Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 February
2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०५ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
·
नाना पटोले यांचा
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा.
·
मुख्यमंत्री जलसंवर्धन
कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
·
इंग्लंड आणि ब्राझीलमध्ये
कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव पाहता, अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज - मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे.
·
राज्य शासनाचा भारतरत्न
पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम यांना जाहीर.
·
औरंगाबादसह राज्यभरात
वीस ठिकाणी पर्यटन महोत्सवांचं आयोजन.
·
मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे आज औरंगाबाद शहरातल्या विविध विकास कामांचा आढावा घेणार.
·
राज्यात दोन हजार
७३६ नव्या कोविड रुग्णांची नोंद तर जालना जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू.
आणि
·
थकबाकी न भरता नवीन
वीज जोडणी घेतलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे महावितरणचे निर्देश.
****
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा
दिला. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे पटोले यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.
त्या आधी पटोले यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री
अजित पवार यांची भेट घेतली. आता पक्ष जी काही जबाबदारी देईल ती स्वीकारून त्याला योग्य
न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पक्षाध्यक्षांनी
दिलेल्या आदेशनुसार आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. आता विधानसभेच्या अध्यक्षपदी
कोण याचा निर्णय महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचे प्रमुख ठरवतील, असं पटोले म्हणाले.
****
मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं
मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जलस्त्रोतांची दुरुस्ती करून सिंचन क्षमता
पुनर्स्थापित केली जाईल, यासाठी एक हजार ३४० कोटी ७५ लाख रुपये निधी लागेल. हा कार्यक्रम
मार्च २०२३ पर्यंत राबवला जाईल. गेल्या ३० ते ४० वर्षात दुष्काळ निवारणार्थ रोजगार
हमी योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलस्त्रोतांची निर्मिती करण्यात
आली. पण या जलस्त्रोतांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे त्यांचा पूर्ण क्षमतेनं
वापर होत नाही. अशा पूर्ण झालेल्या योजनांपैकी ७ हजार ९१६ योजनांची विशेष दुरुस्ती
करून, जलसाठा आणि सिंचन क्षमता पुनर्स्थापित केली जाईल.
****
राज्यातल्या ज्या नगरपालिका-नगरपंचायतींकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी
स्वतःच्या मालकीची जागा नाही, अशा शहरांना राज्य सरकार जागा उपलब्ध करुन देणार आहे.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. अशी जागा नसल्यानं, अनेक नगरपालिकांना
शासनाकडून विकास निधी मिळवताना अडचणी येत होत्या, अनेक शहरांचे विकास आराखडे रखडले
आहेत, तसंच कचऱ्याचा निचरा न करता आल्यानं, आरोग्य आणि प्रदुषणाचे प्रश्नही निर्माण
झाले आहेत, आता जागा उपलब्ध करून दिल्यानं या सगळ्या समस्या सुटतील असा विश्वास थोरात
यांनी व्यक्त केला आहे.
****
इंग्लंड आणि ब्राझीलमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा होत असलेला
फैलाव आणि मृत्यू पाहता, आपण बेसावध न राहता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असं
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना सादरीकरणाच्यावेळी
सांगितलं. समूह प्रतिकारशक्तीमुळे आपल्याकडे लक्षणीयरित्या रुग्णांची संख्या कमी झाली
आहे, असं जर आपण मानत असू, तर अशाच प्रकारे समूह प्रतिकारशक्तीनंतर देखील युरोपमध्ये
संसर्गाची दुसरी जोरदार लाट आलेली दिसते, हे लक्षात घ्यावं, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
कोविडचा आलेख घसरत असला तरी अमरावती, यवतमाळ, अकोला, भंडारा,
नंदुरबार, वर्धा, रत्नागिरी, गडचिरोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक रुग्णवाढीचा
वेग जास्त आहे, तसंच चाचण्यांचं प्रमाणही कमी आहे, त्यामुळे त्याकडे अधिक लक्ष देण्याची
गरज असल्याचं, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं.
****
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला
सुरुवात झाली असून, वर्षभर विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना मानवंदना दिली जाईल, असं
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल सांगितलं. शास्त्रीय संगीत क्षेत्रात
पंडित भीमसेन जोशी यांनी केलेल्या कार्याची महती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, राज्य शासन
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि त्यांच्या जन्मस्थळी, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन
करेल, असं ते म्हणाले. मुंबईत ऋत्विक फौंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सनं पंडीतजींना अभिवादन
करण्यासाठी ‘स्वरभास्कर १००’ हा दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्येष्ठ चित्रपट
दिग्दर्शक गुलजार यांनी तयार केलेला पंडीत भीमसेन जोशी हा त्यांचा संगीत प्रवास उलगडणारा
माहितीपट चित्रपट विभागातर्फे काल दिवसभर त्यांच्या संकेतस्थळावर तसंच यू ट्यूब वर
प्रदर्शित करण्यात आला.
****
दरम्यान, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात
येणारा यावर्षीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ व्हायोलिन
वादक, गुरू विदुषी डॉ. एन. राजम यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह
असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल
त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित
करण्यात आलं आहे.
****
नाशिकमध्ये येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ‘ऑनलाइन’ नोंदणी सुरू झाली असून, संमेलनासाठी प्रतिनिधी
शुल्क म्हणून तीन हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. यात बाहेरून येणाऱ्या प्रतिनिधींची
निवास, अल्पोपहार, भोजन आदी व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार असल्याचं संमेलनाचे
स्वागताध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कळवलं आहे. दरम्यान, भुजबळ
यांनी काल संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे इथल्या निवासस्थानी भेट
देऊन त्यांना संमेलनाचं निमंत्रण दिलं.
****
विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचे दर २५ रुपयांनी वाढले
असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ३५ पैशांची वाढ झाली आहे. भारतीय तेल महामंडळानं
ही माहिती दिली.
****
राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत औरंगाबादसह कोकण,
पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध वीस पर्यटन महोत्सवांचं
आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगानं फेब्रुवारी आणि मार्च
महिन्यांत हे आयोजन करण्यात येईल. औरंगाबाद विभागानं काही लोकप्रिय महोत्सवांचं आयोजन
करण्याचं निश्चित केलं असून, त्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात तेर महोत्सव, बीड जिल्ह्यात
कपिलधारा महोत्सव तसंच नांदेड जिल्ह्यातल्या होट्टल महोत्सवाचा समावेश आहे.
****
राज्यात खताची टंचाई होऊ नये यासाठी दोन लाख मेट्रिक टन युरिया
सह अन्य खतांचा साठा करण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री
दादा भुसे यांनी दिली. सांगली जिल्ह्यात जत इथं कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर
काल ते बोलत होते. ते म्हणाले –
येणाऱ्या खरीप हंगामाच्या पासून ते रब्बी हंगामापर्यंत महाराष्ट्राच्या तमाम
शेतकरी बांधवांना मी अश्वस्थ करू इच्छितो एकाही शेतकरी बांधवाला युरीया खताची कमतरता
पडणार नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून दोन लाख मेट्रीक टन बफर्स स्टॉक करण्याचा निर्णय
कृषी विभागानं त्या ठिकाणी केलेला आहे. प्रकिया उद्योग उभा करणं या संदर्भामधे त्याठिकाणी
मोठ्या प्रमाणात काम करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट
योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांनी त्या ठिकाणी लाभ
घ्यावा. जवळपास ५० टक्केपर्यंतची सबसिडी या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना
दिली जाणार आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत आहेत. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दिल्ली गेट इथच बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या
कामाची ते पाहणी करणार असून, त्यानंतर ते शहरातल्या विविध विकास कामांचा आढावा घेणार
आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची पाहणी करणार आहेत.
****
राज्यात काल दोन हजार ७३६ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ३६ हजार २६६ झाली आहे. काल
४६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५१ हजार २१५ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे.
तर काल पाच हजार ३३९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ३८
हजार ६७४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७१ शतांश
टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३४ हजार ८६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल जालना जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित
रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १७४ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात ४८ नवे रुग्ण आढळले. बीड ४९, लातूर १९,
जालना आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी १७, उस्मानाबाद १५, परभणी आठ, तर हिंगोली जिल्ह्यात
एक नवा रुग्ण आढळून आला.
****
मनमाड - मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी १७५ कोटी
रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन
माल्या यांनी दिली. दूरदश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेत,
ते काल बोलत होते. पिंपळखुटी - मुदखेड आणि परभणी - परळी वैजीनाथ रेल्वेमार्ग विद्युतीकरणासाठी,
१०० कोटी, परळी वैजनाथ - विकाराबाद रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी, ९० कोटी रुपये
आणि पुर्णा - अकोला रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणासाठी, ८५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात
आला असल्याचं ते म्हणाले. २०२३ पर्यंत सर्व ब्रॉडगेज मार्गाचं १०० टक्के विद्युतीकरण
करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं, माल्या यांनी सांगितलं.
****
वीज देयकं भरण्याबाबत सरकारनं शेतकरी तसंच जनतेचा छळ केला,
तर भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर ‘जेलभरो’ आंदोलन केलं जाणार असून, सरकारनं ही वसुली
तातडीनं थांबवावी, अशी मागणी, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी
केली आहे. लातूर इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. वीज देयकासह विविध मागण्यांचं
निवेदन त्यांनी काल जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांना सादर केलं. लातूर जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे पाण्याचा मुबलक साठा असूनही, सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना
पाणी देता येत नसताना, वीज मंडळानं सक्तीची वसुली सुरू केली असल्याचं, तसंच जोडण्या
तोडल्या जात असल्याचं, ते म्हणाले.
****
वीज देयकांची थकबाकी न भरता त्याच अथवा इतर नावानं, त्या
ठिकाणी नवीन वीज जोडणी दिल्याचं आढळून आल्यास, तसंच संबंधित ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास
त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश, महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे
सहव्यवस्थापकीय संचालक, डॉक्टर नरेश गिते यांनी दिले आहेत. मराठवाड्यात कायमस्वरूपी
वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांकडे, तब्बल एक हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
त्यामुळे ज्या ग्राहकांनी थकबाकी न भरता वीज पुरवठा घेतलेला आहे, त्यांच्याकडून चालू
देयकांवर ही थकबाकी वर्ग करून ती ग्राहकांकडून वसूल करण्यात येईल, असं गिते यांनी म्हटलं
आहे.
****
परभणी जिल्ह्यातलं प्रमुख आणि नगदी पिक म्हणून समजल्या जाणाऱ्या
कापूस पिकावर प्रक्रिया करणारं केंद्र, परभणी जिल्ह्यात उभारावं अशी मागणी, खासदार
संजय जाधव यांनी काल संसदेत केली. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कापूस
पिकावर अवलंबून आहे. मात्र परभणी लोकसभा मतदार संघात औद्योगिक उदासिनता असल्यानं शेतकऱ्यांना
कापूस निर्मितीसाठी परराज्यावर अवलंबून राहावं लागत आहे. कापसावर याच ठिकाणी प्रक्रिया
झाली तर अनेकांना रोजगार मिळू शकतो, असं खासदार जाधव यांनी यावेळी नमूद केलं.
****
उस्मानाबाद इथल्या परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव
आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते मारुती बनसोडे यांना, ऑल इंडिया ब्लू टायगर संघटनेचा
‘द रिअल पँथर’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मारुती बनसोडे हे गेली तीन दशकं
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्यानं, त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात
आली. येत्या नऊ तारखेला परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या
हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
****
नांदेड जिल्ह्यातल्या विष्णुपूरी जलाशयातंर्गतच्या सिंचन
क्षेत्रास पाच पाणी पाळ्या देण्यात याव्यात अशी मागणी, शेतकरी प्रतिनिधी शिवाजी मोरे
सोनखेडकर यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे,
एका निवेदनाद्वारे केली आहे. विष्णुपूरी प्रकल्पावर अवलंबून असलेल्या सिंचन क्षेत्रास
फक्त दोन पाणी पाळ्या देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मात्र गहू, भूईमूग, भाजीपाला,
चारा उत्पादक शेतकऱ्यांना किमान पाच पाळ्या आवश्यक असल्याचं मोरे यांनी म्हटलं आहे.
****
इंधन दरवाढी विरोधात मजलिस - ए - इत्तेहादूल मुसलमीन ‘एमआयम’
पक्षातर्फे काल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ‘धरणे आंदोलन’ करण्यात आलं.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमती सरकारनं कमी कराव्या या मागणीचे
फलक यावेळी कार्यकर्त्यांनी झळकावले, गॅसच्या टाकीची अंत्ययात्राही यावेळी काढण्यात
आली.
****
जालना जिल्ह्यातल्या २०२० ते २०२५ या कालावधीत मुदत संपत
असलेल्या ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला राखीव सरपंच पदासाठी आज आठही तहसील कार्यालयांत
आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. गेल्या एक तारखेला नियोजित असलेला आरक्षण सोडतीचा
हा कार्यक्रम प्रशासकीय कारणामुळे पुढं ढकलण्यात आला होता. आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर
जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका झालेल्या ४४६ ग्रामपंचायतींमधील सरपंच निवडीचा मार्ग मोकळा
होणार आहे.
****
परभणी शहरात वाहतुकीचा सातत्यानं खोळंबा होत असल्यानं तसंच
बसस्थानकाचं बांधकाम संथगतीने सुरू असल्यानं गंगाखेड रस्त्यावरील जागेत दुसरं बसस्थानक
तात्काळ सुरू करावं, अशी मागणी परभणीकर संघर्ष समितीचे संयोजक माजी आमदार विधीज्ञ विजय
गव्हाणे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, कीर्तीकुमार बुरांडे यांनी जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांच्याकडे काल या मागणीचं निवेदन सादर केलं.
****
No comments:
Post a Comment