Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
मराठा
समाजाला खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या
आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा
निर्णय
·
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या
शिक्षणासाठी ५९ हजार कोटी रूपयांच्या शिष्यवृत्ती योजनेस केंद्रीय
मंत्रीमंडळाची मान्यता
·
कोविड-१९च्या
पार्श्वभूमीवर, नाताळ उत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं
गृहमंत्र्यांचं आवाहन
·
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी
विभागाच्या पुरस्कारांच्या संख्येत वाढ
·
राज्यात तीन
हजार ९१३ नवीन कोविड बाधित रुग्ण; मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू
आणि
·
औरंगाबादमध्ये स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर संस्था
त्वरीत सुरू करण्याची मागणी
****
मराठा समाजातल्या उमेदवारांना शिक्षण आणि नोकर भरतीत आरक्षण देण्यासाठी,
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग- एसईबीसीतल्या
उमेदवारांना, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक-
ई डब्ल्यू एस साठीच्या आरक्षणाचा लाभ देण्याचा
निर्णय, राज्य मंत्रिमंडळानं घेतला
आहे. यासाठी उमेदवारांना उत्पन्नाच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जाईल. खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणं उमेदवारांना ऐच्छिक असणार आहे. उमेदवारानं ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास तो त्यानंतर
एसईबीसी आरक्षणाच्या लाभास पात्र असणार नाही. सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकांवरच्या अंतिम निर्णयाच्या अधीन हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातल्या प्राचीन
मंदिरांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या
निर्णयासही मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास
महामंडळामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येईल. त्यासाठी पुढील
वर्षाच्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल.या प्रकल्पाचं स्वरुप आणि प्राधान्य ठरवण्यासाठी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली
समिती स्थापन करण्यात आली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये, सावित्रीबाई फुले
महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयही, काल राज्यमंत्रिमंडळानं घेतला. या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषणे, निबंध,
वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद
तसंच एकांकिकांचं आयोजन करण्यात येईल.
कोविडमुळे झालेलं नुकसान लक्षात घेता मद्यविक्री परवाना शुल्कात
केलेली १५ टक्के वाढ मागे घेण्याचा, तसंच शिधावाटप यंत्रणेतल्या अन्नधान्याची वाहतूक अधिक
सक्षम करण्यासाठी जिल्हानिहाय स्वतंत्र वाहतूक कंत्राट निविदा प्रक्रिया राबवण्याचाही निर्णयही, काल घेण्यात
आला.
****
चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, भारतीय बाल चित्रपट
संस्था यांचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं
मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश
जावडेकर यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. विलिनीकरण करण्यात आलेल्या सर्व माध्यम विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या
हिताची संपूर्ण काळजी घेण्यात आली असून, कोणालाही सेवेतून कमी
केलं जाणार नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं.
देशात डीटीएच सेवा पुरवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमधल्या सुधारणांनाही केंद्रीय
मंत्रीमंडळानं मंजुरी दिली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.
डीटीएच परवाना आता २० वर्षांसाठी दिला जाणार असून, दर तीन महिन्याला परवाना शुल्क जमा केलं जाईल.
डीटीएच सेवेत १०० टक्के विदेशी गुंतवणुकीसही परवानगी देण्यात आली असल्याचं
त्यांनी सांगितलं.
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ५९ हजार कोटी रूपयांच्या शिष्यवृत्ती योजनेसही, मंत्रीमंडळानं
मंजुरी दिली आहे. पाच वर्षात चार कोटींपेक्षा जास्त अनुसुचित जातींच्या
विद्यार्थ्यांसाठी, ही पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आहे.
यात ३५ हजार ५३४ कोटी म्हणजेच ६० टक्के रक्कम केंद्र सरकार आणि उर्वरित रक्कम
राज्य सरकार तर्फे दिली जाणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून, प्रधानमंत्री किसान सन्मान निधिचा पुढचा हप्ता
जारी करणार आहेत. यामुळे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर,
१८ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होईल. या
कार्यक्रमात पंतप्रधान सहा राज्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधि आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं घेतलेल्या
निर्णयांबाबत, हे शेतकरी आपले अनुभव सांगणार आहेत.
****
कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, या वर्षी नाताळ उत्सव साध्या पद्धतीनं, आणि गृह
विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असं आवाहन
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. ख्रिश्चन बांधवांनी
नाताळ सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत,
विशेष प्रार्थना सभेचं आयोजन करावं, तसंच ६० वर्षावरील आणि १० वर्षाखालील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं, आयोजकांनी त्यांच्यासाठी
ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, धार्मिक, सांस्कृतिक
कार्यक्रमाचं अथवा मिरवणुकांचं आयोजन करू नये, फटाक्याची आतिषबाजी करु नये, ध्वनी
प्रदूषणासंदर्भातल्या नियमांचं आणि तरतुदींचं काटेकोर पालन
करावं, असं आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन
लातूरचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी केलं आहे.
****
राज्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकानयन तसंच पर्यटन स्थळी मनोरंजनाच्या
इनडोअर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी
काल याबाबतचे आदेश जारी केले. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलक्रीडांना परवानगी देतानाच,
यासंदर्भातली आदर्श मानक प्रणाली गृह विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचं, या आदेशात
सांगण्यात आलं आहे. तसंच पर्यटन स्थळांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी, पर्यटन विभागाकडून
मानक प्रणाली जारी करण्यात येणार आहे. याठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारनं
यापूर्वी जारी केलेल्या, कोविड प्रतिबंधाच्या नियामंचं पालन करणं बंधनकारक असल्याचं,
या आदेशात म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीनं दिल्या जाणाऱ्या
पुरस्कारांची संख्या वाढवण्यात आली आहे. नव्यानं ३६
पुरस्कार सुरू करण्यात आले असून, या वर्षापासून ९९ पुरस्कार
दिले जाणार आहेत. मुंबईत
कृषि मंत्री दादा भुसे यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला. काही पुरस्कारांचे निकष बदलण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली.
‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात
आला आहे. निवड आणि शिफारशी बाबतच्या कार्यपद्धतीत सुधारणा
आणि एकसुत्रीपणा येण्यासाठी पुरस्कारांच्या निकषांमध्येही बदल करण्यात आले
असल्याचं, भुसे यांनी सांगितलं.
****
प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातल्या रिक्त जागा भरण्यासाठी, विशेष प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या
पद्धतीनं
ही प्रवेश प्रक्रिया होणार असून, यासाठी विद्यार्थी
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या
डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए ए डॉट ए सी डॉट इन, या
संकेतस्थळावर येत्या शनिवारपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. याबाबत
सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली आणि रिक्त जागांची माहितीही, या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
राज्यात काल तीन हजार ९१३ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख सहा
हजार ३७१ झाली आहे. काल ९३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या
मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार नऊशे एकोणसत्तर झाली असून,
मृत्यू दर दोन पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. काल सात
हजार ६२० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात
आतापर्यंत १८ लाख एक हजार सातशे रुग्ण, कोरोना
विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५१ शतांश
टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५४ हजार ५७३
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २१६ रुग्णांची
नोंद झाली.
जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद, नांदेड, हिंगोली आणि लातूर
जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ७० नवे रुग्ण आढळले. नांदेड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी
३३, बीड २७, उस्मानाबाद १८, परभणी १६, जालना १२, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग
झालेले सात नवीन रुग्ण आढळले.
****
केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आज औरंगाबादच्या दौऱ्यावर येत असून, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय खेळ प्राधिकरण - साई अंतर्गत असलेल्या, जलतरण
तलाव आणि हॅाकी मैदानाचं उद्घाटन, त्यांच्या हस्ते होणार आहे. तलवारबाजीच्या नवीन प्रस्तावित
इमारतीच्या कोनशिलेचं अनावरणही रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे.
****
३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्काचं चलन भरुन दस्तावर स्वाक्षरी केल्यास
पुढील चार महिन्यांपर्यंत दस्ताची नोंदणी करता येईल, त्यामुळे
नागरिकांनी दस्तऐवज नोंदणीसाठी गर्दी करू नये असं आवाहन, बीडचे
मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी अनिल नढे यांनी केलं आहे. राज्य
सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली आहे. नागरीकांनी ऑनलाईन मुद्रांक शुल्क चलन भरणा करावा आणि संबंधित बँकेकडून याबाबतचे
दस्त प्राप्त करुन घ्यावे, दस्तऐवज नोंदणीची सुविधा
शनिवारीही सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर, आमदार सतीश चव्हाण यांची सलग तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधान परिषद सदस्यातून
एका सदस्याची नियुक्ती करण्यात येते, त्या जागेवर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन
परभणी जिल्ह्यातले प्रगतशील शेतकरी कांतराव
देशमुख यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरात स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर- एसपीए ही शैक्षणिक संस्था त्वरीत सुरू करण्याची मागणी, आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली
आहे. काल मुंबईत या दोघांचीही भेट घेऊन त्यांनी याबाबतचे निवेदन सादर केलं.
****
बीड
जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातून मोठमोठ्या मशिनरीचे सुटे
भाग तसंच काही साहित्य चोरीस गेल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध
परळी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातले सैनिक नागनाथ लोभे यांच्या
पार्थिवावर काल सायंकाळी हाडगा उमरगा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सियाचीन सीमेवर गस्ती दरम्यान त्यांना
वीरमरण आलं होतं.
जालना
जिल्ह्यातल्या भिवपूर इथले सैनिक गणेश गावंडे यांच्या पार्थिव देहावर काल भिवपूर इथं
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे इथं कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या
झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला.
सातारा तालुक्यातल्या चिंचनेर निंबचे हुतात्मा सैनिक सुजित किर्दत यांच्या पार्थिवावरही काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर जिल्ह्यातल्या श्री सदानंद दत्त मठात दरवर्षी साजरा होणारा दत्तजयंती
यात्रा महोत्सव यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
त्यामुळे भक्तांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असं
आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळानं केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात आमदार देवयानी फरांदे यांनी जमावबंदी आणि साथ रोग प्रतिबंधक
कायद्याचं उल्लंघन करून मोर्चा काढल्या प्रकरणी
त्यांच्यासह दोनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडाळा गावातल्या एका महिला
रुग्णाचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरच्या दवाखान्याची मोडतोड केल्या
प्रकरणी, संबंधित महिलेच्या नातेवाईकांना अटक करण्यात आली
होती. त्यांना सोडवण्यासाठी आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर हा मोर्चा
काढण्यात आला होता.
****
नांदेड जिल्ह्यातल्या वार्षिक श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेवर जिल्हाधिकारी डॉ.
विपीन इटनकर यांनी, कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात निर्बंध
घातले आहेत. त्यामुळे ही यात्रा मर्यादित स्वरुपात भरणार आहे. जनावरात होणारा लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीनं भरवण्यात येणारे स्टॉल्स, कृषि प्रदर्शन, पशु प्रदर्शन, बचत
गटांचं वस्तु प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार नसल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
वर्षा ठाकूर यांनी स्पष्ट केलं.
****
राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपनी तसंच शेतकरी उत्पादक गटांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहचवण्यासाठी शहरी भागातल्या
रहदारीच्या ठिकाणी तसंच कृषी महामंडळाची मालकी असलेल्या जागेवर ‘नोगा’ उत्पादनांची विक्री स्थळे उभारावीत, असे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांनी ‘नोगा’ या चिन्हा खाली मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर
द्यावा, असंही भुसे यांनी काल झालेल्या एका बैठकीत
सांगितलं.
//**************//
No comments:
Post a Comment