Saturday, 23 January 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २३ जानेवारी २०२१ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ जानेवारी २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. हा दिवस यापुढे पराक्रम दिन म्हणून साजरा होणार आहे. या निमित्तानं पुढील वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींना अभिवादन केलं आहे. नेताजींनी आपल्या असंख्य समर्थकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत केली, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेताजींनी साहस, दृढनिश्चय आणि बलिदानाचा आदर्श ठेवला, ज्यानं भारतला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावल्याचं, उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे.

नेताजींनी  देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला त्याग आणि समर्पण देश सदैव लक्षात ठेवेल, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेयाजींना अभिवादन केलं असून, देशवासियांना ‘पराक्रम दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. या निमित्तानं राज्यभर अभिवादन सभांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत फोर्ट परिसरात उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं लोकार्पणही आज होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू मुळे कावळे, कोंबड्या, या पक्षांचा मृत्यू झाल्याचे समोर येत असतानाच काल शिरूर तालुक्यातल्या लोणी शिवारात पाच मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत मोरांचे नमुने तपासणीसाठी पुणे इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात आढळलेल्या मृत पक्षांच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, तो बर्ड फ्लू मुळेच झाल्याचं स्पष्ट झालं आहे.  मृत पक्षी स्थलांतरित होते, त्यामुळे जिल्ह्याला बर्ड फ्ल्यूचा धोका नसल्याचं पशु वैद्यकीय विभागानं स्पष्ट केलं आहे.

//************//

 

No comments: