Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 November 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा; वस्तू आणि सेवा कर संकलनात
वाढ.
·
बेळगाव आणि सीमा भागात पाळण्यात आलेल्या काळ्या दिवसाला राज्यात
सर्वपक्षीय पाठिंबा.
·
कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येकानं प्रतिकार
शक्ती वाढवण्यावर भर देण्याची गरज- आरोग्यमंत्री राजेश टोपे.
·
राज्यात आणखी पाच हजार ३६९ कोविड बाधितांची नोंद, ११३ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
·
मराठवाड्यात सात रुग्णांचा मृत्यू, तर नव्या ३६४ रुग्णांची नोंद.
आणि
·
बंजारा समाज बांधवांचे धर्मगुरू, तपस्वी डॉ. रामराव महाराज,
यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
****
देशाच्या
आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. ऑक्टोबर महिन्यात एक लाख पाच हजार १५५
कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर - जीएसटी जमा झाल्याची माहिती, अर्थ सचिव ए बी पांडे
यांनी दिली. हा जीएसटी महसूल गेल्या वर्षीच्या याच काळात प्राप्त महसुलापेक्षा दहा
टक्के अधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. एकूण
जीएसटी पैकी १९ हजार १९३ कोटी रुपये केंद्रीय कर, २५ हजार ४११ कोटी रुपये राज्यांचा
कर आणि ५२ हजार ५४० कोटी रुपये, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर आहे. कालपर्यंत ऑक्टोबर
महिन्याची ८० लाख आर-थ्री-बी विवरणपत्र सादर करण्यात आली. अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी
आणि कोविड-19 महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना राबवल्या असल्याचं,
पांडे यांनी सांगितलं.
****
बेळगावसह
संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमा भागात काल पाळण्यात आलेल्या
काळ्या दिवसाला राज्यात सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला. महाविकास आघाडी सरकारच्या सर्व
मंत्र्यांनीही काळ्या फिती बांधून काम करत या दिवसाला पाठिंबा दिला. मराठी माणसाचा
सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात सामील होईल असा विश्र्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
बेळगाव,
कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार असून, सीमाभागातल्या मराठी
बांधवांच्या लढ्याला राज्यातल्या प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला.
मुंबईच्या
सीमा संघर्ष समन्वय समिती आणि अन्य मराठी संघटनांतर्फे मुंबईत काळा दिन पाळण्यात आला.
बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी, विधान परिषदेच्या
उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी केली.
ज्या
गावांमध्ये मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे, ती गावंही कर्नाटक राज्यामध्ये गेली
असून, बेळगावसह अशी ८०० गावं आहेत. आजही या गावातल्या नागरिकांना महाराष्ट्रात येण्याची
आशा आहे. भाषेच्या आधारावर ही गावं महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, अशी भारतीय जनता
पक्षाची भूमिका असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात
पत्रकारांशी बोलत होते.
मराठी
भाषिकांवर कर्नाटक सरकार अन्याय करत असल्याचा आरोप करत नाशिक -त्र्यंबकेश्वर रस्त्यावर
महिरावणीजवळ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रस्ता बंद तसंच निदर्शन करून काल काळा दिवस
पाळण्यात आला.
****
कर्नाटकचे
उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलेलं वक्तव्य केवळ आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी
असून, त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान देण्याची भाषा करू नये, असं उच्च आणि
तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते.
बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून, सूर्य चंद्र असेपर्यंत तो महाराष्ट्राला कधीही
मिळणार नाही, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काल म्हटलं होतं.
****
राज्य
सरकार कुठल्याच विषयात गंभीर नसून, त्यामुळेच मंदिर उघडत नसल्याची टीका विधान परिषदेचे
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सरकारनं मंदिरं उघडली
नाहीत आणि राज्यभर यासाठी आंदोलन सुरू झालं, तर भारतीय जनता पक्ष त्यांच्यासोबत उभा
राहिल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. बेळगाव मधल्या लोकांना न्याय मिळेल अशी समन्वयाची
भूमिका या सरकारनं घेतली पाहिजे असंही दरेकर यावेळी म्हणाले.
****
राज्यातल्या
शासकीय इमारतींचं हरित इमारत संकल्पनेनुसार बांधकाम करण्यात येत असून, या इमारतींचं
मानांकन करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या, हरीत गृह मानांकन अंमलबजावणी - गिरी, या
विशिष्ट संगणक प्रणालीचं उद्घाटन, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते
काल नागपूरमध्ये करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर विभागानं ही प्रणाली
विकसित केली आहे. हरित इमारत संकल्पनेनुसार बांधण्यात आलेल्या इमारतींचं, त्यातील ऊर्जा
वापरासह इतर अनुषंगिक गोष्टींचं अचूक परिगणन, या प्रणालीद्वारे होणार आहे. इमारत बांधकाम
करताना प्रामुख्याने वीज, पाणी यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा कुशलतेने वापर करावा,
या उद्देशानं, ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही,
त्याबरोबरच कार्यक्षमता वाढेल, असं चव्हाण म्हणाले. हरित इमारत संकल्पना राबवताना नैसर्गिक
स्त्रोतांचा मर्यादित वापर केल्यास साधारण इमारतींपेक्षा हरित इमारती बांधकाम पर्यावरणपूरक
आणि किफायशीर राहणार असल्याचं चव्हाण म्हणाले.
****
राज्यात
थंडीची चाहुल लागली असून, मराठवाडा तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांत किमान तापमानात
घट झाली आहे. राज्यातलं सर्वात कमी तापमान काल चंद्रपूर इथं १४ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस
नोंदवलं गेलं. मराठवाड्यात काल परभणी इथं सर्वात कमी १६ पूर्णांक पाच दशांश, तर औरंगाबाद
आणि बीड इथं प्रत्येकी १८ अंश सेल्सिअस तापमान होतं, अशी माहिती हवामान विभागानं दिली
आहे.
****
राज्यात
महिला अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी येत्या अधिवेशनात तामिळनाडूच्या
धर्तीवर ‘दिशा’ कायदा पारित केला जाणार असल्याची माहिती, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
दिली. ते काल नंदूरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं पत्रकारांशी बोलत होते. डिसेंबर महिन्यापर्यंत
महाआघाडीचं सरकार कोसळून भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल, अशा वावड्या उठवल्या जात
आहेत, मात्र महाआघाडीचं सरकार मजबूत असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असंही
देशमुख यावेळी म्हणाले.
****
कोरोना
विषाणू संसर्गाच्या जनजागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहिमेत सहभागी होत,
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी त्रिसूत्रीचं पालन
करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्ग काळात अडचणीत सापडलेल्यांना मदतीचा हात देणारे अभिनेते प्रशांत दामले
तसंच निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह, समाजाच्या विविध क्षेत्रात असामान्य
कार्य करणाऱ्या ४५ कोरोना योद्ध्यांचा काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते
मुंबईत सत्कार करण्यात आला. विविध रुग्णालयांमधले डॉक्टर, परिचारक, स्थलांतरित मजुरांना
अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना आणि संस्थांना मोफत मास्क, निर्जंतुकीकरण, ‘पीपीई
किट’ पुरवणाऱ्या दानशूर व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आलं.
****
उत्तम
रोगप्रतिकार शक्तीनं कोरोना विषाणू संसर्गावर मात करता येते, त्यामुळे प्रत्येकानं
आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर द्यायला हवा, असं आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यात अंबड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात
आलेल्या कोविड देखभाल केंद्राच्या उदघाटनप्रंसगी ते काल बोलत होते. राज्य सरकारनं सर्वसामान्य
नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, खासगी प्रयोगशाळेतल्या
कोरोना चाचण्यांचे दर कमी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. अंबड उपजिल्हा रुग्णालयांमध्ये
अतिरिक्त पन्नास खाटांची सोय करण्यात आल्याचंही टोपे म्हणाले.
****
राज्यात
काल दिवसभरात आणखी पाच हजार ३६९ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्णसंख्या १६ लाख ८३ हजार ७७५ झाली आहे. राज्यभरात काल ११३ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४४ हजार २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर काल तीन हजार ७२६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
१५ लाख १४ हजार ७९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख २५ हजार १०१
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३६४ रुग्णांची नोंद झाली.
जालना
जिल्ह्यात तीन बाधितांचा मृत्यू झाला, तर आणखी ४९ रुग्ण आढळले. औरंगाबाद, उस्मानाबाद,
नांदेड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात
नव्या ६९, उस्मानाबाद जिल्ह्यात ४९, नांदेड जिल्ह्यात ५५, तर परभणी जिल्ह्यात नव्या
२५ रुग्णांची भर पडली. बीड जिल्ह्यात आणखी ७४, लातूर जिल्ह्यात २९, तर हिंगोली जिल्ह्यात
आणखी १४ रुग्णांची नोंद झाली.
****
मुंबईत
काल आणखी ९०८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर २५ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात
७५७ नवे रुग्ण, तर २५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात २४४, सातारा २२१, सोलापूर
१८०, अहमदनगर १६३, सांगली आणि गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी १३७, पालघर ८०, बुलडाणा
६७, यवतमाळ ५८, भंडारा ५५, जळगाव ३८, धुळे २०, सिंधुदुर्ग १३, वाशिम आठ, तर रत्नागिरी
जिल्ह्यात नव्या सात रुग्णांची नोंद झाली.
****
लातूर
महानगर पालिकेनं मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली
आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयात वसुली पथक, लिपिक आणि शहरातल्या नऊ जलकुंभांसाठी
प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे मार्चपासून
वसुली कमी झाल्यामुळे, पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्यामुळे कर्मचाऱ्यांचं वेतनही
वेळेत देता आलं नाही. त्यामुळे येणारा दिवाळी सण पाहता, वेतन आणि इतर प्रलंबित देणी
देण्यासाठी, ही थकबाकी वसूल करण्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे ही मोहीम राबवण्यात
येत असल्याचं पालिकेनं प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
कोरोना
विषाणू प्रतिबंधासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि एकमेकातल्या सुरक्षित अंतर
राखण्याचं आवाहन उस्मानाबाद कॉंग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील यांनी आवाहन
केलं आहे.
****
देशातला
कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, तपस्वी डॉ.रामराव महाराज यांच्यावर
काल वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी
पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या २१ फैरी झाडून सलामी देण्यात आली. राज्य सरकारच्या
वतीनं वनमंत्री संजय राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. उपस्थित अनुयायी,
भाविकांनी साश्रुनयनांनी डॉ.रामराव महाराजांचं अंतिम दर्शन घेतलं. गृह राज्यमंत्री
तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे
आदी यावेळी उपस्थित होते.
संत
सेवालाल महाराजांचे वंशज असलेल्या तपस्वी डॉ.रामराव महाराज यांचं शुक्रवारी रात्री
मुंबईत देहावसान झालं होतं.
****
लातूर
शहरात नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांकडून दंड वसूल करण्यासाठी कंत्राटधारकांकडून
नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे. मनपाच्या वतीनं
प्रथम पार्किंग सुविधा देणं अपेक्षित असतानाही केवळ नागरीकांना वेठीस धरण्यासाठी हा
प्रकार होत असल्याचं, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी म्हटलं आहे. आधी पार्किंग
सुविधा द्या मगच दंड वसूल करा, अशी मागणी मगे यांनी केली आहे.
****
परभणी
जिल्ह्यात गंगाखेड उपविभागीय पोलिस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेनं गुटख्याचा अवैद्य
साठा जमवल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना, न्यायालयानं कालं चौदा दिवसांची कोठडी सुनावली.
परवा शनिवारी केलेल्या संयुक्त कारवाईत सात लाख ७३ हजार ४८२ रुपयांचा गुटखा जप्त करुन
तिघां जणांना यावेळी ताब्यात घेतलं होतं. गुटखा बंदी असतांनाही त्याचा साठा करून खुलेआम
विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी स्थानिक विकास
निधीतून कंधार ग्रामीण रुग्णालयाला एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. सोळा लाख
खर्च करुन खरेदी करण्यात आलेली ही रुग्णवाहिका काल कंधार ग्रामीण रुग्णालयाला सुपुर्द
करण्यात आली.
****
लातूर
जिल्ह्यातला निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण भरला आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून,
त्यातून ७६६ पूर्णांक ६७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
****
कौशल्य
विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यात येत्या सात तारखेला
महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात एकूण तीन हजार सहाशे ५३
विविध कौशल्याच्या जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता
सहायक आयुक्त रेणूका तल्लमवार यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment