Tuesday, 9 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०९ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशातल्या रुग्णांना सरकार सर्व सुविधा प्रदान करत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. देशातल्या रुग्णांना राईट टू हेल्थ सर्विसेस - उपचार घेण्याचा अधिकार प्रदान करण्यासंदर्भात काही कायदा होऊ शकतो का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते. देशातल्या नागरिकांना राहण्याचा, शिक्षणाचा, उपचाराचा सगळ्या प्रकारचा अधिकार प्रदान केलेला असून, त्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या आहेत, मात्र यासाठी वेगळा कायदा करण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यसभेत आज आज निवृत्त सदस्यांना निरोप देण्यात येत आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरु होईल, तर लोकसभेत आजही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी माता रमाई आंबेडकर यांचं मुंबईत वरळी इथं भव्य स्मारक उभारणार असल्याचं, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. मुंबईत ‘महामाता रमाईची लेक पुरस्कार’ सोहळ्यात ते काल बोलत होते. माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृती आंबेडकरी चळवळीला सदैव प्रेरणादायी असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे.

****

महिला आणि बालविकासाच्या योजनांसाठी, राज्य सरकार जिल्हा नियोजन निधीतल्या तीन टक्के निधीची तरतूद करणार आहे. याबाबतचा शासन आदेश ३१ मार्च आधी निर्गमीत केला जाईल अशी माहिती, अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. याशिवाय जिल्हा नियोजासाठी दिलेल्या निधीचा योग्य वापर करणाऱ्या जिल्ह्यांना, ५० कोटी रूपयांचा प्रोत्साहन निधी द्यायचा निर्णयही, या बैठकीत घेण्यात आला.

****

नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज अंशत: रद्द करण्यात आली आहे. आज नांदेडहून सुटणारी गाडी दिल्लीपर्यंतच धावेल. दिल्ली ते अमृतसर दरम्यान ही गाडी उद्या धावणार नाही, परवा दिल्लीहूनच ही गाडी नांदेडकडे परतेल.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला सामना जिंकण्यासाठी ३१० धावांची आवश्यकता आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच बाद ११० धावा झाल्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 26 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...