्या कोरोना विषाणू
बाधितांची एकूण संख्या ८१ लाख ८४ हजार ८२ एवढी झाली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष
ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी राज्यांनी एक समिती स्थापित करावी अशी सूचना केंद्र सरकारनं देशातल्या सर्व
राज्यांना केली आहे. याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरु नयेत आणि अंमलबजावणी सुलभपणे व्हावी, यासाठी सामाजिक माध्यमांवर लक्ष
ठेवण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत. प्रारंभी
आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर गटांना या मोहिमेत सामावून घेतलं जाणार आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
****
कोरोना विषाणू महामारी संपवण्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करावं, अशा सूचना महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या
आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोविड परिस्थिती आढावा
बैठकीत आज त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाची जागा, परतीच्या पावसानं झालेलं
नुकसान, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण तसंच
वाळू लिलाव याबाबतचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.
****
राज्यातील महाआघाडीचे सरकार नोव्हेंबर - डिसेंबर मध्ये पडेल या विरोधकांनी
उठवलेल्या वावड्या असून, हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाल
पुर्ण करेल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
धुळे जिल्ह्यातल्या शहादा इथं आयोजित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले एकनाथ
खडसे यावेळी उपस्थीत होते. गटातटाचे राजकारण विसरुन जिल्ह्यातल्या पक्षीय
कार्यकत्यांनी काम करावे असा सल्ला देत खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस
खानदेशात चांगली मजल मारेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ
कॉमर्स अँड इंडस्ट्री- फिक्कीचा स्वच्छतेच्या
क्षेत्रातला प्रचार आणि प्रसार करण्यासंदर्भातला
देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महिला आर्थिक विकास मंडळाला देण्यात
आला आहे. यासाठी गेल्या दोन वर्षातल्या कामाच्या
प्रत्यक्ष फलश्रुतीची मोजदाद केली गेली. कोविडच्या
पार्श्वभूमीवर हा पारितोषिक वितरण समारंभ होऊ शकला नाही.
****
सांगली जिल्ह्यातील चांदोली आणि सागरेश्वर ही दोन्ही अभयारण्ये आजपासून
पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. कोरोना विषाणू संसर्ग पार्श्वभूमीवर गेली आठ महिने बंद होती. चांदोली धरण परिसरात
पर्यटकांसाठी प्राथमिक सुविधा निर्माण करून दिल्या जात आहेत. त्यामुळे महाबळेश्वर
नंतर या भागातलं प्रमुख पर्यटन क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला इथं तीन महिन्यापूर्वी
सापडलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवाला कृत्रिम पाय बसवण्यात यश आलं
आहे. या कासवाला कृत्रिम पाय बसवण्यासाठी कोकण वाईल्ड लाईफ
रेस्क्यु फोरम, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर वन विभागाचे डॉ.
संतोष वाळवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. टर्टल
सर्वायवल अलाईस या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय
समुद्री कासवावरील कृत्रिम पाय बसवण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
**///**
No comments:
Post a Comment