आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर
चर्चा सुरु झाली आहे. तत्पूर्वी राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर सभापती व्यंकय्या
नायडू यांनी, काल विरोधकांनी घातलेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त केली. चर्चेची वेळ
आली असतानाही गोंधळ करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आम आदमी पक्षाच्या तीन सदस्यांना
सभापतींनी निलंबित केलं आहे.
****
साखर कारखान्यांना हाताळणी आणि इतर प्रक्रिया खर्चासह विपणन
खर्चासाठी, सरकारने तीन हजार ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ग्राहक कामकाज, अन्न
आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात
ही माहिती दिली. यामुळे २०२०-२१ च्या हंगामात साखरेची निर्यात होण्यास मदत होईल आणि
साखर कारखानदारांच्या ऊस दराची थकबाकी देवून शेतकरी सक्षम होईल, असं ते म्हणाले.
****
संरक्षण क्षेत्रासाठी आपला देश इतर देशांवर अवलंबून राहू शकत
नसल्याचं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. बंगळुरू इथं हिंदुस्थान एरोनॉटिक्स
लिमिटेडच्या दुसऱ्या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रोडक्शन लाईनच्या शुभारंभ प्रसंगी ते
बोलत होते. भारतात तयार करण्यात आलेलं तेजस एम-1-ए लढाऊ विमान खरेदी करण्यात कित्येक
देश उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितले.
****
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सहा
खासदारांनी काल गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी
शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी चर्चा केली. आम्ही पूर्ण ताकदीनीशी शेतकऱ्यांसोबत
उभे आहोत, सरकारने त्यांच्याशी योग्यरित्या चर्चा केली पाहिजे, चर्चेत कोणतंही राजकारण
येऊ देऊ नये, असं राऊत यावेळी म्हणाले.
****
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या
विहंग गार्डन इथल्या बेकायदा बांधकामाप्रकरणी, ठाणे महापालिकेनं ठोठावलेला १८ कोटी
रुपयांचा दंड, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ २५ लाख रुपयांवर आणला आहे, असा आरोप,
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सरनाईक यांच्या अटकेच्या
मागणीसाठी सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली, महापालिकेबाहेर काल ठिय्या आंदोलन करण्यात
आलं.
****
सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला आहे. यामध्ये नव्या
अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईच्या कोमल जैननं ७५ टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक
मिळवला आहे.
****
No comments:
Post a Comment