Wednesday, 10 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** सुधारित कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना व्यवसायाचे अधिक पर्याय उपलब्ध- पंतप्रधानांचं प्रतिपादन; आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेसाठी पुन्हा आवाहन

** यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ३ लाख ५ हजार ६११ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची तरतूद

** नाट्यगृहांच्या देखभालीसाठी एका शिखर संस्थेची स्थापना करावी- अभिनेते प्रशांत दामले यांची मागणी 

आणि

** माध्यमांमध्ये उच्चपदावर लिंगभावात्मक विचार करणाऱ्या महिला असाव्यात -प्राध्यापक जयदेव डोळे यांचं आवाहन

****

सुधारित कृषी कायदे शेतकऱ्यांना व्यवसायाचे अधिक पर्याय उपलब्ध करून देत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चेच्या उत्तरात बोलत होते. ज्या शेतकऱ्यांना नवे पर्याय नको असतील, त्यांच्यासाठी बाजार समितीचा पर्याय कायम असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. केंद्र सरकार संवेदनशील असावं, देशातल्या जनतेने मागणी करण्यापूर्वी त्यांच्या प्रगतीचे निर्णय सरकारने घेतले पाहिजेत, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. सुधारित कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या पक्षांनी, आपापली सरकारं असलेल्या राज्यांमध्ये काही प्रमाणात असेच निर्णय घेतले असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. आंदोलक आणि आंदोलनजीवी या दोन्हीतला फरक लक्षात घेणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं पावित्र्य आंदोलनजीवी लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी कलंकित केल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशाच्या विकासासाठी सार्वजनिक क्षेत्रासोबतच खासगी क्षेत्राचं योगदानही महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आत्मनिर्भर भारत योजना, संरक्षण आणि सीमा सुरक्षा, पायाभूत सुविधा, कोविड लसीकरण, यासह अनेक विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. पंतप्रधानांच्या उत्तरानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा धन्यवाद प्रस्ताव मंजूर झाला.

****

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ३ लाख ५ हजार ६११ कोटी रुपयांच्या प्रकल्पांची  तरतूद केली असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली, ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही, हा विरोधकांचा आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतुदींमध्ये १लाख ३३ हजार २५५ कोटी रुपयांचे ३२८ रस्त्यांचे प्रकल्प, रेल्वेचे १६ नवे मार्ग, १८ रेल्वे दुहेरीकरण प्रकल्प, मुंबई-पुणे-नागपूर आणि नाशिक मेट्रो रेल्वे प्रकल्प, घरोघरी पाणी पुरवठा योजनेसाठी एक हजार १३३ कोटी, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुष्काळ प्रभावित जिल्ह्यांसाठी १२०० कोटी रुपये, आदी प्रकल्पांचा समावेश असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.

रेल्वेचे ६ हजार ७२२ किलोमीटरचे ३९ प्रकल्प यंदा अर्थसंकल्पात प्रस्तावित आहेत, महाराष्ट्रातल्या मनमाड इंदूर मार्गासाठी ९ हजार ५४७ कोटी, अहमदनगर बीड परळी मार्गासाठी ५७२ कोटी, वर्धा नांदेड यवतमाळ ३४७ कोटी, तर सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या मार्गासाठी २० कोटी रुपये प्राथमिक निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

****

नाशिक तसंच नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी राज्यसरकार आपला खर्च उचलणार असल्याचं, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं विभागातल्या पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. दिल्लीत कृषी कायद्यांवरून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केंद्र शासनानं त्वरित हस्तक्षेप करावा, या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी दोन पावलं मागे घ्यावीत असं आवाहनही पवार यांनी केलं.

****

राज्यातल्या सर्व ६३ नाट्यगृहांच्या देखभालीसाठी एका शिखर संस्थेची स्थापना करावी, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली आहे. ते आज सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. या संस्थेसाठी किमान ५०० कोटी रुपये बँकेत मुदत ठेव असावी, त्याच्या व्याजावर सर्व नाट्यगृहांची देखभाल करता येईल, असं मत दामले यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सर्व कलाकार वर्गातर्फे आपण ही मागणी करत असल्याचं, ते म्हणाले. नगरपलिका किंवा नगरपंचायत क्षेत्रात नाट्यगृह बांधण्यासाठी अनुदान मिळू शकतं, असंही दामले म्हणाले.

****

भाद्रपदातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे येत्या १५ फेब्रुवारीला साजरा होणारा माघी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत. यासंबंधी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून मंडपाचा आकार आणि गणेश मूर्तींची उंची यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोविडचे सावट पूर्णपणे निवळले नसल्यानं, उत्सवाच्या ठिकाणी गर्दी करू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.

****

माध्यमांमध्ये उच्चपदावर लिंगभावात्मक विचार करणाऱ्या महिला असाव्यात, असा आग्रह सर्वांनी धरावा, असं आवाहन प्राध्यापक जयदेव डोळे यांनी केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित 'लिंगभावात्मक चर्चाविश्व' या विषयावर दहा दिवसीय व्याख्यानमालेत ‘लिंगभाव आणि माध्यमे’ या विषयावर ते आज बोलत होते. मराठी माध्यमांमध्ये संपादकीय पदांवर महिलांचं प्रमाण नगण्य असल्याची खंत डोळे यांनी व्यक्त केली. माध्यमांवर जी राजकीय संस्कृती लादली जात आहे. त्या पुरुष वर्चस्ववादी राजकीय पक्षांवर, दडपण आणण्याची गरजही डोळे यांनी व्यक्त केली.

****

लातूरमध्ये उभारण्यात येत असलेल्या मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यात ७० टक्के स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केली आहे. ते लोकसभेत बोलत होते. या कारखान्यास लागणारा कच्चा माल, विशेष कौशल्य याची माहिती दिल्यास, त्यावर आधारित उद्योगांची स्थापना होईल आणि स्थानिक पातळीवर कुशल कामगार तयार होतील, असं श्रृंगारे यांनी सांगितलं.

****

औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज कोविड-19 प्रतिबंधात्मक लस टोचून घेतली. ही लस पूर्णत: सुरक्षित असून कोविडपासून स्वत:बरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकानं ही लस टोचून घेण्याचं आवाहन केंद्रेकर यांनी केलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आरोग्य क्षेत्रात आघाडीवर काम करणारे आरोग्य अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका, तसंच नोंदणी झालेले इतर सर्व शासकीय अधिकारी - कर्मचारी यांनी ही लस टोचून घ्यावी असं, केंद्रेकर यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यात आज कोविड बाधित एक नवीन रुग्ण आढळला, तर जण कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता कोविड बाधितांची संख्या ३ हजार ७८५ झाली असून, आतापर्यंत ३ हजार ६९० रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

परभणी शहरात मालमत्ता तसंच पाणी कर थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा देऊन, उद्यापासून कर वसुली सुरू करण्याचे निर्देश आयुक्त देविदास पवार यांनी दिले आहेत. ते आज मनपाच्या सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत बोलत होते. आतापर्यंत फक्त ९ टक्के वसुली झाली असून, अद्याप ८० कोटी रुपये थकबाकी आहे. मार्चअखेरपर्यंत करवसुलीसाठी पथकं तयार करण्याची सूचना आयुक्तांनी केली.

****

दिव्यांग बांधवांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याची गरज असून, यासाठी प्रबोधन व्हायला हवं, असं मत आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. लातूर पंचायत समितीत सामाजिक अधिकारिता शिबिराचं उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग नागरिकांना सायकलसह इतर आवश्यक उपकरणांचं वाटप करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या नगर परिषदेच्या उद्यानात आज दुपारी अचानक आग लागली. उद्यानातलं बालकांचं खेळण्याचं साहित्य आणि इतर वस्तू या आगीत भस्मसात झाल्या.

****

लातूर इथं मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक सेठ पुरणमलजी लाहोटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेतल्या विद्यार्थ्यांसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. ५ किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी झाले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस तसंच प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

****

नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या अंशत: रद्द करण्यात आली आहे. नांदेडहून निघणारी ही गाडी उद्या दिल्लीपर्यंतच धावेल. दिल्लीहून पुढे अमृतसरला न जाता, परवा ही गाडी दिल्लीहूनच नांदेडला परत येणार आहे.

//***********//

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...