Friday, 5 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ फेब्रुवारी २०१९ दुपारी १.०० वा.

****

सुधारीत कृषी कायद्यांमध्ये असलेले आक्षेप शेतकरी संघटनांनी अद्याप सांगितलेच नसल्याचं, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते. आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांसोबत शांततेत चर्चा करण्याचा सरकारनं पूर्ण प्रयत्न केला, अनेक प्रस्ताव दिले, मात्र शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचं, तोमर म्हणाले. या चर्चेदरम्यान अनेक विरोधी पक्ष सदस्यांनी कायद्यांच्या विरोधात मतं मांडली, मात्र कोणीही कायद्यातल्या शेतकऱ्यांच्या अनुकूल तरतुदी सांगितल्या नसल्याचंही, त्यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल व्हावे, यासाठी हे कायदे असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. 

चर्चेत सहभागी होत भारतीय जनता पक्षाचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी, कृषी कायद्यांसंदर्भात शेतकरी संघटनांना असलेले प्रश्न सोडवता येऊ शकतील, असं सांगितलं.

कृषी विधेयकाला अध्यादेशाच्या रुपात का आणलं गेलं, असा प्रश्न काँग्रेसचे खासदार प्रतापसिंह बाजवा यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चेत सहभागी होत, कोविड महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांची प्रशंसा केली. सरकारनं कृषी कायदे रद्द करण्याची मागणी पटेल यांनी केली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, राजकीय नेते आणि पत्रकारांवर लावलेल्या देशद्रोहाच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं वर्तमान आर्थिक वर्षातलं शेवटचं द्वैमासिक पतधोरण आज जाहीर केलं. यामध्ये रेपो दर चार टक्के, तर रिव्हर्स रेपो दर तीन पूर्णांक ३५ शतांश टक्के कायम राखण्यात आला आहे. वर्ष २०२१-२२ दरम्यान सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर दहा पूर्णांक पाच टक्के राहील, असा अंदाज गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केला आहे.

****

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची पाहणी केली. लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा तयार करावा, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तरच हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं.

दरम्यान, मुख्यमंत्री आज औरंगाबादच्या दौऱ्यावरही असून, पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दिल्ली गेट इथं बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या कामाची पाहणी करुन, ते शहरातल्या विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत.

****

राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राज्यातल्या १०० आदर्श शाळांच्या निवडीसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान” राबवण्यात येत आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या चार शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना भेटी देऊन, आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. यामध्ये पालम तालुक्यातल्या सायाळा, पुयनी, नाव्हा आणि गंगाखेड तालुक्यातल्या डोंगरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा समावेश आहे.

****

बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो दस्तनोंदणी करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद नगर परिषदेमधल्या तीन कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. धर्माबाद नगर परिषदेच्या काही कर्मचारी आणि शहरातल्या दलालांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारावर शहरातल्या विविध मालमत्तेचं दस्तनोंदणी करून घेतली, तसंच तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. देवरे यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली असता, त्यामध्ये पालिकेतले चार कर्मचारी आणि बिलोली नगर परिषदेतला एक कर्मचारी दोषी असल्याचं आढळून आलं होतं. या प्रकरणातले इतर तीन आरोपी फरार असून, त्यांचा शोध सुरु आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या मुगट इथं माझा गाव सुंदर गाव उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, यावेळी उपस्थित होते. या उपक्रमातंर्गत मुगट इथं वृक्ष लागवड, ग्राम सफाई, मुलींच्या जन्माचं स्वागत, कचरा व्यवस्थापन, शौचालय बांधकाम, रक्तदान शिबीर आदी कार्यक्रम घेण्यात आले.

****

हिंगोली जिल्ह्यात महारेशीम अभियान सुरु असून, जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांनी केलं आहे. सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातल्या ४० च्या वर शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगातून दिड लाखाच्यावर उत्पन्न घेतलं असल्याचं त्यांनी सांगितलं.  

****

भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नई इथं सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या दोन बाद ८१ धावा झाल्या होत्या. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...