Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकानं
आज सकाळी पैठण तालुक्यात पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. हे पथक आज औरंगाबाद
जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उस्मानाबाद तालुक्यात
केशेगाव, पातोडा, लोहारा तालुक्यात सास्तूर, राजेगाव आणि तुळजापूर तालुक्यात
काकरंबा, आपसिंगा आणि कातरी या गावात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. येत्या २६ डिसेंबर पर्यंत हे पथक राज्यात सोलापूर,
पुणे, नागपूर, गडचिरोली,
चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांचाही दौरा करणार
आहे.
****
देशात कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं
असून, ते ९५ टक्के झालं आहे. काल २५ हजार ७०९ रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ९६ लाख सहा हजार १११ रुग्ण
कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल नव्या २४ हजार ३३७ रुग्णांची नोंद झाली, तर ३३३
रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी ५५
हजार ५६० इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक लाख ४५ हजार ८१० रुग्णांचा
मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४५ शतांश टक्के इतका आहे. देशात सध्या तीन लाख तीन हजार ६३९ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत. काल नऊ लाख १३४ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी
२० लाख ९८ हजार ३२९ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय
वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
नव्या कृषी कायद्याविरोधात
दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं पुढच्या टप्प्याच्या
चर्चेची तारीख ठरवण्यास सांगितलं आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी चर्चा
करावी, असं कृषी मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या पत्रात
म्हटलं आहे. कृषी कायद्यात काही सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी
फेटाळला होता आणि चर्चा करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना
चर्चेसाठी बोलावलं आहे.
****
देशात महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा सह दहा राज्यांमध्ये किमान
हमीभावाने कापूस खरेदी सुरळीत सुरू आहे. आतापर्यंत १६ हजार ८६५ कोटी ८१ लाख कोटी रुपयांच्या
कापसाच्या ५७ लाख ८३ हजार १२२ गाठी खरेदी केल्या असून, ११ लाख २४ हजार २५२ कापूस उत्पादक
शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.
दरम्यान, महाराष्ट्रासह १४ राज्यात खरीप हंगामातली धान खरेदी
सुरू असून, एकूण खरेदीच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ पूर्णांक २५ शतांश
टक्के वाढ झाली आहे. आतापर्यंत ४१२ लाख ९१ हजार मेट्रीक टन धान्याची खरेदी झाली आहे.
यापैकी ४९ टक्क्यांपेक्षा अधिक खरेदी एकट्या पंजाब राज्यातून करण्यात आली आहे.
****
क्रीडा
मंत्रालयानं हरियाणामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स-२०२१ मध्ये
स्वदेशी खेळांचा समावेश करायला मान्यता दिली आहे. गतका, कलारीपयट्टू, थांग-ता आणि मल्लखांब
हे खेळ यामधे समाविष्ट करण्यात आले आहेत. भारताकडे स्वदेशी खेळांचा समृद्ध वारसा असून,
या खेळांचं जतन, संवर्धन करणं तसंच लोकप्रियता वाढवणं याला क्रीडा मंत्रालयाने प्राधान्य
दिलं आहे, या खेळांमध्ये स्पर्धा घडवून आणण्यासाठी खेलो इंडिया गेम्स यासारखं दुसरं
चांगले व्यासपीठ नाही, असं क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा दुसऱ्या सत्रातला एकोणिसावा भाग आहे.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
गुजरात
मधल्या जामनगर इथून औरंगाबाद कडे येणारा डिझेल टँकर नागपुर-सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातल्या
नेर शिवारात पांझरा नदीच्या पुलाजवळ मध्यरात्री उलटला. या अपघातात सुदैवाने जीवीतहानी
झालेली नाही परंतु डिझेल टँकरचं मोठं नुकसान झालं. समोरून येणाऱ्या वाहन चालकाने हुलकावणी
दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती चालकाने दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड
तालुक्यातल्या हळदा परिसरातला वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी आज सकाळी शेतकऱ्यांनी
जळगाव महामार्गावर गोळेगाव चौफुली इथं रस्ता रोको आंदोलन केलं. वीज पुरवठा लवकचं सुरळीत
करण्याचं लेखी आश्वासन महावितरणनं दिल्यानं हे आंदोलन मागे घेतलं असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी
दिली आहे.
****
३५२
वा शिवप्रतापदिन सोहळा आज किल्ले प्रतापगडावर मोजक्या व्यक्तीं आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या
उपस्थितीत साजरा झाला. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास
अभिवादन केलं.
****
धुळे
जिल्ह्यात आज या हंगामातलं निचांकी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नाशिक मध्ये आज नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
//************//
No comments:
Post a Comment