Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 12 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचं पहिल्या टप्प्याचं कामकाज आठ मार्चपर्यंत स्थगित
** राज्यात प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया लवकरच
** नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
** कारखान्यांनी साखर विक्रीच्या मासिक मर्यादेचं उल्लंघन केल्यास साखर आयुक्तांचा कारवाईचा इशारा
आणि
** नगरसोल स्थानकावरून गेल्या सव्वा महिन्यात ५० किसान रेल्वेंच्या माध्यमातून देशभरात १९ हजार टन कांदा वाहतुक
****
राज्यसभेचं कामकाज येत्या
आठ मार्चपर्यंत स्थगित झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनातलं सदनाचं पहिल्या टप्प्याचं कामकाज
येत्या सोमवारी स्थगित होणार होतं, मात्र आज सदनाचं कामकाज दुपारी तीन वाजेपर्यंत चालवून
या पहिल्या टप्प्याची सांगता झाली.
दरम्यान, त्यापूर्वी केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं.
यंदाचा अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्या म्हणाल्या,
टाळेबंदीमुळे मदतीची गरज असलेल्यांना या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, तसंच देशाच्या
आर्थिक विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना हा अर्थसंकल्प सहायक ठरेल, असा विश्वासही
सीतारामन यांनी व्यक्त केला.
तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतले
खासदार दिनेश त्रिवेदी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेतच त्यांनी ही
घोषणा केली. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसक घटनांमुळे व्यथित होऊन राजीनामा
देत असल्याचं त्रिवेदी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे
देश कोविड संकटातून बाहेर पडल्याचं, त्रिवेदी यांनी नमूद केलं.
****
राज्यातली महाविद्यालयं
तसंच विद्यापीठांमध्ये रिक्त जागांवर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती लवकरच केली
जाणार असल्याचं, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते आज
सोलापूर इथं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी
बोलत होते. राज्य शासनाची आर्थिक स्थिती बेताची असल्यानं अनेक भरती प्रक्रिया रखडल्या
आहेत. मात्र शिक्षणाच्यादृष्टीने प्राचार्य तसंच प्राध्यापकांची रिक्त पदं भरणं आवश्यक
असल्यानं, महाविद्यालयं तसंच विद्यापीठांकडून रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली असल्याचं,
सामंत यांनी सांगितलं.
शासनाच्या वतीनं प्रत्येक
जिल्ह्यात एक स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र सुरु करण्यात येणार असून, प्रत्येक विद्यापीठात
लवकरच विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली
राज्यभरातली महाविद्यालयं
येत्या सोमवारपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.
****
पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत गोरेगाव इथं ‘इंडियन ऑटो शो’चं उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यशासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र धोरण आणलं आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या क्षेत्राला मोठा वाव असेल, असं देसाई यांनी सांगितलं. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
****
राज्यात नुकतेच निवडून आलेले सरपंच, उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्यांना
ग्रामविकासविषयक विविध बाबींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी
ही माहिती दिली. यशदा, पंचायतराज प्रशिक्षण केंद्रे तसंच पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी
यांच्या माध्यमातून राज्यभरात विविध
भागात हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात
येईल. सदस्यांची संख्या जास्त असल्यानं टप्प्या टप्प्याने हा प्रशिक्षणं कार्यक्रम राबवला जाणार असून पहिल्या टप्प्यात
७७ हजार ५०० जणांना प्रशिक्षण दिलं
जाईल, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
यशवंती वसंत जामदार-घाणेकर यांचं मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं,
त्या ८१वर्षांच्या होत्या. ठाणे जिल्ह्यासह मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यात संजय
गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर आणि इतरत्र भागातील हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यात बळी
पडणाऱ्यांचे नातेवाईक तसंच गंभीर जखमी होणाऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याच्या
कार्यामुळे घाणेकर यांना वाघवाली ताई अशी ओळख मिळाली होती.
****
महाविकास आघाडी सरकार
वीजबील माफीचं आश्वासन न पाळता, थकबाकीदारांवर कारवाई करत आहे, याविरोधात आंदोलनाचा
इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे, ते आज नागपुरात पत्रकार
परिषदेत बोलत होते. या सरकारनं जनतेला १०० युनिट वीज माफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र
आता वीज जोडण्या खंडीत केल्या जात आहेत, याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधलं. शेतकरी आणि
गरीबांवर हे सरकार अन्याय करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
****
साखर कारखान्यांनी हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास तसंच खुल्या बाजारात साखर विक्रीच्या मासिक मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. नियमांचं पालन न केल्यास संबंधित साखर कारखान्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केंद्र सरकारने साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. साखरेची मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधण्यासाठी खुल्या बाजारात प्रत्येक कारखान्याने किती साखर विक्री करावी, यासाठी साखर विक्रीचा दरमहा कोटा ठरवून देण्यात आला असल्याचं गायकवाड यांनी याबाबतच्या आदेशात नमूद केलं आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नगरसोल स्थानकावरून गेल्या
सुमारे सव्वा महिन्यात ५० किसान रेल्वेंनी देशाच्या विविध भागात कांदा वाहतुक केली
आहे. सुमारे १९ हजार ३१८ टन कांदा या रेल्वेंनी देशभरात पोहोचवला असून, यातून नांदेड रेल्वे विभागास ९ कोटी २९ लाख रुपये उत्पन्न मिळालं. किसान रेल्वे ने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० % सूट देण्यात आली. विभागातील इतर ठिकाणाहून ही किसान रेल्वे सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मार्च
अखेरपर्यंत आणखी ५० किसान विशेष रेल्वे
गाड्या सोडण्याचं उद्दीष्ट असून, विविध ठिकाणांसाठी ९० किसान रेल्वेंची मागणी नोंदवण्यात आली आहे. शेतकरी तसंच व्यापाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी केलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज
यांची जयंती कोणत्याही अटी शर्तीविना साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय
जनता युवा मोर्चाच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
युवा मोर्चाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी कार्यकर्त्यांसह
या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. शिवजयंती कार्यक्रमांवर अटी लावण्याच्या
राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकारनं शिवजयंतीसाठी
मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक फेरी तसंच मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त १०० व्यक्तींच्या
उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा
कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्यात
आली आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं
शिवजयंतीनिमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा शिवजयंती महोत्सव
समितीचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांसाठी
निबंध, चित्रकला, वेशभूषा, वक्तृत्व स्पर्धा, शहरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची
स्वच्छता आणि अभिवादन, १९ फेब्रुवारीला क्रांती चौक इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्यास दुग्धाभिषेक तसंच ध्वजारोहण तसंच मिरवणुक काढण्यात येणार असल्याचं, या पत्रकार
परिषदेत सांगण्यात आलं.
****
महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठीची वसतीगृह सुरु
करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी
परिषद लातूर शाखेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत
निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन
देण्यात आलं. येत्या सोमवारपासून महाविद्यालयं
सुरू होत असल्यानं, विद्यार्थ्यांची शहरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी वसतीगृहं सुरू
करावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे
****
परभणी जिल्ह्यातल्या लोअर
दुधना प्रकल्पातून आजपासून तिसरी पाणीपाळी सोडण्यात आली. २५ फेब्रुवारीपर्यंत हे पाणी
सुरू राहणार आहे. लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी या पाण्याचा वापर
करावा, असं आवाहन करण्यात आले आहे. या पाण्याचा सेलू, मानवत, परभणी तसंच जिंतूर तालुक्यात
१३ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी लाभ होणार आहे.
****
औरंगाबाद
पंचायत समितीच्या वतीनं औरंगाबाद इथं जिल्हा परिषद शिक्षक, तसंच कर्मचाऱ्यांच्या
विविध कला क्रीडा स्पर्धा घेण्यात
आल्या. सुमारे पाचशेहून अधिक शिक्षकांनी यात
सहभाग घेतला. शिक्षकांमधील कला गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी अशा स्पर्धा
घेणं आवश्यक असल्याचं मत पंचायत समितीच्या सभापती छाया घागरे यांनी अध्यक्षीय समारोपात
व्यक्त केलं.
****
धुळे जिल्हा न्यायालयाच्या
आवारात आज १५ ते २० कावळे दगावल्याचं आढळून आलं. धुळे शहरापासून १० किलोमीटर अंतरावर
असलेल्या मेहेरगावात बर्ड फ्ल्यू ची साथ पसरली आहे. त्याभागातल्या सुमारे १० हजार कोंबड्या
पशु संवर्धन विभागाने नष्ट केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे शहरात कावळे मृतावस्थेत
आढळल्यानं धुळे शहरातही बर्ड फ्ल्यू पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
****////****
No comments:
Post a Comment