Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09
February 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेत विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह
चार सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्यानं त्यांना आज निरोप देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी यावेळी बोलताना, गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गुलाम
नबी आझाद यांनी नेहमी सदनाची प्रतिष्ठा राखली असून, त्यांनी सदैव देशालाच प्राधान्य
दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. आझाद यांनी वेगवेगळ्या पदावर काम करत इमानदारीनं देशाची
सेवा केली असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले.
गुलाम नबी आझाद यांनी यावेळी बोलताना, सदनाचे आभार मानले. आझाद यांच्यासह, मीर मोहम्मद
फैयाज, शमशेर सिंह, नजीर अहमद लावे या सदस्यांना कार्यकाळ संपत आहे.
****
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम देशभरातल्या १२२ शहरांमध्ये
राबवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शहरात प्रदूषण करणाऱ्या विशिष्ट घटकांचा शोध घेतला
जाईल असंही जावडेकर यांनी राज्यसभेत सांगितलं.
****
सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकाच्या मृत्यूनंतर त्याचे
दिव्यांग अपत्य अथवा भावंडाला कुटुंब निवृत्तीवेतनासाठी लागू होणाऱ्या उत्पन्नविषयक
पात्रता अटी शिथील करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. दिव्यांग वारसांना अधिक
वैद्यकीय सुविधा आणि आर्थिक मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सरकारनं ही सूट दिली आहे.
सरकारी नोकर अथवा निवृत्तीधारक याच्या मानसिक किंवा शारीरिक दिव्यांगता असणाऱ्या वारसाचं
कुटुंब निवृत्तीवेतना व्यतिरिक्तचं एकूण उत्पन जर सरकारी नोकर अथवा निवृत्तीधारकाच्या
अखेरच्या वेतनाच्या ३० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असेल.
****
देशात काल नऊ हजार ११० नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर ७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची
संख्या एक कोटी आठ लाख ४७ हजार ३०४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५५ हजार
१५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १४ हजार १६ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत
एक कोटी पाच लाख ४८ हजार ५२१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४३
हजार ६२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, देशभरात आतापर्यंत ६२ लाख ५९ हजार आठ नागरिकांचं, तर
राज्यात आतापर्यंत पाच लाख नऊ हजार ७४६ आरोग्य कर्मचाऱ्यांचं कोविड लसीकरण करण्यात
आलं.
****
थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेतून
मानवकल्याणाचा आदर्श निर्माण केला, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम
नवलखा याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला. न्यायमूर्ती एस. एस.
शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने नवलखाचा जामीन नाकारताना मुंबईतल्या
विशेष एनआयए न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं सांगितलं. आपल्याला नजरकैद
करण्यात आलं असून, गेल्या ९० दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं याप्रकरणी आरोपपत्र
दाखल केलं नाही, त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज नवलखा यांनी
केला होता.
****
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातल्या शाहपूर इथं मानव विकास
मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा महिला बचत गटांच्या सदस्यांनी सदुपयोग
घ्यावा आणि आर्थिक उन्नती करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी
केलं आहे. महिला बचत गटांच्या मेळाव्यात ते आज बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित
प्रातिनिधिक स्वरूपात या महिलांना शिलाई मशीन, शेवया तयार करण्याची मशिन, पिठ गिरणी,
मसाला तयार करणारी मशिन आणि शाळेला पायी जाणाऱ्या मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या चिखली इथल्या गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक
शाहुराज भोजगुडे याला एक हजार रुपयाची लाच घेताना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराची
अंशदान निवृत्ती योजना केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये समाविष्ट करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
केंद्र सरकारच्या डीजिटल इंडीया या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत
नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ३०९ ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबलद्वारे जोडण्यात
येणार आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातल्या २७९ ग्राम पंचायती ऑप्टीकल फायबर केबलद्वारे जोडण्यात
आल्या आहेत.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट
सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी २५५ धावांची आवश्यकता आहे. शेवटचं वृत्त हाती
आलं तेव्हा भारताच्या सहा बाद १६९ धावा झाल्या होत्या. विराट कोहली ५०, तर रविचंद्रन
अश्विन नऊ धावांवर खेळत आहे. शुभमन गील ५०, चेतेश्वर पुजारा १५, रोहीत शर्मा १२ धावा
करुन बाद झाले. तत्पूर्वी इंग्लंडचा दुसरा डाव १७८ धावांवर संपुष्टात आला.
****
No comments:
Post a Comment