Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 18 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
सुधारित कृषी
कायदे लागू झाल्यानंतर किमान हमीभावावर सरकारने विक्रमी शेतमाल खरेदी केल्याचं केंद्रीय
कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या नावे लिहिलेल्या पत्रात
तोमर यांनी, अशा खरेदी केंद्रांची संख्या वाढवत असल्याचं सांगितलं आहे. गेल्या काही
दिवसांत अनेक राज्यांच्या शेतकरी संघटनांनी आपली भेट घेऊन, कृषी सुधारणांचं स्वागत
केलं असल्याचंही तोमर यांनी म्हटलं आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळे
भारतीय कृषी क्षेत्रांत नवा अध्याय लिहीला जाईल. तसंच शेतकरी स्वतंत्र आणि सक्षम होईल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'सबका साथ,
सबका विकास, सबका विश्वास' याद्वारे कुठलाही भेदभाव न करता आपल्या सरकारची वाटचाल सुरु
असल्याचं त्यांनी या पत्रांत नमूद केलं आहे. एकीकडे या नव्या कायद्यामुळे अनेक शेतकऱ्यांना
फायदा होतो आहे, तर दुसरीकडे कायद्यांबाबतचे गैरसमज पसरवले जात आहेत, ते दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, असंही कृषीमंत्री तोमर यांनी
पत्रांत म्हटलं आहे.
****
देशात कोरोना
विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५ पूर्णांक ४० शतांश टक्के इतकं झालं आहे.
काल दिवसभरात ३० हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत ९५ लाख २० हजार
रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर देशात काल नव्या २२ हजार ८८९ रुग्णांची नोंद
झाली, तर ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या
९९ लाख ७९ हजार ४४७ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ४४ हजार
७८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जवळपास तीन लाख १३ हजार रुग्णांवर उपचार
सुरु आहेत. काल ११ लाख १३ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १५
कोटी ७९ लाख पाच हजार २४० चाचण्या करणयात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं
सांगितलं.
****
चालू खरीप हंगामात ४५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीवर धान्य खरेदी
करण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयानं सांगितलं. यामध्यमातून शेतकऱ्यांना ७५ हजार
२६३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांमधून ३९८
लाख टन धान्याची खरेदी करण्यात आली असून, फक्त पंजाबमधून २०२ लाख टन धान्य खरेदी करण्यात
आलं आहे. मूल्य समर्थन योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह नऊ राज्यांसाठी खरीप हंगाम २०२०
मध्ये ४८ लाख टनाहून अधिक डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आल्याचं कृषी
मंत्रालयानं सांगितलं.
****
दिल्ली आणि एनसीआरच्या परिसरात काल रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर
भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक दोन इतकी होती आणि त्याचं केंद्र गुरुग्रामच्या दक्षिण-पश्चिमेस
४८ किलोमीटर अंतरावर होतं. यामुळे जीवित किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.
****
कापूस उत्पादक शेतकरी कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीसारख्या रोगांमुळे
अनेकदा अडचणीत येतो. या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट
होते. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र यांनी विशेष लक्ष देऊन संशोधन
करावे, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
यांनी केल्या. विधानभवनात कापूस बियाणेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मराठवाडा,
विदर्भ या भागात कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं, कापसावर गुलाबी
बोंड अळीसारखे रोग पडल्यास शेतकरी अडचणीत येतात, त्यामुळे भौगोलिक परिस्थिती आणि हवामान
आधारित कापूस पीक पद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठानं याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी
संशोधन करावं आणि विशिष्ट कालमर्यादेत उपाययोजना सुचवाव्यात, असं ते म्हणाले. गुणवत्तापूर्ण
आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, बियाणांच्या तक्रारीसंदर्भात
योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही
पटोले यांनी यावेळी दिले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचे ५३३ सक्रीय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत
४४ हजार ६९८ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ४२ हजार ९८७ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात
या विषाणू संसर्गानं आतापर्यंत एक हजार १७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
राज्यात १२ आणि १३ डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याला
उमेदवार आणि उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या मेळाव्याचा कार्यक्रम
आता २० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री
नवाब मलिक यांनी दिली.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या
आजच्या दुसऱ्या दिवशी, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या २८ षटकात तीन
बाद ४७ धावा झाल्या होत्या. जसप्रित बुमराहनं दोन गडी बाद केले. तत्पूर्वी भारताचा
पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार विराट कोहलीनं ७४, चेतेश्वर पुजारा ४३,
अजिंक्य रहाणे ४२, मयंक अग्रवालनं १७ धावा केल्या. ***//***
No comments:
Post a Comment