Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 November 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
* ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्याने विद्यार्थ्यांना
शाळेत पाठवणं सक्तीचं नाही - उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्र्यांकडून स्पष्ट
* मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वच
उमेदवारांची प्रचारात आघाडी
* औरंगाबाद जिल्ह्यात आज दोन तर जालना जिल्ह्यात
एका कोविडग्रस्ताचा मृत्यू
आणि
* पंढरपुरात विठ्ठलाच्या मुखदर्शन `ऑनलाईन
पास`ची सुविधा २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान बंद
****
राज्यात नववी ते बारावीच्या शाळा उद्या सोमवारपासून
प्रत्यक्ष सुरू होणार असल्या तरीही ऑनलाईन शिक्षणही सुरू राहणार आहे, त्यामुळे मुलांना
शाळेत पाठवणं सक्तीचं नाही, असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रादूर्भाव पुन्हा वाढत असल्यानं,
विद्यार्थ्यांनाही हा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे पालक आणि विद्यार्थी
यांच्यात शाळेत जाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तनपुरे बोलत
होते. सरकारनं पूर्ण खबरदारी घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या
संसर्गाचा जास्त उद्रेक असेल, तर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले असल्याचं
तनपुरे यांनी सांगितलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या इयत्ता नववी ते १२ वी पर्यंतच्या ५३६ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं
उद्यापासून सुरू होणार आहेत. शाळेत रुजू होण्यापूर्वी माध्यमिक विभागाच्या शिक्षकांना
कोरोना विषाणू चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आजपर्यंत जिल्ह्यातल्या चार हजार
६२५ माध्यमिक शिक्षकांपैकी ३ हजार ३०८ शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यापैकी
१३ शिक्षकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं आढळून आलं. दरम्यान, शाळांमध्ये निर्जंतुकीकरणासह
आवश्यक उपाय योजना करण्यात येत असल्याचं माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सांगितलं.
जिल्ह्यात माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या एक लाख ३० हजार ५२१ इतकी
आहे, मुलांना शाळेत पाठवणाऱ्या पालकांना तसंच संमतीपत्र देणं आवश्यक असल्याचं शिक्षण
विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहेत,
मात्र महापालिका क्षेत्रातल्या शाळा येत्या ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे.
****
नाशिक जिल्ह्यामधील शाळा
येत्या चार जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येणार नाही असा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ
यांच्या उपस्थितीत आज झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात
आला. नाशिक जिल्ह्यात सध्या दोन हजार पाचशे छप्पन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या
पार्श्वभूमीवर आता येत्या चार जानेवारी नंतरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात
येईल असं भुजबळ म्हणाले.
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शाळा येत्या २६ नोव्हेंबर पासून सुरू
होणार असून, नागपूर महापालिका कार्यक्षेत्रातल्या शाळा मात्र १३ डिसेंबरपर्यंत बंदच
राहणार आहेत.
पुणे तसंच ठाणे जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनीही सध्या शाळा सुरू न करण्याचा
निर्णय घेतला आहे.
****
येत्या
एक डिसेंबरला होणाऱ्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी प्रचारात
आघाडी घेतली आहे. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये उमेदवारांच्या गाठीभेटी तसंच
प्रचार सभा घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आभासी सभा घेतली. पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षण
देतात मात्र, पदवीधर बेरोजगारांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. महाविकास आघाडी सरकारनं
कोविडच्या सावटातही विविध कंपन्यांशी ५० हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे
तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसायाची संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी
म्हणाले. औरंगाबाद शहरातल्या तीन ठिकाणी या ऑनलाईन प्रचार सभेसाठी व्यवस्था करण्यात
आली होती.
दरम्यान
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी संवाद
साधणार आहेत.
****
भारतीय
जनता पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी विधान सभेतील विरोधी पक्ष
नेते देवेंद्र फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उद्या औरंगाबाद शहरात येत
आहेत. राज्यातल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत रिपब्लीकन पक्षानं भारतीय
जनता पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज ही माहिती दिली.
विधान
परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उस्मानाबाद तसंच बीड इथं भाजपचे उमेदवार
शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडली
****
महाविकास आघाडीतले तीनही पक्ष एकमेकांचे नैसर्गिक
मित्र नसून सत्तेसाठी एकत्र आल्याची टीका विधान सभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
यांनी केली आहे. ते आज अमरावती इथं अमरावती शिक्षक विभाग मतदारसंघातले भारतीय जनता
पक्षाचे उमेदवार डॉ. नितीन धांडे यांच्या प्रचार मेळाव्यात बोलत होते. केंद्र सरकारचं
नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचा समन्वय साधणारं असल्याचं फडणवीस
यांनी यावेळी नमूद केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणू संसर्ग झालेल्या दोन रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं
आतापर्यंत एक हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या
४२ हजार २४६ झाली असून ६५५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातले
४० हजार ४५८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे.
****
जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या एका रुग्णाचा आज मृत्यू झाला,
तर २५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात या संसर्गाचे आतापर्यंत अकरा हजार ९७७ रुग्ण
आढळले असून या पैकी अकरा हजार २८८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. जिल्ह्यात ३०७ रुग्णांचा
या संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा सरासरी मृत्यू दर २ पूर्णांक ५६ शतांश टक्के
इतका असलेला मृत्यूदर, गेल्या दोन दिवसात शून्य पूर्णांक ६ दशांश टक्क्यांवर आला आहे.
तसंच या संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण एक टक्क्यानं सुधारून ९४ पूर्णांक २५ शतांश
टक्के झालं आहे. जालना जिल्ह्यात सध्या ३८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
सिंधुदुर्गमधल्या अकरा रुग्णांनी
आज कोरोना विषाणू संसर्गावर मात केली. जिल्ह्यात या संसर्गावर मात केलेल्या एकूण रुग्णांची
संख्या आता चार हजार ८५० झाली आहे.
****
पंढरपुरात विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी
आवश्यक `ऑनलाईन पास`ची सुविधा २५ ते २७ नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे.
कार्तिकी एकादशी सोहळ्यादरम्यान पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन कोरोना विषाणू संसर्ग
वाढू नये, यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं हा निर्णय घेतला आहे. शासन आदेशानुसार
१६ नोव्हेंबरपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. मात्र
कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २५ आणि २६ नोव्हेंबरला पंढरपुरात संचारबंदी लावली
जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
****
औरंगाबाद इथल्या पूर्णवाद
स्पोर्ट्स अॅण्ड हेल्थ प्रमोशन ॲकडमीच्या वतीनं देण्यात येणारा सुधीर जोशी स्मृती
‘क्रीडा तपस्वी’ राज्यस्तरीय पुरस्कार औरंगाबाद इथले मोहम्मद रफत अफंदी यांना प्रदान
करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
मोहम्मद रफत अफंदी यांनी फुटबॉल क्रीडा प्रकारात मार्गदर्शक आणि संघटक म्हणून भरीव
कार्य केलं आहे. त्यांनी शहरात शंभराहून आधिक राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू
निर्माण केले आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्त्या
स्मिता भोगले यांनी केलं आहे.
****
जागतिक मच्छिमार दिनानिमित्त
मुंबईलगत मढ इथल्या कोळी बांधवांनी आज तिवरांच्या झाडाची पूजा करून मच्छीमार दिन साजरा
केला. समुद्र आणि खाडीच्या किनारी असलेल्या तिवरांना पर्यावरणाच्या दृष्टीनं विशेष
महत्व आहे. पौराणिक काळापासून कोळी समाजातही तिवराला महत्व आहे. भाटी गावातल्या ग्रामस्थांनी
मच्छिमार दिनानिमित्त संपूर्ण जेट्टीची स्वच्छताही केली.
****
सोलापूर जिल्ह्यात मोहोळ-
विजापूर महामार्गावर रसायनं वाहून नेणारा टँकर आणि मालवाहतूक कंटेनरची समोरासमोर धडक
होऊन झालेल्या अपघातात दोन्हीही वाहनं जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान
दाखवत वाहनांची दारं तोडून वाहन चालकांना बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
//************//
No comments:
Post a Comment