Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 December 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ डिसेंबर २०२० सकाळी ७.१० मि
****
·
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम
स्थगिती मागे घेण्यासाठी येत्या ९ डिसेंबरला सुनावणी.
·
देशात पुढच्या काही आठवड्यात कोविड लस उपलब्ध होणार-पंतप्रधान
नरेंद्र मोदी.
·
नागपूर, पुणे पदवीधर मतदार संघ तसंच पुणे शिक्षक मतदार संघात
महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी.
·
सुधारित कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा
८ डिसेंबर देशव्यापी बंद.
·
दिल्लीतलं शेतकरी आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित - माजी मंत्री
सदाभाऊ खोत यांचा आरोप.
·
राज्यात काल पाच हजार २२९ नव्या कोविडग्रस्तांची नोंद; मराठवाड्यात
नवे ३२१ रुग्ण.
आणि
·
पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा यजमान ऑस्ट्रेलियावर
अकरा धावांनी विजय.
****
मराठा
आरक्षणाच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती मागे घेण्यासाठी येत्या
९ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय पीठाने ९ सप्टेंबरला
दिलेल्या या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती तसंच शैक्षणिक प्रवेशासंदर्भात एसईबीसी प्रवर्गातले
हजारो विद्यार्थी प्रभावित झाले. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्यासाठी घटनापीठाची
स्थापना करून तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती राज्यशासनाकडून सरन्यायाधिशांकडे करण्यात
आली होती. आता येत्या ९ तारखेला पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार
आहे.
****
राज्यातल्या
जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी केलं आहे. कोविड काळात राज्यातल्या रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून,
सध्या फक्त ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्त तसंच रक्त घटक साठा शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं आहे. येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी
राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था तसंच गृहनिर्माण संस्थांनी कोविड विषयक
काळजी घेऊन छोट्या-छोट्या रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं, स्वैच्छिक रक्तदात्यांनी
देखील नजीकच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
देशात
पुढच्या काही आठवड्यात कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी दिली आहे. ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या सर्वपक्षीय
बैठकीत बोलत होते. देशात सध्या आठ ठिकाणी सुरू असलेलं या लसीबाबतचं संशोधन, विकासाच्या
विविध टप्प्यांमध्ये आहे. शास्त्रज्ञांकडून या लसीला मान्यता मिळाल्यानंतर लसीकरण सुरू
केलं जाईल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. या लसींची साठवणूक तसंच पुरवठ्यासाठी शीतगृहांची
उभारणी केली जात असून, आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांना प्राधान्यानं लस दिली
जाणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. लस येईपर्यंत कोविड त्रिसुत्रीचं पालन करण्याचं
आवाहन त्यांनी केलं. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, गुलाम नबी आझाद, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ
ब्रायन, द्रविड मुनेत्र कळघमचे टी आर बालू यांच्यासह अनेक पक्षांचे नेते सहभागी झाले
होते.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबाद
पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सतीश चव्हाण यांनी केलं आहे.
****
विधान
परिषदेच्या नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघात तसंच पुणे शिक्षक मतदार संघात महाविकास
आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
नागपूर
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. या निवडणुकीसाठी
विजयासाठी आवश्यक असलेली ६० हजार ७४७ मतं पहिल्या फेरीत एकही उमेदवार मिळवू न शकल्यानं,
१७ व्या फेरीपर्यंत मतमोजणी करावी लागली, त्यानंतर अभिजित वंजारी यांना ६१ हजार ७०१
तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मतं मिळाली.
पुणे
पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड विजयी झाले. लाड यांना पहिल्या
पसंतीची १ लाख २२ हजार १४५ मतं मिळाली तर, भाजपचे संग्राम देशमुख यांना पहिल्या पसंतीची
७३ हजार २२१ मतं मिळाली.
पुणे
शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर विजयी झाले, आसगावकर यांना १६
हजार ८७४ मतं मिळाली, तर भाजप पुरस्कृत जीतेंद्र पवार यांना पाच हजार ७९५ मतं मिळाली.
अमरावती
शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले. सरनाईक यांना १२ हजार
४३३ मत मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार श्रीकांत
देशपांडे यांना ९ हजार १९१ मतं मिळाली.
दरम्यान,
औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण
यांनी, हा विजय म्हणजे, गेल्या बारा वर्षांत आपण केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया
व्यक्त केली आहे.
****
धुळे-नंदूरबार
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पराभवाचं शीर्षस्थ नेत्यांनी गांभिर्याने
आत्मपरिक्षण करावं आणि फुटीरांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश
उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केली आहे. महाविकास आघाडीला किमान १९५ मतं मिळणं अपेक्षीत
असताना, अभिजित पाटील यांना फक्त ९८ मतं मिळाली. त्यामुळे आघाडीतले घटकपक्ष असलेल्या
कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९७ मतदारांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा
आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. या निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत.
****
सुधारित
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी येत्या ८ डिसेंबर रोजी भारत
बंदची हाक दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी सरकारच्या
धोरणांविरोधात रोष व्यक्त केला. या कायद्यात दुरुस्ती करण्याचा तसंच किमान हमीभावाबाबत
कायदा करायला सरकार तयार आहे, मात्र आपल्याला हे कायदेच नको आहेत, त्यामुळे हे कायदे
रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा या संघटनांनी दिला आहे. दरम्यान,
शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि केंद्रसरकार दरम्यान आजही चर्चा होणार आहे. चर्चेची
ही पाचवी फेरी आहे.
****
केंद्र
सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांविरोधात राजकीय हेतूने गैरसमज पसरवला जात असून, दिल्लीतलं
शेतकरी आंदोलनही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप, माजी मंत्री तथा रयत क्रांती
संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत
होते. या तीनही कायद्यांचं समर्थन करण्यासाठी उद्या ६ डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर
रयत क्रांती संघटना निदर्शनं करणार असल्याची माहिती, खोत यांनी यावेळी दिली. हे तीनही
कायदे शेतकरी हिताचे आहेत, या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती तथा हमीभाव खरेदी
केंद्र यंत्रणेला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचणार नाही, उलट शेतकऱ्यांना बाजार समितीच्या
आवाराबाहेरही आपला शेतमाल विकण्याचे विविध पर्याय निर्माण होतील, असं खोत यांनी सांगितलं.
****
गैरप्रकार
करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागानं
घेतला आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. नेमून
दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास रक्तपेढीवर पाच पट
दंड आकारला जाईल. रक्ताशी निगडित आजार असलेल्या रुग्णांकडे राज्य रक्त संक्रमण परिषदेचं
ओळखपत्र असेल, तर त्यांना मोफत रक्त पुरवठा केला जातो, अशा रुग्णांकडून प्रक्रिया शुल्क
आकारल्यास, रक्तपेढीला तीन पट दंड केला जाणार आहे. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण
परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
****
शेतकऱ्यांनी
रब्बी हंगामात गैरसोय टाळण्यासाठी योग्य क्षमतेचे कपॅसिटर वापरावे, असं आवाहन महावितरणचे
मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केलं आहे. ते काल बारामती तालुक्यात याबाबतच्या प्रात्यक्षिकावेळी
बोलत होते. हे कपॅसिटर कृषीपंप तसंच विद्युत रोहित्राला जळण्यापासून वाचवू शकते. शिवाय
कपॅसिटर वापरल्यामुळे रोहित्रावर येणारा दाब सुमारे २५ टक्क्यांपर्यंत कमी होतो, असं
पावडे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आज दुपारी औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, आपल्या या दौऱ्यात मुख्यमंत्री
हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. दुपारी दोन
वाजेदरम्यान मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने वैजापूर तालुक्यातल्या मौजे गोळवडी इथं येणार
असून, समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत, त्यानंतर ते हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे
प्रयाण करणार असून, सुमारे साडे तीन वाजेदरम्यान औरंगाबाद विमानतळावरून मुंबईकडे प्रस्थान
करतील
****
राज्यात
काल पाच हजार २२९ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१८ लाख ४२ हजार ५८७ झाली आहे. राज्यभरात काल १२७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,
राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ४७ हजार ५९९ झाली आहे.
तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५८ शतांश टक्के एवढा आहे. काल सहा हजार ७७६ रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख १० हजार ५० रुग्ण,
कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ८१ शतांश टक्के एवढा
झाला आहे. सध्या राज्यात ८३ हजार ८५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल केवळ एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या ३२१ रुग्णांची नोंद
झाली.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नवे १०४ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात
४७, बीड ४४, लातूर ४१, परभणी ३१, नांदेड २६, उस्मानाबाद २१, तर हिंगोली जिल्ह्यात नव्या
सात रुग्णांची नोंद झाली.
दरम्यान,
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर काल दिल्लीहून आलेल्या १९४ प्रवाशांची तर विमानतळावर २४
प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान ऑस्ट्रेलियावर
अकरा धावांनी विजय मिळवला, यजमान संघानं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी
पाचारण केलं, भारतानं निर्धारित २० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १६१ धावा केल्या,
मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना, १५० धावाच करू शकला. चार षटकांत
२५ धावा देत, तीन बळी घेणारा यजुवेंद्र चहल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन
टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सहा डिसेंबरला तर तिसरा सामना आठ डिसेंबरला
होणार आहे.
****
जागतिक
मृदा दिन आज पाळण्यात येत आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ८० गावांत या निमित्तानं सुपीकता
निर्देशांक फलक लावण्यात आले आहेत.
****
भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं होणारे कार्यक्रम कोविड
प्रतिबंधात्मक नियम पाळून साध्या पद्धतीने घेण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी केलं आहे. दादर इथल्या चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण
करण्यात येणार असल्यानं, बाबासाहेबांच्या अनुयायांनी आपापल्या घरातूनच बाबासाहेबांना
अभिवादन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
लातूर
शहर महानगरपालिकेने घरपट्टीत १२ टक्के तसंच थकबाकीवरच्या व्याजात १०० टक्के सूट द्यावी,
अशी मागणी मनपाच्या स्थायी समितीचे सदस्य अशोक गोविंदपूरकर यांनी केली आहे. कोविड टाळेबंदीच्या
पार्श्वभूमीवर ही सूट देण्याची मागणी गोविंदपूरकर यांनी केली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातून विदेशी पिस्तुल आणि रायफल बाळगणाऱ्या दोन जणांना दहशतवादविरोधी
पथकानं अटक केली आहे. बोडखा तांडा इथले रहिवासी धनसिंग राठोड याच्या घरावर छापा टाकत
पोलिसांनी एक विदेशी बनावटीचे पिस्टल, जीवंत काडतुसं, आणि एक रायफल जप्त केली. या प्रकरणी
स्थानिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे
****
जालना
इथं काल ट्रक आणि टॅम्पोच्या धडकेत दोन जण ठार झाले, अंबड मार्गावरच्या पेट्रोलपंपाजवळ
काल सकाळी हा अपघात झाला. सुमीत दुसिंग आणि अमोल आल्हाट, अशी मृतांची नावं असून, दोघंही
अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा फाटा इथले रहिवासी आहेत.
****
पूर्णा
ते पाटणा उत्सव विशेष रेल्वेगाडीच्या तारखांमध्ये बद्दल करण्यात आला आहे. पूर्णा इथून
ही गाडी १८ डिसेंबर ऐवजी १७ डिसेंबरला आणि २५ डिसेंबर ऐवजी २४ डिसेंबरला सुटणार आहे.
परतीच्या प्रवासात ही गाडी १९ आणि २६ डिसेंबरला सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वच्या
वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment