Friday, 12 February 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या १९ फेब्रुवारीला साजरी होणार असून, त्यासाठी राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जयंतीच्या कार्यक्रमासाठी शिवनेरी किल्ल्यावर गर्दी न करता, जयंती साधेपणानं साजरी करण्याचं आवाहन, सरकारनं केलं आहे. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचं सादरीकरण, अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये, त्याऐवजी अशा कार्यक्रमाचं ऑनलाइन प्रक्षेपण करावं, असं सरकारनं सांगितलं आहे. तसंच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन, त्या ठिकाणी १०० लोकांनाच परवानगी असेल, असं सरकारनं यासंदर्भातल्या आदेशात म्हटलं आहे.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - मनरेगाअंतर्गत निर्माण होणाऱ्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत सांगितलं. मनरेगाच्या मागणीतल्या वाढीनंतर अर्थसंकल्पात वाढ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत एक लाख ११ हजार कोटी रुपयांच्या वाटपापैकी ९० हजार कोटी रुपये राज्यांना वितरीत करण्यात आल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिलं सत्र आज संपत आहे. यापूर्वी हे सत्र १५ फेब्रुवारीला संपणार होतं. या अधिवेशनाचं दुसरं सत्र आठ मार्चला सुरु होईल.

****

देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ३२ शतांश टक्के झाला आहे. काल १५ हजार ८५८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत एक कोटी पाच लाख ८९ हजार २३० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर काल नव्या नऊ हजार ३०९ रुग्णांची नोंद झाली, तर ८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी आठ लाख ८० हजार ६०३ झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ५५ हजार ४४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या एक लाख ३५ हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, देशभरात आतापर्यंत ७५ लाखाहून अधिक नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं.

****

दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण निर्माण झाल्यास त्यांना लेखनिक देण्यापासून रोखता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगासह सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि ती दिली जावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत. न्यायालयानं दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक देण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आणि नियम तयार करण्यासाठी, तीन महिन्यांचा कालावधी दिला असून, या कालावधीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा देण्याच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावे, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात रेणापूर ते लोखंडी सावरगाव टी-पॉईंट ५४८ ब या राष्ट्रीय महामार्गाचं काम अद्यापही प्रगतीपथावर असताना, सेलु अंबा इथं पथकर नाका सुरू करण्यात आला आहे. याबाबत केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई इथं संबंधित महामार्ग विभागाच्या आधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पथकर नाक्याच्या परीघातील वीस किलोमीटर अंतरातील वाहन धारकांना मासिक पास देवून टोल मुक्त करण्याचा राष्ट्रीय महामार्गाचा नियम आहे, परंतू संबंधित कंत्राटदारानं कुठलीही कल्पना न देता पथकर नाका सुरू केला, हे नियमबाह्य असून, नियमानुसार जो टोल आहे तो आकारावा नागरिकांची लूट करू नये अशा सूचना, आमदार मुंदडा यांनी यावेळी दिल्या.

****

बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ५२६ ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुका काल पार पडल्या. जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यातल्या सर्वात मोठ्या बोराखेडी ग्रामपंचायत सरपंचपदी वंचित बहुजन आघाडीच्या आशा राहुल तेलंग यांची तर उपसरपंचपदी सलीमाबी अब्बास खान यांची बिनविरोध निवड झाली.

****

नाशिक शहरातील इंडिपेंडन्स सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक निर्बंध घातले आहेत. सहा महिन्यांसाठी खातेदारांना पैसे काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कर्जवसुली कमी प्रमाणात झाल्यामुळे हे निर्बंध घालण्यात आले असल्याचं बँकेचे अध्यक्ष संदीप दिवटे सांगितलं.

****

बुलडाणा जिल्ह्यात ११५ पाणीपुरवठा योजनांची कामं सुरू असून, ज्या योजना पाच ते दहा वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या आहेत त्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना उद्यापासून चेन्नई इथं सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. चार सामन्यांच्या मालिकेला पहिला सामना जिंकून इंग्लंडचा संघ एक - शून्यनी आघाडीवर आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...