Thursday, 21 January 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २१ जानेवारी २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ जानेवारी २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण राज्यांच्या यादीत महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. नीती आयोगानं या बद्दलची अंतिम यादी जाहीर केली. कर्नाटक राज्याचे सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तामिळनाडू तिसऱ्या, तेलंगणा चौथ्या तर केरळ पाचव्या क्रमांकावर आहे.  मनुष्यबळाचा योग्य पद्धतीनं वापर, उद्योगधंद्यातील गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे व्यवसायवृद्धीसाठी पोषक वातावरण यासारखे मापदंड निश्चित करून त्याआधारे नीती आयोगाने हे निष्कर्ष जाहीर केले आहेत. या यादीत बिहार सर्वात खालच्या स्थानावर आहे. डोंगराळ भागातील राज्यात हिमाचल प्रदेश पहिल्या स्थानावर; तर केंद्रशासित प्रदेशात दिल्लीने बाजी मारली आहे.

****

केंद्र शासनानं निर्यात बंदी उठवल्यावर गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कांद्याची आवक घटत असून, पिंपळगाव बाजार समितीमध्ये काल लाल कांद्याला तीन हजार ४००, तर उन्हाळ कांद्याला तीन हजार ५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दिवसेंदिवस कांदा आवकेत घट होत असल्यानं कांद्याच्या बाजारभावात वाढ होताना दिसत आहे.

****

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना यशस्वी करण्यासाठी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घ्यावा, असं रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगाराची मागणी पूर्ण होणार असल्याचं बनसोडे म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणूचे २४९ सक्रीय रुग्ण आहेत. जिल्ह्यातली एकूण कोविड बाधितांची संख्या ४६ हजार ६२५ झाली असून, त्यापैकी ४५ हजार १४८ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक हजार २२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस तसंच नांदेड पुणे एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २६ जानेवारीपासून या गाड्या सुरू होतील, या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत, अनारक्षित तिकीटधारक प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. आज पहाटे नवरात्रापूर्वीच्या मंचकी निद्रेनंतर देवी पुन्हा सिंहासनारुढ झाली.

//***********//

 

No comments: