Thursday, 11 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

भारत आणि चीन दरम्यान सीमा वादावर सुरु असलेल्या चर्चेतून पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्यावरुन सैन्य माघारीवर दोन्ही देशात सहमती झाली असल्याचं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितलं. पूर्व लडाखमध्ये असलेल्या परिस्थितीसंदर्भात आज राज्यसभेत निवेदन देताना ते बोलत होते. टप्प्याटप्प्यानं आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल, असं ते म्हणाले. चीनचे अयोग्य दावे भारतानं कधीच मान्य केले नाहीत, तसंच दोन्ही बाजुंनी प्रयत्न केले तरच द्विपक्षीय संबंध राखले जातील, असं भारतानं नेहमीच म्हटलं असल्याचं, संरक्षणमंत्री म्हणाले. पँगाँग सरोवराच्या परिसरातून दोन्ही देशांचं सैन्य पूर्णपणे माघारी फिरल्यानंतर ४८ तासांनी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य कमांडर्समध्ये बैठक होईल, पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर आठच्या पूर्व दिशेला चीन आपले सैनिक तैनात करेल, भारत फिंगर तीनपर्यंत सैन्याची तैनाती करेल, अशी माहिती त्यांनी दिली. भारत आपली एक इंच भूमीही कोणाला घेऊ देणार नाही, असं संरक्षण मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

ट्विटरचे स्वत:चे नियम असतील, परंतू भारतात भारतीय कायद्यांचा आदर करावाच लागेल, तसंच सरकारनं सांगितलेल्या सर्व ट्विटर हँडलवर कारवाईही करावी लागेल, असं केंद्र सरकारनं ट्विटरसमोर स्पष्ट केलं आहे. ट्विटरचे वरिष्ठ अधिकारी तसंच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांची काल बैठक झाली. यांनतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं ट्विटरविरोधात आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली हे अकाउंट चुकीची आणि चिथावणीखोर माहिती पसरवत असल्याचा दावा सरकारनं केला आहे.

****

देशात काल १२ हजार ९२३ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १०८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी आठ लाख ७१ हजार २९४ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत एक लाख ५५ हजार ३६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ११ हजार ७६४ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत एक कोटी पाच लाख ७३ हजार ३७२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या एक लाख ४२ हजार ५६२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, देशभरात आतापर्यंत ७० लाख १७ हजार ११४ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.

****

डाळींच्या उत्पादनात भारत स्वयंपूर्णतेचं लक्ष्य गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. जागतिक डाळी दिवसाच्या निमित्तानं भारतीय डाळी संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. गेल्या पाच ते सहा वर्षात शेतकरी, शास्त्रज्ञ आणि केंद्र सरकारची कृषीपूरक धोरणं, यामुळे देशात डाळींच्या उत्पादनात १४० लाख टनांवरून २४० लाख टनांपर्यंत वाढ झाली असल्याचं ते म्हणाले. देशात ८६ टक्के शेतकरी लहान आणि अल्पभूधारक आहेत, चांगलं उत्पन्न देणारी पिके, नवं तंत्रज्ञान आणि बाजारपेठांची उपलब्धता यांची ओळख त्यांना करून दिली, तरच ते शेतीमध्ये नफा मिळवू शकतील, असं कृषी मंत्री म्हणाले.

****

कोविड-19 लसीकरणाबाबत विश्वासार्हता वाढवण्यासाठी, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलिस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी आज कोविड लस टोचून घेतली. जिल्हा लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या मोहीमेत सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. मुंबईत राज्य शुश्रुषा आणि निमवैद्यक शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत ते काल बोलत होते. रुग्ण बरा होण्यामध्ये डॉक्टरांबरोबरच परिचारिकासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

राज्यातल्या अनुसूचित जातीच्या युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या, अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांसाठी नवीन औद्योगिक धोरण तयार करणार असल्याचं, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योग सुरू करण्यासाठी, समाज कल्याण आयुक्तालयामार्फत येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात येतील, असं कदम यांनी सांगितलं

****

लोअर दुधना प्रकल्पातून शेती तसंच पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. पाण्याअभावी शेतीचे मोठं नुकसान होत असून, पिण्याच्या पाण्याअभावी नागरिक तसंच जनावरांचे हाल होत असल्याचं, पाटील यांनी काल औरंगाबाद लाभक्षेत्र विकास विभागाचे मुख्य अभियंता तसंच मुख्य प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...