Wednesday, 10 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 10.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळल्या; निवडणुकीचा मार्ग मोकळा.

·      शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्के व्याजदरानं देण्याबाबत धोरणात्मक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर निर्णय घेणार – कृषीमंत्री.

·      राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचं आयोजन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.

·      खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेडमध्ये अटक.

·      प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते राजीव कपूर यांचं निधन.

·      राज्यात दोन हजार ५१५ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात चार बाधितांचा मृत्यू.

आणि

·      चेन्नई क्रिकेट कसोटीत इंग्लंडचा भारतावर २२७ धावांनी विजय.

****

राज्यातल्या विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे या बँकांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुका कोविड संसर्ग तसंच अन्य विविध कारणांनी एक वर्ष पुढे ढकलल्यानं मतदार याद्या अद्ययावत करणं आवश्यक असून, त्यासाठी निवडणुका रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

****

हाफकिन संस्थेत अद्ययावत लस संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी, राज्य शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल हाफकिन इन्स्टिट्यूट संदर्भात आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, हाफकिन संस्थेच्या संचालक सीमा व्यास, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हाफकिन संस्थेच्या आगामी पाच प्रकल्पासाठी अकराशे कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचं, डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीनं म्हटलं आहे, येत्या १५ दिवसात याबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

राज्यातल्या कामगारांना अतिविशिष्ट वैद्यकीय उपचारांसह आधुनिक वैद्यकीय सुविधा, राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत सर्व जिल्हे समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्य कामगार विमा योजनेची सुविधा शासकीय रुग्णालयासाठी संलग्न करण्यासंदर्भात, काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य कर्मचारी विमा योजना सोसायटी आणि केंद्र शासनाची कर्मचारी विमा योजनेबाबत संयुक्त बैठक घेऊन कामगारांना अधिकाधिक फायदा कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची सूचना देशमुख यांनी केली.

****

एक ते तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शून्य टक्के व्याजदरानं कर्जपुरवठा करण्याच्या दृष्टीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत तीन टक्के व्याज अनुदान देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं कृषी मंत्री दादा भुसे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. सहकार विभाग आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला तर शेती संदर्भात नियोजन करणं सोयीचे होतं, त्यासाठी शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असं त्यांनी सागितलं.

****

राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. ग्रामीण भागातल्या जनतेच्या समस्या सोडवणं तसंच गावांमधील रखडलेली कामं जलदगतीने मार्गी लावण्यासाठी या सभा घेतल्या जाणार आहेत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या सभा घेऊन, सरपंचांकडून जनतेचे प्रश्न, समस्या समजून घेत, त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

****

खलिस्तान समर्थक दहशतवाद्याला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. सरबजीतसिंग किरट असं त्याचं नाव असून, तो खलिस्तान जिंदाबाद संघटनेचा सदस्य असल्याचं समजतं. बेल्जियममधून त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवले जात होते. या प्रकरणी पंजाबच्या अमृतसरमध्ये चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी तिघांना अटक झाली होती, तर सरबजीतसिंग हा नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पंजाब पोलिसांचम सीआयडी पथक नांदेड शहरात दाखल झालं, नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्यानं, शिकारघाट परिसरातून सरबजीतसिंग याला अटक करण्यात आली. रविवारी ही कारवाई करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते राजीव कपूर यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ५८ वर्षांचे होते. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून विशेष ओळख मिळालेल्या राजीव कपूर यांनी, एक जान है हम’, ‘जलजला’,’ लव्ह मॅरेज’ आदी चित्रपटांमधूनही भूमिका साकारल्या. ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. ऋषी कपूर यांच्यापाठोपाठ राजीव कपूर यांच्या निधनानं वर्षभरात कपूर कुटुंबावर झालेला हा दुसरा आघात धक्कादायक असल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.

****

राज्यात काल दोन हजार ५१५ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ४८ हजार ८०२ झाली आहे. काल ३५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार ३६० झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५१ शतांश टक्के झाला आहे. तर काल दोन हजार ५५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ६१ हजार ५२५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ३४ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २१७ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये परभणी जिल्ह्यातल्या दोन तर जालना तसंच लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात ६८ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात ३७, जालना ३९, नांदेड २७, बीड आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी १९, तर उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात काल प्रत्येकी चार नवे रुग्ण आढळून आले.

****

बीड जिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयीन अधीक्षकाच्या निवृत्ती लाभातून सव्वा तीन लाख रुपये रक्कम कपात केल्याप्रकरणी आठ अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा रुग्णालयातले कार्यालयीन अधिक्षक विठ्ठल लोखंडे २०१३ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातल्या विद्युत देयकाची तीन लाख २४ हजार रुपये रक्कम भरली नसल्याचं सांगत ती रक्कम त्यांच्या निवृत्तीनंतरच्या लाभातून कपात केली होती. याप्रकरणी लोखंडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोग्य विभागाचे आयुक्त, दोन संचालकांसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

****

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये, अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण यांच्या हस्ते नांदेड इथं महापालिकेच्या रुग्णालयात, रुग्णवाहिका, एक्सरे आणि सोनोग्राफी यंत्रांचं काल लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर यावेळी उपस्थित होते. शासकीय रुग्णालयांच्या धर्तीवर महापालिकेची रुग्णालयंही अत्याधुनिक यंत्रासह बळकट करण्यावर चव्हाण यांनी आपल्या भाषणातून भर दिला.

****

लातूर शहर महानगरपालिकेला उघड्यावर शौचापासून मुक्त, म्हणजेच ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झालं आहे. असं मानांकन असलेल्या देशभरातल्या मोजक्या शहरांमध्ये लातूर शहराचा समावेश झाल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. शहरातल्या प्रत्येक घरात शौचालय असावं, महानगरपालिकेचा मानवी मैला प्रक्रिया प्रकल्प असावा, या सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर शहराची तपासणी करून हे मानांकन देण्यात आलं.

****

टाळेबंदीच्या काळात सर्वत्र शाळा बंद असताना, परभणी जिल्ह्यात गाव पातळीवर अभ्यास गटांच्या माध्यमातून प्राथमिक विभागातल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात आलं. यात गावोगावचे शिक्षणप्रेमी, उच्चशिक्षीत तरुण सहभाग झाले होते. एक लाखावर विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला. राज्यात फक्त परभणी जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम राबवणाऱ्या शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली –

कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुध्दा आमचा अभ्यास कुठेही थांबला नाही. अशा प्रकारचा सातत्यपूर्ण प्रयोग आमच्या जिल्ह्यामध्ये एक हजार १५८ शाळांमध्ये, १५ हजार ११३ अभ्यासगटांच्या माध्यमातून, एक लाख दोन हजार ७४ विद्यार्थी या अभ्यासात सहभागी झाले होते. गावातल्या सर्व मंडळींनी याला मदत केली. शिक्षकांचं पण त्यांना विशेष सहकार्य होतं. शिक्षक आणि गावकरी या दोघांनी मिळून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलं होतं. शाळा ही दररोज सुरु होती आणि याचे आम्हाला यश पण दिसून आलेले आहे.

****

मुख्यमंत्री जलसंवर्धन सारख्या योजनांत लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन, आमदार धीरज देशमुख यांनी केलं आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातल्या गावांच्या विकास कामांसंदर्भात, जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. रस्त्यांची कामे प्राधान्यानं व्हावीत, विशेष बाब म्हणून अशा रस्त्यांसाठी निधीची तरतूद करावी, रस्त्यांच्या सद्यस्थितीचं ऑडिट करावं, उपलब्ध जलसाठा विचार घेऊन योजना राबवाव्यात, असं देशमुख यांनी सांगितलं. योजना राबवताना वाढत्या लोकसंख्येचाही विचार करावा लागेल, असं आमदार त्यांनी नमूद केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात ग्राम बाल संरक्षण समितीच्या प्रयत्नातून काल एक बालविवाह रोखण्यात आला. परंडा तालुक्यात मलकापूर इथं हा बालविवाह करण्यात येणार होता. परंड्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी एन.डी.गायके तसंच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे यांच्या प्रयत्नातून ही कार्यवाही करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात शिवणी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर यांनी, कोविड काळात ऑनलाईन शिक्षण तसंच स्पर्धा परीक्षेला उपयुक्त अशा सात पुस्तकांचं लेखन केलं आहे. नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांच्या हस्ते, काल या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तक विक्रीतून मिळणाऱ्या पैश्याचा विनियोग अनाथ मुलांना निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी, शिक्षक भोजनकर यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

****

‘माझी वसुंधरा अभियाना’च्या निमित्तानं परभणी इथं काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, महापालिका आयुक्त देविदास पवार तसंच अन्य अधिकारी- कर्मचारी सायकलवर कार्यालयात पोहचले. या अभियाना अंतर्गत आता दर मंगळवारी हे सर्व अधिकारी, कर्मचारी सायकलवर कार्यालयात येणार आहेत. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवून परभणी जिल्ह्यास पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत अग्रभागी ठेवण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातल्या शाहपूर इथं मानव विकास मिशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा महिला बचत गटांच्या सदस्यांनी सदुपयोग घ्यावा आणि आर्थिक उन्नती करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी केलं आहे. महिला बचत गटांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित प्रातिनिधिक स्वरूपात या महिलांना शिवणयंत्र, शेवया तयार करण्याचं यंत्र, पीठ गिरणी, मसाला तयार करणारं यंत्र आणि शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या.

****

चेन्नई क्रिकेट कसोटीत इंग्लंड संघानं भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. विजयासाठी आवश्यक असलेल्या ४२० धावसंख्येचा पाठलाग करताना, भारतीय संघाचा दुसरा डाव १९२ धावांवर संपुष्टात आला. विराट कोहलीनं ७२ तर शुभमन गिलनं ५० धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहता आलं नाही. या मालिकेतला दुसरा सामना येत्या १३ फेब्रुवारीपासून चेन्नईतच सुरू होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात तुती लागवडीचं क्षेत्र वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सर्व प्रकारची मदत करण्याचं नियोजन संबंधित विभागाने करण्याची सूचना जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्या महारेशीम अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. शासनानं या वर्षापासून रेशीम कोष विक्री पोटी प्रतिकिलो ५० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेशीम उद्योग वाढीस मदत होणार असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले.

****

परभणी जिल्हा परिषदेतल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी बैठक घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित कामं तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना टाकसाळे यांनी संबंधित विभागांना दिल्या.

****

बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात चांदापूर इथं दरवर्षीप्रमाणे सातवी बौद्धधम्म परिषद घेण्यात आली. या धम्म परिषदेला राज्यभरातून मान्यवर भन्ते तसंच भिक्खू सहभागी झाले होते. “सम्यक संकल्प” या फेसबुक पेजवरून या परिषदेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात अनुदान प्राप्त झालं आहे. काही तालुक्यात लाभार्थी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचं वाटप यापूर्वी करण्यात आलं असून, काही तालुक्यात अनुदान वाटप प्रलंबित होतं. आता हे दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...