Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 February
2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१३ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
** यंदाचा अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताच्या
दिशेने महत्त्वाचं पाऊल -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन; अर्थसंकल्पीय अधिवेशनात
राज्यसभेचं पहिल्या टप्प्याचं कामकाज आठ मार्चपर्यंत स्थगित
**
राज्यात प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या रिक्त
जागांवर भरती प्रक्रिया लवकरच
**
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच तसंच ग्रामपंचायत
सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम
** राज्यात काल नवे तीन हजार ६७० कोविडग्रस्त; मराठवाड्यात दोघांचा मृत्यू तर नव्या २२० रुग्णांची नोंद
**
नगरसोल स्थानकावरून गेल्या सव्वा महिन्यात ५० किसान रेल्वेंच्या माध्यमातून १९ हजार
टन कांदा वाहतुक
** लातूर महानगरपालिका शहरात ५ मेगावॅट
क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
आणि
** जालना जिल्ह्यात भरधाव कार विहिरीत पडून दोघांचा
मृत्यू
****
यंदाचा अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारताच्या
दिशेने महत्त्वाचं पाऊल असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं
आहे. काल राज्यसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना, अर्थमंत्र्यांनी विरोधकांचे
आरोप खोडून काढत, या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी केलेल्या तरतुदींचा आढावा घेत,
सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. टाळेबंदीमुळे मदतीची गरज असलेल्यांना
या अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, तसंच देशाच्या आर्थिक विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना
हा अर्थसंकल्प सहायक ठरेल, असा विश्वासही सीतारामन यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेच्या
पहिल्या टप्प्याचं कामकाज काल स्थगित झालं. आता येत्या आठ मार्चला अर्थसंकल्पाच्या
दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे.
****
देशभरात कोणतंही आकाशवाणी केंद्र बंद होणार नाही, तसंच त्यांची श्रेणीकपातही होणार
नाही, असं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत सांगितलं. ते
एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. कोविड प्रादुर्भावाचा आकाशवाणीच्या कामकाजावरही
नक्कीच परिणाम झाला आहे. मात्र आकाशवाणीच्या उद्घोषकांनी कोविडसंदर्भात जनजागृतीचं
मोठं काम केल्याचं, जावडेकर यांनी यावेळी नमूद केलं.
****
मनमाड ते परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणाचा मुद्दा खासदार
डॉ भागवत कराड यांनी काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. औरंगाबाद
इथं पीटलाईनचं सर्वेक्षण झालं असून, हा प्रश्न प्रलंबित असल्याकडे कराड यांनी लक्ष
वेधलं
****
राज्यातली महाविद्यालयं तसंच विद्यापीठांमध्ये
रिक्त जागांवर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती लवकरच केली जाणार असल्याचं, उच्च
आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते काल सोलापूर इथं, पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. राज्य
शासनाची आर्थिक स्थिती बेताची असल्यानं अनेक भरती प्रक्रिया रखडल्या आहेत. मात्र शिक्षणाच्यादृष्टीने
प्राचार्य तसंच प्राध्यापकांची रिक्त पदं भरणं आवश्यक असल्यानं, महाविद्यालयं तसंच
विद्यापीठांकडून रिक्त पदांची माहिती मागवण्यात आली असल्याचं, सामंत यांनी सांगितलं.
शासनाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात
एक स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र सुरु करण्यात येणार असून, प्रत्येक विद्यापीठात
लवकरच विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली
राज्यभरातली महाविद्यालयं येत्या सोमवारपासून
सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.
****
पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक वाहनांना येत्या काही दिवसांत मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी
व्यक्त केलं आहे. मुंबईत गोरेगाव इथं ‘इंडियन ऑटो शो’चं उद्घाटन
देसाई यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते
बोलत होते. राज्यशासनाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र धोरण आणलं आहे. याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार
निर्माण होऊन भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या क्षेत्राला मोठा वाव असेल,
असं देसाई यांनी सांगितलं. तीन दिवस
चालणाऱ्या या प्रदर्शनात प्रमुख ऑटोमोबाईल
कंपन्या सहभागी झाल्या आहेत.
****
राज्यात नुकतेच निवडून आलेले सरपंच, उपसरपंच तसंच ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामविकासविषयक विविध बाबींच्या
अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती
दिली. यशदा, पंचायतराज प्रशिक्षण केंद्रे
तसंच पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी
यांच्या माध्यमातून राज्यभरात विविध
भागात हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात
येईल. सदस्यांची संख्या जास्त असल्यानं टप्प्या टप्प्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार असून पहिल्या टप्प्यात
७७ हजार ५०० जणाना प्रशिक्षण दिलं
जाईल, असं मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
महाविकास आघाडी सरकार वीजबील माफीचं आश्वासन न पाळता,
थकबाकीदारांवर कारवाई करत आहे, याविरोधात आंदोलनाचा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी दिला आहे, ते काल नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. या सरकारनं जनतेला
१०० युनिट वीज माफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता वीज जोडण्या खंडीत केल्या जात आहेत,
याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधलं. शेतकरी आणि गरीबांवर हे सरकार अन्याय करत असल्याची
टीकाही त्यांनी यावेळी केली.
****
बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या आणि या प्रकरणांशी
संबंधित सामाजिक संपर्क माध्यमांमधे व्हायरल
होत असलेल्या ध्वनीफितींची चौकशी करावी अशी मागणी, विधानसभेतले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
यासंदर्भात फडणवीस यांनी राज्याचे पोलीस
महासंचालक हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणाशी संबंधित १२ ध्वनिफिती तपासणीसाठी पाठवत असल्याचंही फडणवीस यांनी या
पत्रात नमूद केलं आहे.
****
साखर कारखान्यांनी हमी भावापेक्षा कमी दराने साखर विक्री केल्यास तसंच खुल्या बाजारात साखर विक्रीच्या मासिक मर्यादेचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.
नियमांचं पालन न केल्यास संबंधित साखर
कारखान्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केंद्र सरकारने साखर विक्रीची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपये प्रति
क्विंटल निश्चित केली आहे.
****
राज्यात काल तीन हजार ६७० नव्या
कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ५६ हजार ५७५ झाली आहे.
काल ३६ रुग्णांचा या
संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१
हजार ४५१ झाली असून, मृत्यूदर दोन
पूर्णांक ५० शतांश टक्के
झाला आहे. काल दोन हजार ४२२ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ७२ हजार ४७५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले
असून, कोविडमुक्तीचा
दर ९५ पूर्णांक ९१ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ३१ हजार ४७४ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
दरम्यान, काल राज्यभरात ७९६ लसीकरण सत्रात ४० हजार लाभार्थ्यांचं
कोविड लसीकरण करण्यात आलं. राज्यात आतापर्यंत सहा लाख ४८ हजार ५७३ आरोग्य कर्मचारी
तसंच आघाडीवर कोविड योद्ध्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात काल हिंगोली आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोना विषाणू
बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २२० रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात ७१
नवे रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात ४५, लातूर ३५, नांदेड २०, बीड १६, उस्मानाबाद १२, परभणी ११, तर हिंगोली जिल्ह्यात काल १०
नवे रुग्ण आढळून आले.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात
असोलवाडी इथं एका शेतकऱ्याच्या तीनशे कोंबड्या दोन दिवसात दगावल्या आहेत. मयत कोंबड्यांचे
नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यात
धांडे पिंपरी आणि कृष्णापूर इथं बर्ड फ्लूची लागण झालेल्या हजारो कोंबड्या नष्ट करण्यात
आल्या होत्या.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नगरसोल स्थानकावरून गेल्या सुमारे सव्वा महिन्यात ५० किसान
रेल्वेंनी देशाच्या विविध भागात कांदा वाहतुक केली आहे. सुमारे १९ हजार ३१८ टन कांदा
या रेल्वेंनी देशभरात पोहोचवला असून, यातून नांदेड रेल्वे विभागास ९ कोटी २९ लाख रुपये
उत्पन्न मिळालं. मार्च अखेरपर्यंत
आणखी ५० किसान विशेष रेल्वे गाड्या
सोडण्याचं उद्दीष्ट असून, विविध ठिकाणांसाठी ९० किसान रेल्वेंची मागणी नोंदवण्यात आली आहे. शेतकरी तसंच व्यापाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी केलं आहे.
****
लातूर महानगरपालिकेने ५ मेगावॅट क्षमतेच्या
सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला मान्यता दिली आहे. काल झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण
सभेत यासह विविध ३४ विषयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे
यांनी दिली. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन खरेदीसाठी १ कोटी तसेच महानगरपालिकेचा वाटा
म्हणून ४ कोटी रुपयांचा निधी देण्यासही सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. हा प्रकल्प उभा
केल्यास वीजेबाबत लातूर मनपा स्वयंपूर्ण होणार आहे. दरम्यान, नियमितपणे मालमत्ता कर
भरणाऱ्या नागरिकांना १२ टक्के करसवलत देण्याचा निर्णयही महापालिकेनं घेतला आहे. माजी
सैनिक तसंच सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता कर माफ करण्यासही महापालिकेच्या सर्वसाधारण
सभेने काल मंजुरी दिली.
****
औरंगाबाद शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार
आहेत. महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी ही माहिती दिली. याबाबत टाटा मोटर्स
आणि टाटा पॉवर कंपनीसोबत चर्चा झाल्याची माहिती पांडेय यांनी दिली आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
कोणत्याही अटी शर्तीविना साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा
मोर्चाच्या उस्मानाबाद शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. युवा मोर्चाचे
उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी
या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. शिवजयंती कार्यक्रमांवर अटी लावण्याच्या
राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत असल्याचं राजेनिंबाळकर यांनी सांगितलं.
दरम्यान, सरकारनं शिवजयंतीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून,
कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, दुचाकी फेरी तसंच मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत छत्रपती
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी
करण्याची सूचना शासनानं केली आहे.
दरम्यान, औरंगाबाद इथं शिवजयंतीनिमित्तानं
विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष
जगन्नाथ काळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोविड संबंधी नियमांचं पालन
करून शिवजयंती साजरी केली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीची वसतीगृह
सुरु करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी
परिषद लातूर शाखेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत
निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन
देण्यात आलं. येत्या सोमवारपासून महाविद्यालयं
सुरू होत असल्यानं, विद्यार्थ्यांची शहरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी वसतीगृहं सुरू
करावीत, असं या निवेदनात म्हटलं आहे
****
जालना जिल्ह्यात जामवाडी परिसरात भरधाव कार विहिरीत पडून झालेल्या
अपघातात दोघांचा मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला. देऊळगावराजाकडे जाणारी भरधाव
कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्यागलतच्या विहिरीत जाऊन पडली. मयत दोघे बीड इथले
रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या लोअर दुधना प्रकल्पातून
तिसरी पाणीपाळी सोडण्यात आली आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत हे पाणी सुरू राहणार आहे. लाभक्षेत्रातल्या
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी या पाण्याचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद पंचायत समितीच्या वतीनं औरंगाबाद इथं जिल्हा परिषद शिक्षक, तसंच
कर्मचाऱ्यांच्या विविध कला क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. सुमारे
पाचशेहून अधिक शिक्षकांनी यात सहभाग घेतला. शिक्षकांमधील कला गुणांना वाव मिळण्यासाठी
दरवर्षी अशा स्पर्धा घेणं आवश्यक असल्याचं मत पंचायत समितीच्या सभापती छाया घागरे यांनी
अध्यक्षीय समारोपात व्यक्त केलं.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
संचालक मंडळाच्या १९ जागांच्या निवडणुकीसाठी २० मार्च रोजी मतदान होणार आहे, यासाठी
१५ फेब्रुवारीपासून २२ फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २३ फेब्रुवारीला
अर्जांची छाननी होईल, तर २४ तारखेपासून १० मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
२० मार्चला मतदान तर २१ मार्चला मतमोजणी होणार आहे.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळात परभणी
इथं कार्यरत किशन विठ्ठलराव शिर्लेकर यांना कामगार कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण
पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याबद्दल काल त्यांचा परभणी इथं मध्यवर्ती कार्यालयात
उपमहाव्यवस्थापक माधव काळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
****
हिंगोली इथं काल १९ वी अखिल भारतीय
बौध्द धम्म परिषद झाली. भदंत धम्मसेवक, भदंत डॉ. उपगुप्त महास्तवीर यांच्यासह अनेक
मान्यवर या परिषदेत सहभागी झाले. मान्यवर भिक्खुगणांनी यावेळी धम्मदेसना दिली.
****
जालना जिल्ह्यात राजूर मार्गावर असलेल्या वखार महामंडळाच्या
गोदामाला काल अचानक आग लागली. या गोदामामध्ये असलेला सीसीआयमार्फत खरेदी केलेला कापूस
या आगीत भस्मसात झाला. अग्निशाकम दलाच्या सात बंबांच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली.
****
हिंगोली जिल्हा पोलिसांनी वाळूची चोरटी
वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर पकडून २३ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. इडोळी ते साटंबा
मार्गावर ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात
आला आहे.
****
क्रिकेट
-
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी
क्रिकेट सामना आजपासून चेन्नई इथं सुरू होत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना
जिंकून, मालिकेत इंग्लंड एक शून्यनं आघाडीवर आहे
//*************//
No comments:
Post a Comment