Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 09 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** हाफकिन संस्थेत अद्ययावत लस संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी सहकार्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आश्वासन
** प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसाचार प्रकरणी फरार अभिनेता
दीप सिद्धू याला अटक; नांदेड इथून खालिस्तानी दहशतवादी जेरबंद
** लातूर शहर महानगरपालिकेला ODF ++ मानांकन प्राप्त
** प्रसिध्द अभिनेता राजीव कपूर याचं निधन
आणि
** चेन्नई क्रिकेट कसोटीत इंग्लंड संघाचा भारतावर २२७ धावांनी विजय
****
हाफकिन संस्थेत अद्ययावत लस संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी, राज्य शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज हाफकिन इन्स्टिटयूट संदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, हाफकिन संस्थेच्या संचालक सीमा व्यास, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हाफकिन संस्थेच्या आगामी पाच प्रकल्पासाठी अकराशे कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचं डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं म्हटलं आहे, येत्या १५ दिवसात याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्याची सध्याची परिस्थिती पाहता कोविडवरील लसीसाठी हाफकिन संस्थेने लवकर संशोधन करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात आतापर्यंत पाच
लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांना कोविड लस देण्यात आली आहे. आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत कोविन पोर्टलवर १० लाख ५४ हजार आरोग्य
कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४ लाख ६८ हजार २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण
झालं आहे. ५ लाख ४७ हजार कोविड योद्ध्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४१ हजार ४५३
जणांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात
५० वर्षावरील व्यक्तींचं लसीकरण केलं जाणार असून, त्याची नोंदणी साधारणपणे एक मार्चपासून
सुरू होऊ शकते, असं टोपे यांनी सांगितलं.
****
मुलांच्या तुलनेत मुली हुशार असून विविध विषयांत प्रगती करीत असल्याचं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. गोंदिया इथं शिक्षण महर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११५ व्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. यावेळी जिल्ह्यातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रत्येक व्यक्तीने समाजासाठी काहीतरी करावं, असा सल्लाही राज्यपालांनी आपल्या भाषणातून दिला.
****
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत
झालेल्या हिंसाचार प्रकरणी फरार अभिनेता दीप सिद्धू याला पोलिसांनी अटक केली आहे. आंदोलक
शेतकऱ्यांना भडकावणं, लाल किल्ल्यावर घेऊन जाणं, आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा त्याच्यावर
आरोप आहे. गेल्या १४ दिवसांपासून तो फरार होता. भारतीय किसान युनियनचे हरयाणातले प्रमुख
गुरनाम सिंह चाडूनी, स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी सिद्धूवर शेतकरी आंदोलकांना
भडकावून लाल किल्ल्यावर नेल्याचा आरोप केला होता. राजकीय पक्षांकडूनही दीप सिद्धूला
अटक करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. आज त्याला हरियाणातल्या कर्नाल इथून अटक
करण्यात आली.
****
खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला
नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. सरबजीतसिंग किरट असं त्याचं नाव असून, तो खलिस्तान
जिंदाबाद संघटनेचा सदस्य असल्याचं समजतं. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी
पैसे पुरवले जात होते. या प्रकरणी पंजाबच्या अमृतसरमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला होता. त्यापैकी तिघांना अटक
झाली होती, तर सरबजीतसिंग हा नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली
होती. त्यावरून पंजाब पोलिसांचे सीआयडी पथक नांदेड शहरात दाखल झालं, नांदेडच्या स्थानिक
गुन्हे शाखेच्या सहाकार्याने शिकारघाट परिसरातून सरबजीतसिंग याला अटक करण्यात आली आहे.
****
लातूर
शहर महानगरपालिकेला ODF ++ मानांकन प्राप्त झालं आहे. असं मानांकन असलेल्या
देशभरातल्या मोजक्या शहरांमध्ये लातूर शहराचा समावेश झाल्याबद्दल
महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर
चंद्रकांत बिराजदार यांनी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं
अभिनंदन केलं आहे. शहरातल्या प्रत्येक घरात शौचालय असावं,
महानगरपालिकेचा मानवी मैला प्रक्रिया
प्रकल्प असावा, या सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर शहराची
तपासणी करून हे मानांकन देण्यात आलं.
****
माझी वसुंधरा अभियानाच्या
निमित्तानं परभणी इथं आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी
महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देविदास पवार तसंच अन्य
अधिकारी-कर्मचारी सायकलवर कार्यालयात पोहचले. या अभियाना अंतर्गत आता दर मंगळवारी हे
सर्व अधिकारी, कर्मचारी सायकलवर कार्यालयात येणार आहेत. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी
माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवून परभणी जिल्ह्यास पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत
अग्रभागी ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे.
****
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह
सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांच्या हस्ते नांदेड
इथं महापालिकेच्या रुग्णालयात
रुग्णवाहिका, एक्सरे आणि सोनोग्राफी यंत्रांचा लोकार्पण सोहळा आज
झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर यावेळी
उपस्थित होते. शासकीय रुग्णालयांच्या
धर्तीवर महापालिकेची रुग्णालयंही अत्याधुनिक
यंत्रासह बळकट करण्यावर चव्हाण यांनी
आपल्या भाषणातून भर दिला.
****
प्रसिद्ध अभिनेते आणि
निर्माते राजीव कपूर यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ५८ वर्षांचे
होते. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून विशेष ओळख मिळालेल्या राजीव कपूर यांनी,
एक जान है हम’, ‘जलजला’,’ लव्ह मॅरेज’ आदी चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या. ‘प्रेम
ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. ऋषी कपूर यांच्यापाठोपाठ राजीव
कपूर यांच्या निधनानं वर्षभरात कपूर कुटुंबावर झालेला हा दुसरा आघात धक्कादायक असल्याची
भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज नव्याने २७ कोविडबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आताकोविडबाधित रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ७०० झाली आहे. आतापर्यंत ५८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, २१ हजार ६६४ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून बरे झाले आहेत. आजही कोविड संसर्गातून मुक्त झालेल्या ३० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.सध्या २३८ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात आज कोविड बाधित चार नवे रुग्ण आढळले, तर १० जण कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता कोविड बाधितांची संख्या ३ हजार ७८४ झाली असून, आतापर्यंत ३ हजार ६८४ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
टाळेबंदीच्या काळात सर्वत्र
शाळा बंद असताना, परभणी जिल्ह्यात गाव पातळीवर अभ्यास गटांच्या माध्यमातून प्राथमिक
विभागातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं. यात गावोगावचे शिक्षणप्रेमी, उच्चशिक्षीत
तरुण सहभाग झाले होते. एक लाखावर विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला. राज्यात फक्त
परभणी जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणाऱ्या शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी
याबाबत अधिक माहिती दिली.
कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुध्दा आमचा अभ्यास कुठेही थांबला नाही.
अशा प्रकारचा सातत्यपुर्ण प्रयोग आमच्या जिल्ह्यामध्ये एक हजार १५८ शाळांमध्ये, १५
हजार ११३ अभ्यास गटांच्या माध्यमातून, एक लाख दोन हजार ७४ विद्यार्थी या अभ्यासात सहभागी
झाले होते. गावातल्या सर्व मंडळींनी याला मदत केली. शिक्षकांच पण त्यांना विशेष सहकार्य
होतं. शिक्षक आणि गावकरी या दोघांनी मिळून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये
यासाठी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलं होतं. शाळी ही आमची दररोज सुरु होती. आणि याचे
आम्हाला यश पण दिसून आलेले आहे.
****
मुख्यमंत्री जलसंवर्धन
सारख्या योजनांत लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन आमदार धीरज देशमुख यांनी
केलं आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या गावांच्या विकास कामांसंदर्भात जिल्हाधिकारी
कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत देशमुख बोलत होते. रस्त्यांची कामे प्राधान्याने
व्हावीत, विशेष बाब म्हणून अशा रस्त्यांसाठी निधीची तरतूद करावी. रस्त्यांच्या सद्यस्थितीचं
ऑडीट करावं, उपलब्ध जलसाठा विचार घेऊन योजना राबवाव्यात, असं देशमुख यांनी सांगितलं.
पाणी पुरवठा योजना राबवताना वाढत्या लोकसंख्येचाही विचार करावा लागेल, असं आमदार देशमुख
यांनी नमूद केलं.
****
चेन्नई
क्रिकेट कसोटीत इंग्लंड संघानं भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला, विजयासाठी आवश्यक
असलेल्या ४२० धावसंख्येचा पाठलाग करताना, भारतीय संघाचा दुसरा डाव १९२ धावांवर संपुष्टात
आला. विराट कोहलीनं ७२ तर शुभमन गिलने ५० धावा केल्या. या मालिकेतला दुसरा सामना येत्या
१३ फेब्रुवारीपासून चेन्नईतच सुरू होणार आहे.
****
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात मौजे चांदापूर इथं दरवर्षीप्रमाणे काल सातवी बौद्धधम्म परिषद घेण्यात आली. या धम्म परिषदेला राज्यभरातून मान्यवर भन्ते तसंच
भिक्खू सहभागी झाले होते. "सम्यक संकल्प" या फेसबुक पेजवरून या परिषदेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं.
****
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी
बाधित शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात अनुदान प्राप्त झालं आहे. काही तालुक्यात लाभार्थी
शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचं वाटप यापूर्वी करण्यात आलं असून, काही तालुक्यात अनुदान
वाटप प्रलंबित होतं. आता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा
करण्यात येत आहेत.
****////****
No comments:
Post a Comment