Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21
January 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
·
पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युट
कंपनीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू.
·
देशातल्या दोन्ही कोविड प्रतिबंधक
लसी पूर्णपणे सुरक्षित- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन.
·
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर; २३ एप्रिलपासून
बारावी तर २९ एप्रिलपासून दहावीची परीक्षा.
आणि
·
जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या
‘अंधारातून प्रकाशाकडे’ या राज्यव्यापी प्रबोधन अभियानास औरंगाबादमधून सुरुवात
****
‘कोविशिल्ड’ या कोरोना विषाणुवरील
लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्युट या औषधी उत्पादक कंपनीला लागलेल्या
आगीच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वार्ताहरांशी
बोलतांना सांगितलं. आज दुपारी लागलेली ही आग सव्वा चार तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात
आली. इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग चौथ्या आणि पाचव्या
मजल्यापर्यंत पसरली होती. वेल्डींगचं काम सुरु असतांना ही आग लागल्याची शंका मोहोळ
यांनी व्यक्त केली.
या आगीमुळे कोविशिल्ड या लसीच्या
निर्मिती प्रकल्पाला काही धोका झाला नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे
दहा बंब कार्यरत होते तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानेही या कामी मदत केली. ही
आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी दिले होते.
दरम्यान, या आगीबाबत काळजी करणाऱ्या
तसेच ही आग आटोक्यात येण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आपण आभार मानतो असं कंपनीचे
अदर पुनावाला यांनी एका संदेशाद्वारे म्हटलं आहे.
****
देशात सध्या देण्यात येत असलेल्या
दोन्ही कोविड-19 प्रतिबंधक लसी या पूर्णपणे सुरक्षित असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री
डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे या लसींबाबतीत काही
तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर ते आज बोलत होते. आतापर्यंत देशात एकूण आठ लाख लोकांनी
ही लस घेतली आहे असंही ते यावेळी म्हणाले. कोणतीही लस घेतल्यानंतर काही सौम्य दुष्परिणाम
शरिरावर दिसतात. कोविड लसीबाबत कांही लोक समाजात शंका पसरवत आहेत परंतु यापूर्वीच्या
कांही लसींमुळे आपण कांजण्या आणि पोलिओ सारख्या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो असंही ते
यावेळी म्हणाले.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांची आज शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घोषणा केली. कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर यावर्षी शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले असून दहावी आणि बारावीच्या
परीक्षा विलंबानं घेण्यात येणार आहेत. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९
मे २०२१ या कालावधीत घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात
घोषित केला जाईल. इयत्ता दहावीच्या परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ दरम्यान होणार
असून परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला जाहीर करण्यात येईल अशी माहिती वर्षा
गायकवाड यांनी दिली.
****
आरोग्य विभागाच्या १०८ दूरध्वनी
क्रमांकाप्रमाणे, संपूर्ण राज्यात लवकरच महिला आणि इतर आवश्यक सेवेसाठी ११२ दूरध्वनी
क्रमांकाची नवी यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रहमंत्री अनिल
देशमुख यांनी आज दिली. वर्धा जिल्हाचा कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात आढावा घेतल्यानंतर
ते वार्ताहरांशी बोलत होते. या नवीन सेवेसाठी दोन हजार ५०० चारचाकी आणि २ हजार दुचाकी
गाड्या घेण्यात येणार आहेत, ही सर्व वाहनं जी पी एसशी संलग्न असतील, असं ते म्हणाले.
****
आगामी काळात राज्यात वैद्यकीय
सुविधांचं जाळं निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री
अमित देशमुख यांनी आज सांगितलं. पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हर्सिटीच्या स्कूल
ऑफ फार्मसीतर्फे आयोजित चार दिवसांच्या ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटमध्ये ते बोलत
होते. राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न
करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात उस्मानाबाद, सातारा, परभणी, जालना
आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय
उभारण्यात येणार आहे, असं देशमुख म्हणाले.
****
जमात-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या
‘अंधारातून प्रकाशाकडे’ या राज्यव्यापी प्रबोधन अभियानाची सुरुवात आज औरंगाबादमधून
करण्यात आली. समाजाला अज्ञान, घृणा आणि भौतिकवादाच्या अंधकारातून वाचवण्याच्या उद्देशानं
याची सुरूवात करण्यात येत असून सर्वांना ज्ञान, समजूतदारपणा आणि अध्यात्मिकतेच्या प्रकाशाकडे
घेऊन जाण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरु केलं असल्याचं प्रदेशाध्यक्ष रिजवान उर रहेमान
खान यांनी यावेळी सांगितलं. हे अभियान दहा दिवस चालणार असून या दहा दिवसांत राज्याच्या
११ कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
भाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि
वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावं असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी आज उस्मानाबाद
इथं केलं. भाई उद्धवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंती निमित्त आयोजित कोविड योद्ध्यांचा
सन्मान आणि व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. युवकांनी जात, धर्म, पंथ, पैसा विसरून
समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावं आणि देशासाठी समर्पित भावनेनं काम करावं. आई वडिलांचं
स्वप्न सत्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. भाई उद्धवराव पाटील यांचे सामाजिक
काम मोठे आहे. शेतकरी, कष्टकरी हेच जीवनाचं तत्व आयुष्यभर त्यांनी जपलं, असं आमदार
पवार यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या
पिंपरी खुर्द इथं २४ कोंबड्या दगावल्या आहेत. बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याची शंका
असल्यानं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गावाच्या आसपासचा १० किलोमीटर परिसर संवेदनशील
क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत ही दक्षता घेण्याच्या
सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेडहून
मुंबई आणि पुण्याकरता दोन विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या
२६ जानेवारीपासून सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी नांदेड स्थानकाहून मुंबईसाठी रेल्वे
सुटेल. ती परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे रात्री दहा वाजेच्या सुमारास मुंबईला
पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ जानेवारीपासून सकाळी सव्वासहा वाजता मुंबईहून
सुटेल.
तर नांदेड-पुणे ही गाडी रात्री
साडेनऊ वाजता नांदेडहून सुटेल आणि परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी
पावणेदहा वाजेच्या सुमारास पुण्याला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी २७ जानेवारीपासून
पुण्याहून रात्री दहा वाजता सुटेल.
दरम्यान, मध्य रेल्वेनं कळवल्यानुसार
ठाणे आणि मुलुंड स्थानकांवर महत्वाच्या कामांकरता घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे
सिकंदराबाद - मुंबई देवगिरी विशेष गाडी दिनांक २३ आणि २४ जानेवारी तर मुंबई - सिकंदराबाद
ही गाडी २४ आणि २५ जानेवारीला पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. तर आदिलाबाद - मुंबई नंदीग्राम
विशेष गाडी २३ आणि २४ जानेवारी रोजी कल्याण स्थानकापर्यंत धावेल.
****
तुळजापूर इथल्या कुलस्वामिनी श्री
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेनं
उत्साहात सुरुवात झाली. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता मंदिरात मर्यादित लोकांच्या
उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. यावेळी नवरात्राचे यजमानपद राजाभाऊ कदम आणि
त्यांच्या पत्नी मनोजा कदम यांनी भूषवले. या कार्यक्रमासाठी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर
तांदळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
****
प्लास्टिकच्या राष्ट्र ध्वज विक्रीवर
बंदी आणावी आणि अशा ध्वज विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी परभणी हिंदू जनजागरण
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज परभणी जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे केली.
राष्ट्रध्वज संहितेनुसार राष्ट्रध्वज आकार कसा असावा, कुठे फडकवला जावा, याबाबत संहिता
आहे. त्याचे नागरिक नकळत उल्लंघन करतात, असं झाल्यानं राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होतो
असं याबाबतीत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात
एका आदिवासी बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात मन्नेरवारल
समाजाच्या वतीनं आंदोलन करत आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. याबाबत जिल्हा
प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. मुख्य आरोपीला तात्काळ अटक करून सर्व आरोपींचा शोध
घ्यावा, तसेच आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याप्रमाणे महाराष्ट्राने तयार केलेला शक्ती
कायद्यानुसार २१ दिवसांच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा करुन न्याय द्यावा अशी मागणी
या निवेदनात करण्यात आली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात ८७० ग्राम पंचायतींच्या
सरपंच पदांचं आरक्षण येत्या २७ जानेवारीला निश्चित होईल. तसंच अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रियांकरता आणि खुल्या प्रवर्गातल्या स्त्रीयांकरता
२९ तारखेला आरक्षणाची सोडत काढली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी
दिली.
****
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या
घटनेनंतर सतर्क होत धुळे जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातील सर्व ४१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचं
अग्निशमन अंकेक्षण - फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालुकानिहाय एजन्सी
नियुक्त करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व गटविकास
अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment