Tuesday, 1 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.12.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ डिसेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

राज्यात औरंगाबाद, पुणे आणि नागपूर पदवीधर मतदार संघ तसंच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. कोविड बाधित मतदारांना शेवटच्या दोन तासांत मतदान करता येणार आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून मतदान शांततेत सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत पाच पूर्णांक ९५ टक्के मतदान झालं.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव इथं मतदान केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी कुंडल इथं मतदान केलं.

या पाचही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी परवा तीन डिसेंबरला होणार आहे.

****

धुळे नंदुरबार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. भाजपतर्फे अमरिशभाई पटेल तर काँग्रेस पक्षातर्फे महा विकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील रिंगणात आहे. अभिजित पाटील यांनी शहादा इथं आपला मतदानाचा हक्क बजावून तीन तारखेला निकालाच्या दिवशी विजय महा विकास आघाडीच्या उमेदवाराचा होईल असा विश्वास व्यक्त केला.

****

कायदा आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान ही मोहिम एक डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून ऑपरेशन मुस्कान ‘09’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं बीड जिल्ह्यात २८ पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकामार्फत बेवारस मुलांचा शोध घेण्यात येणार आहे.

****

लातूर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाची काल खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी पहाणी करुन, काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. हे काम गुणवत्तापूर्ण व्हावं, याकडेही लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. ममदापूर ते लातूर रोड या मार्गाचीही काल श्रृंगारे यांनी पाहणी केली.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...