Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 11 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** सर्व सामान्यांना परवडणाऱ्या दरात कोरोना विषाणू संसर्ग
चाचणीसाठी फिरत्या प्रयोगशाळांची सुविधा देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे दोन रुग्णांचा
मृत्यू
** राज्यपालांचा खोळंबा झाल्याप्रकरणी आपली चूक नसल्याचं
राज्य शासनाचं स्पष्टीकरण
आणि
** मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार जाहीर, औरंगाबादच्या
डॉ. सुधीर रसाळ यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार
****
राज्यातल्या सर्व सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोरोना
विषाणू संसर्ग चाचणीसाठी फिरत्या प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी
माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबई इथं `स्पाईस हेल्थच्या` तीन
फिरत्या कोरोना विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळांचं लोकार्पण करताना ते आज बोलत होते.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांचा शोध
घेणं त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणी करून घेणं याला आजही खूप महत्व आहे. त्यानंतरच
उपचार, विलगीकरण करणं शक्य आहे. अशा महत्वाच्या
वेळी सामाजिक दायित्वातून फिरत्या प्रयोग शाळेची ही सुविधा उपलब्ध झाली आहे, असं मुख्यमंत्री
ठाकरे म्हणाले. या चाचणीचं शुल्क ४९९ रुपये असून २४ तासांत अहवाल प्राप्त होत असल्याचं
यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
****
घरातच विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या महाराष्ट्रातील
सुमारे दीड लाख रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे स्पष्ट निर्देश केंद्रीय पथकानं दिले आहेत.
देशभरातील महाराष्ट्रासह काही राज्यात अजूनही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसत असून
तो रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय पथक नुकतंच
राज्यात येऊन गेलं. गेल्या काही दिवसांपासून घरगुती विलगीकरणातील या कोरोना रुग्णांच्या
हालचालींवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचं दिसून आलं असून त्यांच्यामुळे हा संसर्ग प्रसार
आणखी वाढू नये यादृष्टीनं तातडीनं उपाय योजना करण्याचे आदेश केंद्रीय पथकानं दिले आहेत.
स्थानिक प्रशासनानं पोलिसांच्या मदतीनं या रुग्णांवर दैनंदिन लक्ष ठेवण्याची गरज असल्याचंही
यावेळी स्पष्ट करण्यात आलं.
****
राज्यात आरोग्य क्षेत्र तसंच प्रथम प्रतिसाद गटात कार्यरत
पाच लाख ७३ हजारांपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध
लस देण्यात आली आहे. पाच हजार १४९ लोकांना देशांतर्गत निर्मीत कोवॅक्सीन लस देण्यात
आली असल्याची माहिती आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. देशभरात या प्रतिबंधक
लसीकरणाचा लाभ मिळालेल्या व्यक्तींची संख्या आता ७० लाखांहून अधिक झाली आहे. आरोग्य
मंत्रालयानं आज दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७० लाख १७ हजार ११४ जणांना लस देण्यात
आली आहे. काल दिवसभरात चार लाख पाच हजार ३४९ जणांचं लसीकरण झालं असल्याचंही आरोग्य
मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे दोन रुग्णांचा
आज मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता एक
हजार २४३ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ४७ हजार ३९२ झाली आहे. तर
४५ हजार ९०६ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली असून २४० रुग्णांवर सध्या उपचार
सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात
प्रशासनातल्या प्रथम प्रतिसाद गटातल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आज लस घेतली. औरंगाबाद
इथं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय, पोलिस उपायुक्त
दीपक गिऱ्हे यांचा लस घेणाऱ्यांत समावेश होता. ग्रामीण भागातही नियोजित लसीकरण केंदांवर
तहसिलदार,अधिकारी,कर्मचारी,तलाठी,मंडळ अधिकारी यांनी लस घेतली.
****
दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण निर्माण
झाल्यास त्यांना लेखणिक देण्यापासून रोखता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं
आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगासह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना
संधी मिळाली पाहिजे आणि ती दिली जावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले
आहेत. न्यायालयानं दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखणिक देण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना
आणि नियम तयार करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे. या कालावधीमध्ये दिव्यांग
विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा देण्याच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न
करावेत. सर्व स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक ती निवास सुविधा पुरवण्यात यावी तसंच
दिव्यांग व्यक्तींमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारनं पावलं
उचलावित असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना
सरकारी विमानानं उत्तराखंडचा प्रवास नाकारण्यात आल्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी
केलेल्या आरोपांबाबत आपली चूक नसल्याचं राज्य शासनानं म्हटलं आहे. राजभवन सचिवालयानं
राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा
नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्यानं राज्यपालांसारख्या
महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. राजभवनानं राज्यपाल महोदयांना विमान घेऊन जाण्यास मान्यता
देण्याविषयी राज्य शासनाला विनंती केली होती. शासकीय विमान घेऊन जाण्यापूर्वी नियमानुसार
परवानगी मागितली जाते आणि मान्यता मिळाल्यानंतरच विमान उपलब्ध केले जाते असा प्रघात
आहे. यानुसार काल मुख्यमंत्री सचिवालयातून विमान वापराबाबत अद्याप मान्यता दिलेली नसल्याचा
निरोप देण्यात आला होता, असं शासनानं म्हटलं आहे. या प्रकाराबाबत शासनानं देखील गंभीर
दखल घेतली असून राजभवनातील संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा
सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचं शासनातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
भारतीय जनता पक्षानं वस्तू सेवा
कर, मनरेगा आणि आधार यासारख्या योजनांना सुरुवातीला आक्रमक विरोध करुन नंतर स्वतःच
योजना राबवताना भूमिका बदलली नव्हती का, असा प्रश्र्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष
शरद पवार यांचा नामोल्लेख करत, नव्या कृषीकायद्यांच्या धोरणांना पवार यांचा सुरुवातीला
पाठिंबा होता असं म्हटलं होतं. पंतप्रधान मोदी यांनी पवार कृषीमंत्री असताना राज्यांच्या
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा काही भाग वाचून दाखवला होता. त्यात त्यांनी कृषी
कायद्याच्या बदलांबाबत राज्यांना केवळ प्रस्ताव दिला होता आणि पूर्ण अभ्यास करुनच राज्यांनी
त्यावर विचार करावा, असं म्हटलं होतं. सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्यांनी चर्चेला सुरुवात
केली होती, म्हणून त्यांना विरोध झाला नाही, असंही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.
****
यावर्षीचा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला आहे. या
पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रूपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र
असे आहे. यावर्षीचे मराठी भाषा विभागाचे विविध पुरस्कार आज जाहिर करण्यात आले.
यात श्री. पू. भागवत पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरच्या
शब्दालय प्रकाशनला, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार औरंगाबादचे डॉ.सुधीर रसाळ यांना
जाहिर झाला आहे आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन
भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना देण्यात येत
असल्याची घोषणा मराठी भाषा विभाग आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पत्रकार
परिषदेत केली. मराठी भाषेचा प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव
करण्यात शासनास विशेष आनंद होत असून येत्या २७ तारखेला मराठी भाषा दिनी हे पुरस्कार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात येतील, असंही देसाई यांनी
सांगितलं.
****
विशेष रेल्वे गाड्यांच्या आगाऊ तिकीट आरक्षणासाठीचा कालावधी
१० दिवसांवरून १२० दिवस करण्यात आला असल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
नियमित प्रवासी गाड्या सुरू झाल्या नसल्यानं, रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत
आहेत.
****
जालना - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी
- जालना विशेष रेल्वे गाडी रविवारी १४ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. ही रेल्वेगाडी
जालना इथून दररोज सकाळी साडे आठ वाजता सुटून दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी मुंबई
इथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे. मुंबई इथून दुपारी १२ वाजून १०
मिनिटांनी ही गाडी सुटणार असून संध्याकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी जालना इथं पोहचणार
असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
भारतीय निवडणूक आयोगाचे बनावट ओळखपत्र बनवणाऱ्या दोन
जणांना औरंगाबाद इथून अटक करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन माहिती
घेऊन एका खाजगी संकेतस्थळाच्या मदतीनं हे बनावट ओळखपत्र बनवण्यात येत होतं. महा ई सेवा
केंद्रामधील नोकर नवनाथ शिंदे आणि एका खाजगी संगणक केंद्राचा चालक हरिष वाघमारे यांना
पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून बनावट ओळखपत्र तयार करण्यासाठी
वापरण्यात येणारा संगणक आणि प्रिंटर जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी किती जणांचे बनावट ओळखपत्र तयार केले
याचा शोध पोलिस घेत असल्याचं सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी सांगितलं.
//************//
No comments:
Post a Comment