Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 November 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
**
राज्यात पुन्हा टाळेबंदी लावायची नसल्यामुळे
नागरिकांनी कोविड प्रतिबंधाच्या त्रिसुत्रीचं पालन करावं - मुख्यमंत्र्यांचं आवाहन
**
राज्याच्या अनेक जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू होणार
**
मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
**
ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही
**
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत प्रमुख उमेदवारांची प्रचारात आघाडी
**
राज्यात कोविडचे नवीन पाच हजार सातशे
५३ रुग्ण, मराठवाड्यात नव्या ४१९ रुग्णांची
नोंद
आणि
** सुधीर जोशी स्मृती ‘क्रीडा तपस्वी’ पुरस्कार
औरंगाबादचे मोहम्मद रफत अफंदी यांना प्रदान
****
राज्यात पुन्हा टाळेबंदी लावायची
नसल्यामुळे नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी त्रिसुत्रीचं पालन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून नागरिकांशी संवाद
साधत होते. मास्क न घालता फिरणारे लोक, तसंच अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांबाबत त्यांनी
नाराजी व्यक्त केली, ते म्हणाले...
बरेच
जण मास्क न घालता देखिल फिरत आहेत. गर्दी करत आहेत. अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे.
अजूनही आपण शाळा नाही उघडू शकलो.निणर्य घेतला आहे पण अजूनही उघडू शकू की नाही प्रश्नांकित
आहे ते. आज महाराष्ट्राची रुग्ण संख्या कमी आलेली आहे. हे कमी करण्यामध्ये जशी या यंत्रणेची
मेहनत आहे तसंच आपलं सहकार्य सुद्धा आहे.पण एका ह्या वळणावरती कोणत्या दिशेला जायचं
ते आपल्याला ठरवावं लागेल.पुन्हा लॉकडॉऊनच्या दिशेनं जायचं का? माझ्या काही आवडीचा
विषय नाहीये की पाच वर्षात काय केलं.लॉकडाऊन केला. नाही महाराष्ट्र पुढे नेतो आहे,
महाराष्ट्र पुढे जातो आहे. वॅक्सीन येईल तेंव्हा येईल परंतू आपल्याला आपल्या हालचाली
वरती नियंत्रण आणणं आत्ताच आणणं हे फार गरजेचं आहे.स्वत:हून या कोरोनापासून दोन नव्हे
चार होत लांब राहता येईल तेव्हढा प्रयत्न आपण केला पाहिजे.
परवाची कार्तिकी एकादशी भाविकांनी
गर्दी न करता साधेपणानं भक्तिभावानं साजरी करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या तसंच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांचं
मुख्यमंत्र्यांनी स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
****
राज्यातल्या अनेक जिल्ह्यात
नववी ते बारावीच्या शाळा आजपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळांचं
निर्जंतुकीकरण करण्यात आलं असून, प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याची व्यवस्था
करण्यात आली आहे. शाळेत एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी वेळापत्रकाचं
नियोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेत उपस्थिती करता पालकांचं संमतीपत्र
आवश्यक असून, शंभर टक्के शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करणं
बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात
परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला असून जालना, औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याल्या
काही शाळा मात्र आजपासून सुरू होत आहेत.
परभणी शहर महापालिका क्षेत्र
वगळता जिल्ह्यातल्या शाळा येत्या २ डिसेंबरपासून किमान दोन टप्प्यात सुरु होणार आहेत.
इयत्ता दहावी तसंच बारावीचे वर्ग २ डिसेंबरपासून तर नववी आणि अकरावीचे वर्ग त्यानंतर
सुरू होतील. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल बैठक घेऊन याबाबत आदेश जारी केले.
महानगर पालिका क्षेत्रातले वर्ग सुरू करण्याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचं
या आदेशात नमूद आहे. परवा २५ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये शिक्षक
आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांकरता ऑनलाईन
वर्ग चालू ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात नववी ते
बारावीपर्यंतचे शाळा वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्हाधिकारी
रुचेश जयवंशी यांनी काल यासंदर्भात आदेश जारी केले. सर्व शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे
कोविड चाचणी अहवाल आल्यानंतर सर्व शाळांनी पालक, शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन आणि विकास
समितीची बैठक घ्यावी. वर्ग चालू करण्याबाबत पालकांची संमती घ्यावी, या बैठकीचे अहवाल
शिक्षण विभागाकडे सादर करावेत, त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश निर्गमित करणार
असल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील नववी ते
बारावीच्या शाळा २ डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर आणि
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल संयुक्त पत्रकाद्वारे
ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या ८५८ शाळा आहेत, तर ८ हजार
११५ शिक्षक आहेत. आतापर्यंत ४० टक्के शिक्षकांच्या तपासण्या झाल्या आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या इयत्ता नववी ते १२ वी पर्यंतच्या
५३६ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं आजपासून सुरू होत आहेत. जिल्ह्यातल्या चार हजार ६२५
माध्यमिक शिक्षकांपैकी ३ हजार ३०८ शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यापैकी
१३ शिक्षकांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं आढळून आलं. दरम्यान, शाळांमध्ये निर्जंतुकीकरणासह
आवश्यक उपाय योजना करण्यात येत असल्याचं माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सांगितलं.
जिल्ह्यात माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या एक लाख ३० हजार ५२१ इतकी
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण
भागातल्या शाळा आजपासून सुरू होणार आहेत, मात्र महापालिका क्षेत्रातल्या शाळा येत्या
३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, औरंगाबाद इथं काल
२९८ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली, यात दहा जणांना कोविड
संसर्ग असल्याचं निष्पन्न झालं.
****
बीड जिल्ह्यातल्या शाळा ५०
टक्के क्षमतेनं आजपासून सुरू होत आहेत. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ७८ हजार विद्यार्थ्यांपैकी
१५ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्रं दिली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत साडे
तीन हजारावर शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, यापैकी ३५ शिक्षक कोविड बाधित
असल्याचं समोर आलं आहे. तीन हजार शिक्षकांच्या चाचण्या अद्याप बाकी आहेत.
****
लातूर जिल्ह्यातही आजपासून
शाळा सुरू होत आहेत, सुमारे १९ टक्के पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत
संमतीपत्रं दिली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार ७६२ शिक्षकांच्या चाचण्या करण्यात
आल्या असून, यापैकी ३३ शिक्षक कोविडबाधित आढळले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात निवासी
शाळा वगळता, नववी ते बारावीच्या इतर शाळा आजपासून सुरू होत आहेत. जिल्ह्यात सुमारे
साडे चार हजार शिक्षकांची कोविड चाचणी करण्यात आली, यापैकी ७० शिक्षकांना कोविड संसर्ग
झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात एक हजार
२०९ शाळांपैकी सुमारे चारशे शाळा आजपासून सुरू होतील. जिल्ह्यात १६ हजार ७०६ शिक्षकांची
चाचणी करावी लागणार असल्यानं, सर्व शाळा आजपासून सुरू होणं शक्य नाही, असं जिल्हा माध्यमिक
शिक्षणाधिकारी रामदास हाराळ यांनी सांगितलं.
****
राज्यात नववी ते बारावीच्या
शाळा आजपासून सुरू होत असल्या तरीही, ऑनलाईन शिक्षणही सुरू राहणार आहे, त्यामुळे मुलांना
शाळेत पाठवणं सक्तीचं नाही, असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रादूर्भाव पुन्हा वाढत असल्यानं,
पालक आणि विद्यार्थी यांच्यात शाळेत जाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर
तनपुरे यांनी ही बाब स्पष्ट केली.
****
कोरोना विषाणूवर लस उपलब्ध
होत नाही तोपर्यंत शाळा किंवा महाविद्यालयं सुरू करू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य
शिक्षक परिषदेच्या ठाणे शाखेनं राज्य सरकारकडे केली आहे. ऑनलाईन शिक्षण चालू ठेवण्याचा
शासनाचा निर्णय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताचा असल्याचं, परिषदेनं म्हटलं आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी प्रचारात
आघाडी घेतली आहे. मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये उमेदवारांच्या गाठीभेटी तसंच
प्रचार सभा घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आभासी सभा घेतली. महाविकास आघाडी सरकारनं कोविडच्या
सावटातही विविध कंपन्यांशी ५० हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे तरुणांना
मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसायाची संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
औरंगाबाद शहरातल्या तीन ठिकाणी या ऑनलाईन प्रचार सभेसाठी व्यवस्था केली होती. भाजप
उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र
फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आज औरंगाबाद शहरात येत आहेत.
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षानं
भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल ही माहिती दिली.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती
मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं
आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर
यांनी केलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग
झालेले नवीन पाच हजार सातशे ५३ रुग्ण आढळले. यामुळे राज्यात कोविड बाधितांची एकूण संख्या
सतरा लाख ८० हजार दोनशे आठ झाली आहे. राज्यात काल ५० रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू
झाला, राज्यभरात या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या आता शेहेचाळीस हजार सहाशे
२३ झाली आहे, मृत्यूचा हा दर दोन पूर्णांक बासष्ट शतांश टक्के एवढा आहे.
काल राज्यभरात चार हजार ६० रुग्ण कोविड मुक्त झाल्यानं,
त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यभरात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची
संख्या आता १६ लाख ५१ हजार ६४ झाली असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ७५
शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक्याऐंशी हजार पाचशे बारा रुग्णांवर उपचार सुरू
आहेत.
****
मराठवाड्यात
काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४१९ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद तसंच बीड जिल्ह्यात काल प्रत्येकी तीन कोविडग्रस्तांचा, तर जालना आणि नांदेड
जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ११३ नवे
रुग्ण आढळले, नांदेड जिल्ह्यात ८५,
लातूर ७९, बीड ६२, उस्मानाबाद ३४, जालना २५, हिंगोली ११, तर परभणी जिल्ह्यात काल १०
नवे कोविडबाधित आढळले.
****
औरंगाबाद
इथल्या पूर्णवाद स्पोर्ट्स अॅण्ड हेल्थ प्रमोशन ॲकडमीच्या वतीनं देण्यात येणारा सुधीर
जोशी स्मृती ‘क्रीडा तपस्वी’ राज्यस्तरीय पुरस्कार औरंगाबाद इथले मोहम्मद रफत अफंदी
यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. अफंदी यांनी फुटबॉल क्रीडा प्रकारात मार्गदर्शक आणि संघटक म्हणून भरीव
कार्य केलं आहे. त्यांनी औरंगाबाद शहरात शंभराहून आधिक राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील
खेळाडू निर्माण केले आहेत.
****
पंढरपुरात
विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आवश्यक `ऑनलाईन पास`ची सुविधा २५ ते २७ नोव्हेंबर या तीन
दिवसांसाठी बंद राहणार आहे. कार्तिकी एकादशी सोहळ्यादरम्यान पंढरपुरात गर्दी होऊन कोरोना
विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं हा निर्णय घेतला
आहे.
****
औरंगाबाद
इथल्या प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर छाया महाजन यांनी नागरिकांना कोविडपासून
बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
*****
दोन हजार कोटी रुपये कर्जाच्या
नावाखाली एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव आहे, असा आरोप
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते काल जालन्यात बोलत
होते. राज्य सरकारला कर्ज उभारणीची परवानगी असताना, एसटी महामंडळ वेगळं कर्ज का घेत
आहे, असा प्रश्न विचारत, दरेकर यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.
//************//
No comments:
Post a Comment