Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 January 2021
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि.
****
सर्व
श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
****
·
कोविड पार्श्वभूमीवर सरत्या
वर्षाला निरोप आणि नव वर्षाचं स्वागत सर्वत्र
साधेपणानं
·
देशभरात उद्या कोविड
लसीकरणाची रंगीत तालीम; जालना जिल्ह्यातल्या तीन केंद्रांचा समावेश
·
राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ६४ शतांश टक्के; मराठवाड्यात नवे २४१ रुग्ण
·
सीबीएसईच्या १० वी आणि १२ वी च्या परीक्षांना ४ मेपासून प्रारंभ; १५ जुलैला निकाल
·
पथकर संकलनासाठी चारचाकी
वाहनांवर फास्टटॅग लावण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
·
माझी वसुंधरा ई - शपथ उपक्रमाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शुभारंभ
आणि
·
औरंगाबाद शहराच्या नामांतराला
काँग्रेस पक्षाचा पूर्ण विरोध -प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
****
कोविड पार्श्वभूमीवर नव्या वर्षाचं
सर्वत्र साधेपणानं मात्र उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात येत आहे. कोविड संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर राज्यभरात रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असल्यानं,
बहुतेक नागरिकांनी सायंकाळी सरत्या वर्षाला निरोप देत, मित्रमंडळी आणि स्नेहीजनांसह
रात्री घरातच थांबून नवीन वर्षाचं स्वागत केलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या
नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी
नववर्षानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना
विषाणू संसर्गामुळे मागचं वर्ष संपूर्ण
जगाकरता अत्यंत आव्हानात्मक होतं, परंतू शाश्वत मानवी मूल्य,
कोरोना योद्ध्यांचं कार्य, सेवाभाव तसंच परस्पर स्नेहभावना, यामुळे देशवासियांनी या आव्हानाला धैर्यानं तोंड दिलं, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना,
वैयक्तिक आरोग्यासोबतच, इतरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करण्याचं आवाहन
केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती,
समृद्धी, उत्तम आरोग्य, आणि समाधान घेऊन येवो, संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊन सर्वांना
मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो, अशा शब्दात त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या
आहेत.
****
देशात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम उद्या दोन जानेवारीपासून सुरू करण्यात येणार
आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती दिली.
यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाची पुरेशी तयारी करण्यास सांगितलं
आहे. सर्व राज्यांत काही प्रमुख शहरांमध्ये या लसीकरणाची रंगीत तालीम होणार असून, यासाठी
महाराष्ट्रातल्या पुणे, नागपूर, नंदूरबार आणि जालना या चार जिल्ह्यांची निवड करण्यात
आली आहे. या जिल्ह्याततीन आरोग्य केंद्रात प्रत्येकी २५ जणांना अभिरुप लसीकरणासाठी
निवडण्यात येणार आहे. उद्या प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही, मात्र लसीकरणासाठी
आवश्यक मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सर्व प्रक्रिया राबवली जाईल. लसीकरणात येणाऱ्या अडचणी
सोडवणं आणि सहभागी सर्वांना प्रशिक्षण देणं हा या अभिरुप प्रक्रियेचा उद्देश असल्याचं
केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी सांगितलं आहे.
जालना जिल्ह्यात जालना शहरातलं जिल्हा रुग्णालय, अंबड इथलं उप जिल्हा रुग्णालय,
तसंच बदनापूर तालुक्यातल्या शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची रंगीत तालीम
होणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
****
दरम्यान, राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या
रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य
यंत्रणेनं इतर आजारांच्या रुग्णांच्या सुश्रुषेकडेही लक्ष
द्यावं, असं टोपे यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभागातल्या पदभरतीला गती देण्यासंदर्भात
काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक
आरोग्य विभागात
पदभरतीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी, फिरती शस्त्रक्रिया केंद्रं सुरू करावीत, आरोग्यविषयक
राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी संगणक प्रणाली तयार करावी, असे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले.
****
केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं
आवाहन केलं आहे.
****
राज्यात काल तीन हजार ५०९ नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले,
त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ३२ हजार ११२ झाली आहे. काल ५८ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण
संख्या, ४९ हजार ५२१ झाली असून, मृत्यू दर दोन पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका कायम आहे.
काल ३ हजार ६१२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८
लाख २८ हजार ५४६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर
९४ पूर्णांक ६४ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ५२ हजार ९०२ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दहा कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, तर
विभागात नव्या २४१ रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल पाच, जालना जिल्ह्यात
काल तीन, तर परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल ६० नवे रुग्ण आढळले. लातूर
जिल्ह्यात ४५, नांदेड ४२, बीड ३६, उस्मानाबाद २५, जालना २१, परभणी ११, तर हिंगोली जिल्ह्यात
काल कोविड संसर्ग झालेला एक नवीन रुग्ण आढळला.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या १० वी आणि १२ वी च्या परीक्षा येत्या ४ मे ते १० जून या
कालावधीत होणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल ही माहिती
दिली. या दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक परीक्षा एक मार्च पासून घेण्यात येणार आहेत,
तर निकाल १५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचं निशंक यांनी सांगितलं.
****
देशात सर्व चारचाकी वाहनांवर फास्टटॅग लावण्यास येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीनंतर
मात्र प्रत्येक पथकर नाक्यावर दोन मार्गिका रोखीने कर भरण्यासाठी खुल्या असतील, फास्टटॅग
नसणाऱ्या वाहनांना या ठिकाणी दुप्पट कर भरावा लागणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं गेल्या महिन्यात अधिसूचना जारी करुन, एक डिसेंबर
२०१७ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना देखिल फास्टटॅग अनिवार्य असल्याचं सांगितलं होतं.
आतापर्यंत दोन कोटी २० लाखाहून अधिक फास्टटॅग जारी केले असून, सध्या सुमारे ८० टक्के
पथकर वसुली फास्टटॅगद्वारे होत असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे. देशात राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणाच्या सगळ्या पथकर नाक्यांवर, तसंच तीन हजारांहून अधिक अन्य ठिकाणी
फास्टटॅग विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलच्या माध्यमातूनही
फास्टटॅग खरेदी करता येतील.
****
मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आज सायंकाळी पर्यावरण आणि
वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित, माझी वसुंधरा ई - शपथ उपक्रमाचा,
दूरदृष्यप्रणालीद्वारे शुभारंभ करणार आहेत.
नवीन वर्षात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची
शपथ घ्यावी,
यासाठी माझी वसुंधरा डॉट इन, या संकेतस्थळाला भेट द्यावी, ही शपथ घेणाऱ्या व्यक्तीला तत्काळ प्रमाणपत्र
उपलब्ध करून दिलं जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण
रक्षणासाठी शपथ घ्यावी, असं आवाहन
विभागाकडून करण्यात आलं आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी तीन शहरं, तीन
नगरपरिषदा, तीन नगरपंचायती आणि तीन
ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. सर्वोत्तम कामगिरी करणारे एक विभागीय आयुक्त, तीन जिल्हाधिकारी तसंच तीन जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, बक्षीसं देऊन गौरवण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद शहराच्या नामांतराला काँग्रेस पक्षाचा पूर्ण
विरोध असून, असा कोणताही मुद्दा काँग्रेस पक्षाच्या उद्दीष्टात कधीही नसल्याचं, पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची
घोषणा करण्यासंदर्भात राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी योग्य नसल्याची टीका थोरात यांनी
केली.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण
ताकदीनं उतरणार असल्याचं, थोरात यांनी सांगितलं. औरंगाबाद महापालिकेवर काँग्रेसचा महापौर
व्हावा, यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं, असं आवाहनही त्यांनी केलं. महापालिकेच्या
सर्व ११५ जागा लढवण्यासाठी तयार राहण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
****
पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभाला अभिवादन
करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. इथल्या अभिवादन समारंभात दरवर्षी मोठ्या
संख्येनं नागरिक सहभागी होतात, मात्र यावर्षी कोविड संसर्गामुळे उद्भवलेल्या बिकट परिस्थितीत,
या ठिकाणी गर्दी न करता घरूनच अभिवादन करावं, असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरात चायनीज नायलॉन मांजा विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. औरंगाबाद आयुक्तालयाच्या
हद्दीत चायनीज नायलॉन मांजा विकता येणार नाही. पतंग विक्रेता हा मांजा विक्री करताना
आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी
दिले आहेत. चायनीज नायलॉन मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण
मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या सतरा जानेवारी रोजी, पाच वर्षांपर्यंतच्या
वयोगटातल्या बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. या योजनेत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी
अधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचं पालन करून, अधिकाधिक बालकांना पोलिओ
लस देण्याच्या सूचना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड
यांनी दिल्या आहेत.
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त येत्या
तीन जानेवारीला राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे, राज्यभरात `शिक्षण दिन` साजरा केला
जाणार आहे. प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. जिल्हा, तालुका तसंच
गावपातळीवर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून, या कार्यक्रमाचं उद्घाटन
होणार आहे. या कार्यक्रमात शिक्षणाचं प्रतिक म्हणून पणतीचं पूजन केलं जाणार आहे. महिला
शिक्षक तसंच बिकट परिस्थितीतून उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचा यावेळी सत्कार केला जाणार
आहे. अधिकाधिक महिलांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन चाकणकर यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी
एक चांगला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मितीकडे वळलं पाहिजे, असं मत जलसंपदा मंत्री जयंत
पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूर इथल्या राजाराम बापू सहकारी
साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनवेळी ते काल बोलत होते. साखर निर्मिती
केल्यास अतिरिक्त साठा गोदामात पडून राहतो आणि त्यासाठी पोत्याला २५० ते ३०० रुपये
व्याज भरावं लागतं, साखर तयार करण्यापेक्षा इथेनॉल तयार करणं हे फायद्याचं असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी नागरिकांना
कोविड संसर्गापासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
औरंगाबादमधे वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणची धडक
कारवाई सुरू आहे. वीजचोरी करणाऱ्या ५४ ग्राहकांवर महावितरणनं काल सलग दुसऱ्या दिवशी
कारवाई केली, या ग्राहकांना दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू असून, दंड न भरल्यास त्यांच्यावर
गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात
बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी, आमदार राणाजगजितसिंह पाटील
यांनी गावांना विकास निधी उपलब्ध करून देण्याचा निश्चय व्यक्त केला आहे. आमदार तसंच
खासदार विकास निधीसह जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद, इतर शासकीय योजना आणि आत्मनिर्भर
भारत अभियानांतर्गत, हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नऊ सदस्य संख्या असलेल्या
ग्रामपंचायतींना २५ लाख रुपये, ११ ते १५ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ४०
लाख रुपये, तर १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना ६० लाख रुपये निधी देणार असल्याचं
पाटील यांनी सांगितलं.
****
लातूर शहर विकासासंदर्भात पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल
बैठक घेतली. शहरालगतचे सर्व नाले, ओढे यांचं खोलीकरण करून ते
स्वच्छ करावेत, प्राचीन विहीरी पुनरुज्जीवीत कराव्यात, सायकल ट्रॅक तसंच
पादचारी मार्ग बांधावेत, वृक्षारोपण करावं, तसंच प्रदुषण कमी करण्याचे निर्देश देशमुख
यांनी दिले.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात काल एका शेतातल्या
आखाड्यावर छापा टाकून, सुमारे एक लाख ३९ हजार ३०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
सावंगी इथला आरोपी कैलास भांबळे हा गुटखा विकण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना
मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
नववर्षाच्या स्वागतानिमित्त राज्याच्या विविध भागातून
तसंच पंजाबमधूनही शीख भाविक नांदेड शहरात दाखल होत आहेत. कोविड पार्श्वभूमीवर यावर्षी
नांदेडमध्ये येणाऱ्या भाविकांचं प्रमाण कमी आहे. गुरुद्वारा मंडळ तसच लंगर साहिब गुरुद्वाराच्या
वतीनं यात्रेकरूंची सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ४२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी
एकूण नऊ हजार ९४७ अर्ज दाखल झाले होते, काल झालेल्या छाननीत १५१ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे
आता नऊ हजार ७९६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
//**********//
No comments:
Post a Comment