आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१० फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या
धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत.
फेब्रुवारी २०२० पासून शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी किसान
क्रेडिट कार्ड ही विशेष योजना सुरू केली गेली. सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि नाबार्डने
दिलेल्या माहितीनुसार २९ जानेवारी २०२१ पर्यंत एक लाख ७६ हजार कोटी रुपयांच्या पतमर्यादेसह
एक कोटी ८७ लाख किसान क्रेडिट कार्डांचं वितरण देशभरातल्या शेतकऱ्यांना करण्यात आलं
आहे. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत
ही माहिती दिली.
****
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी फरार अभिनेता
दीप सिद्धू याला पोलिसांनी हरियाणातल्या कर्नाल इथून अटक केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांना
भडकावणं, लाल किल्ल्यावर घेऊन जाणं आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
गेल्या १४ दिवसांपासून तो फरार होता. भारतीय किसान युनियनचे हरयाणातले प्रमुख गुरनाम
सिंह चाडूनी, स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी सिद्धूवर, शेतकरी आंदोलकांना
भडकावून लाल किल्ल्यावर नेल्याचा आरोप केला होता. राजकीय पक्षांकडूनही दीप सिद्धूला
अटक करण्याची मागणी सातत्यानं केली जात होती.
****
माझी वसुंधरा अभियानात पाणथळ जागांचं जतन आणि संवर्धनाचा समावेश
करण्यात यावा, तसंच याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची विभागस्तरावर कार्यशाळा घेण्याची
सूचना, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते काल राज्य वेटलँड प्राधिकरणाच्या
बैठकीत बोलत होते. ‘नॉट वेटलँड’ म्हणून पडताळणी झालेल्या सर्व जागांची पुन्हा एकदा
पडताळणी करण्यात यावी, असंही ठाकरे यांनी सांगितलं.
****
राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात कामगारांच्या कष्टाचा
मोठा वाटा असल्याचं, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र
कामगार कल्याण मंडळाच्या ३३ व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण प्रसंगी, ते काल बोलत
होते. यावेळी २०१५ चा कामगार भूषण पुरस्कार, औरंगाबाद इथल्या बजाज ऑटो कंपनीत कार्यरत
महेश यशवंत सेवलीकर यांना प्रदान करण्यात आला.
****
नांदेड इथं आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृह बांधकामासाठी
आठ कोटी ५३ लाख रुपये खर्चास शासकीय मान्यता मिळाली आहे. आतापर्यत भाड्याच्या जागेत
सुरू असलेलं हे वसतीगृह लवकरच स्वत:च्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment