आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
११ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
भारत - चीन सीमा वादावर चर्चेतून तोडगा निघाला असून, झालेल्या
करारानुसार पेंगोंग सो इथल्या दक्षिण आणि पूर्व सीमेवरुन दोन्ही देशांनी आपापलं सैन्य
मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
पूर्व लडाखमध्ये असलेल्या परिस्थितीसंदर्भात आज राज्यसभेत निवेदन देताना ते बोलत होते.
भारत आणि चीन दरम्यान कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं
ते म्हणाले. चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैन्यानं हाणून पाडलं असल्याचं
संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं.
****
नाशिक इथं शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन वैद्यकीय महाविद्यालय
आणि त्यास संलग्न ४३० खाटांचं रूग्णालय सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली
आहे. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित या महाविद्यालयात
पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन
करण्यास तसंच त्यामध्ये १५ विषयांमध्ये एकूण ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन
जागा निर्माण करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात धर्माबाद इथल्या कृषी पर्यवेक्षकाला पाच हजार
रुपये लाच घेताना, काल अटक करण्यात आली. दीपक हनवते असं त्याचं नाव असून, ठिबक सिंचन
अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी पंचायत समितीतला तंत्र सहायक रमशे
बारगजे याला काल पाच हजार रुपये लाच घेताना, अटक करण्यात आली. शेततळ्यांचा कार्यरंभ
आदेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज अंशत: रद्द करण्यात आली आहे.
नांदेडहून निघणारी ही गाडी उद्या दिल्लीपर्यंतच धावेल. दिल्लीहून पुढे अमृतसरला न जाता,
ही गाडी दिल्लीहूनच नांदेडला परत येणार आहे.
****
सातारा मध्यवर्ती बसस्थानकात काल सायंकाळी लागलेल्या आगीत पाच
शिवशाही बस जळून खाक झाल्या असून, यात सुमारे एक कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचा अंदाज
आहे. याप्रकरणी संशयावरून एकास ताब्यात घेण्यात आलं आहे. जळालेल्या बस टाळेबंदीपासून
बंद होत्या.
****
नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कडाक्याची थंडीची लाट
आली आहे. फुलोऱ्यात असलेल्या गहू, हरभरा, करडई या पिकांना ही थंडी उपयुक्त ठरेल असं
शेतीतज्ज्ञांचं मत आहे
****
No comments:
Post a Comment