Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 February
2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१२ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
·
सर्व सामान्य जनतेला
परवडणाऱ्या दरात कोरोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी राज्यात फिरत्या प्रयोगशाळेची सुविधा
उपलब्ध करून देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
·
परवानगी नसल्यामुळे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा सरकारी विमानाऐवजी खासगी विमानानं उत्तराखंडचा प्रवास.
·
मराठी भाषा विभागाचे
विविध पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव
पुरस्कार’ तर औरंगाबादचे समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना ‘मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार’.
·
राज्यात तीन हजार
२९७ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात सात बाधितांचा मृत्यू.
·
विशेष रेल्वे गाड्यांच्या
आगाऊ तिकीट आरक्षणासाठीच्या कालावधीत १२० दिवसापर्यंत वाढ; जालना - मुंबई - जालना जनशताब्दी
विशेष रेल्वे गाडी येत्या रविवारपासून सुरु होणार.
आणि
·
भारतीय निवडणूक आयोगाचं
बनावट ओळखपत्र बनवणाऱ्या दोन जणांना औरंगाबादमध्ये अटक.
****
राज्यातल्या सर्व सामान्य जनतेला परवडणाऱ्या दरात कोरोना
विषाणू संसर्ग चाचणीसाठी फिरत्या प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी
माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत ‘स्पाईस हेल्थच्या’ तीन फिरत्या
कोरोना विषाणू संसर्ग चाचणी प्रयोगशाळांचं लोकार्पण करताना ते काल बोलत होते. राज्यात
कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, रुग्णांचा शोध घेणं,
त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करून घेणं, याला आजही खूप महत्त्व आहे. त्यानंतरच
उपचार, विलगीकरण करणं शक्य आहे. अशा महत्वाच्या वेळी सामाजिक दायित्वातून फिरत्या प्रयोग
शाळेची ही सुविधा उपलब्ध झाली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या चाचणीचं शुल्क ४९९
रुपये असून, २४ तासांत अहवाल प्राप्त होत असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगानं जारी करण्यात आलेल्या
विविध मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून, राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना पूर्वीप्रमाणं
ग्रामसभांचं आयोजन करण्यास पुन्हा संमती देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यांनी काल ही माहिती दिली. यासंदर्भातलं शासन परिपत्रकही काल सर्व संबंधितांना पाठवण्यात
आलं असल्याचं, त्यांनी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं
जानेवारीमध्ये ग्रामसभा सुरु करण्यास संमती देण्यात आली होती. परंतू, दरम्यानच्या काळात
कोरोना विषाणुचा नवीन प्रकार आढळल्यानं दक्षता म्हणून ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती
देण्यात आली होती.
****
राज्यात आरोग्य क्षेत्र तसंच प्रथम प्रतिसाद गटात कार्यरत
पाच लाख ७३ हजारांपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना, कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक
लस देण्यात आली आहे. पाच हजार १४९ लोकांना देशांतर्गत निर्मित कोवॅक्सीन लस देण्यात
आली असल्याची माहिती, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. देशभरात या प्रतिबंधक
लसीकरणाचा लाभ मिळालेल्या व्यक्तींची संख्या, आता ७० लाखांहून अधिक झाली आहे. आरोग्य
मंत्रालयानं काल दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७० लाख १७ हजार ११४ जणांना लस देण्यात
आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरणाच्या
दुसऱ्या टप्प्यात, प्रशासनातल्या प्रथम प्रतिसाद गटातल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी
काल लस घेतली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त आस्तिकुमार
पांडेय, पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांचा लस घेणाऱ्यांत समावेश होता. ग्रामीण भागातही
नियोजित लसीकरण केंद्रावर, तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी
लस घेतली. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरणानंतर माध्यमांशी संवाद साधला –
कोविड लस पूर्णतः सेफ आहे.
हे नवीन कवच कुंडल आपल्याला भारत सरकारच्या मदतीनं मिळाले आहेत. नागरिकांनी याच्यावर
विश्वास ठेवला पाहिजे. बऱ्याचशा त्याच्या संदर्भात चुकीचे भ्रम समाजामधे पसरवल्या चाललेत.
सगळ्यांनी या लसीकरणामधे पुढे आलं पाहिजे. आणि या माध्यमातून आपला जिल्हा कोरोना करण्याच्या
दृष्टीनं आपण पाऊल टाकलं पाहिजे. १५,१३८ लोकांनी आतापर्यंत लस घेतली पूर्ण. २६६ सेशन
याचे पूर्ण झालेले आहेत. शहर आणि खेडे मिळून.
****
उत्तराखंडमध्ये एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली नाही.
त्यामुळे सरकारी विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरुन खासगी विमानानं प्रवास करावा
लागला. या कार्यक्रमासाठी शासकीय विमान वापरण्याची परवानगी राजपाल कार्यालयानं सरकारकडे
२ फेब्रुवारी रोजी मागितली होती. राज्य सरकारनं याबाबत कोणतेही उत्तर दिले नाही.
दरम्यान, राज्यपालांना सरकारी विमानानं उत्तराखंडचा प्रवास
नाकारण्यामध्ये आपली चूक नसल्याचं, राज्य शासनानं स्पष्ट केलं आहे. राजभवन सचिवालयानं
राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा
नाही याची खात्री करून घ्यावयास हवी होती. ती न केल्यानं राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा
खोळंबा झाल्याचं शासनानं नमूद केलं आहे. या प्रकाराबाबत शासनानं देखील गंभीर दखल घेतली
असून, राजभवनातल्या संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी सूचना,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक परवानगी नाकारण्यात
आल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षानं केली आहे.
****
देशात आजपासून द्रवीकृत नैसर्गिक वायू - सीएनजीवर चालणारी
ट्रॅक्टर उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आज देशातल्या पहिल्या
सीएनजी ट्रॅक्टरचं उद्घाटन करणार आहेत. या ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांच्या इंधन खर्चावर
वर्षाला एक लाख रुपयांची बचत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत
होईल, आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं परिवहन खात्यानं म्हटलं
आहे. सध्या डिझेलचा दर प्रति लिटर ७७ रुपये आहे, तर सीएनजीचा सध्याचा दर फक्त ४२ रुपये
प्रति किलो आहे. सीएनजी ट्रॅक्टरमुळे आता शेतकऱ्यांच्या इंधनाच्या दरात पन्नास टक्क्यांपर्यंत
बचत होऊ शकेल.
****
खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर
काल नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
पवार यांनी यासंदर्भात लक्ष घालावं, अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होऊ शकतो, असं आपण
पवार यांना सांगितल्याचं उदयनराजे भोसले म्हणाले.
****
राज्यातल्या विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व उच्च
महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचे आदेश उच्च शिक्षण
विभागानं दिले आहेत. या केंद्राची स्थापना करुन तात्काळ समन्वयकाची नियुक्तीही करण्यात
येणार आहे. उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.दिगंबर गायकवाड यांनी याबाबतचं परिपत्रक
जारी केलं.
****
मराठी भाषा विभागाचे यंदाचे विविध पुरस्कार काल जाहीर झाले.
यावर्षीचा ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना
जाहीर झाला आहे. पाच लाख रूपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप
आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ अहमदनगर जिल्ह्यातल्या
श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनला, ‘मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार’ औरंगाबादचे समीक्षक
डॉक्टर सुधीर रसाळ यांना, ‘कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार’ संजय जनार्दन
भगत आणि आंध्र प्रदेशातल्या मराठी साहित्य परिषद यांना जाहीर झाला आहे. मराठी भाषेचा
प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात शासनास विशेष आनंद होत
असून, येत्या २७ तारखेला, मराठी भाषा दिनी हे पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
हस्ते प्रदान करण्यात येतील, असंही देसाई यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र शासनाचं लघु उद्योग महामंडळ तसंच खादी ग्रामोद्योग
मंडळ आणि ई-कॉमर्स क्षेत्रातली आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट यांच्यात सामंजस्य करार झाला
आहे. या करारामुळे राज्यातल्या स्थानिक कामगार, विणकर, हस्तकलाकार आणि छोट्या उद्योगांनी
तयार केलेल्या वस्तुंना, देशव्यापी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास उद्योगमंत्री
सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. यासाठी फ्लिपकार्टनं मराठी भाषेतून आपलं संकेतस्थळ
आणि ॲप्लिकेशन विकसित केलं आहे. ग्रामीण भागातून तयार होणाऱ्या वस्तुंची बांधणी, तयार
वस्तू चिन्हांकीत करणं यासाठी फ्लिपकार्ट या कंपनीद्वारे कारागिरांना प्रशिक्षण दिलं
जाणार आहे, तसंच या वस्तुंचं विनामूल्य छायाचित्रण करण्यात येईल, असं फ्लिपकार्टचे
प्रमुख अधिकारी रजनीश कुमार यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन समित्यांची कामगिरी प्रभावी
आणि उत्कृष्ट करण्यासाठी, पुढील वर्षापासून तीनशे कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर ‘आव्हान
निधी’ राखीव ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत ही माहिती
दिली. याबरोबरच जिल्हा नियोजन समित्यांकडून ‘आय-पास’ संगणकप्रणालीचा शंभर टक्के वापर,
निधीचा वेळेत विनियोग, आढावा बैठकींचं नियमित आयोजन आदी निकषांवर उत्कृष्ट ठरणाऱ्या
महसूल विभागातल्या एका जिल्ह्याला, पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पुढील वर्षापासून
देण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी महिला, बालविकासाच्या
योजनांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यासाठी जिल्ह्यांना
दिलेला अखर्चित निधी, सार्वजनिक आरोग्य सेवांवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं
उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्यात काल तीन हजार २९७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख ५२ हजार ९०५ झाली आहे. काल
२५ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५१ हजार ४१५ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ५० शतांश टक्के झाला आहे.
तर काल सहा हजार १०७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ७०
हजार ५३ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ८४ शतांश
टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ३० हजार २६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत
****
मराठवाड्यात काल सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला, तर विभागात नव्या २४६ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन,
औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन, तर जालना आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा
समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ६६ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात
५१, नांदेड ४६, जालना ४४, बीड १९, उस्मानाबाद १२, परभणी पाच, तर हिंगोली जिल्ह्यात
काल तीन नवे रुग्ण आढळून आले.
****
विशेष रेल्वे गाड्यांच्या आगाऊ तिकीट आरक्षणासाठीचा कालावधी,
दहा दिवसांवरून १२० दिवस करण्यात आला असल्याचं, रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
नियमित प्रवासी गाड्या सुरू झाल्या नसल्यानं, रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येत
आहेत. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर - तिरुपती विशेष, छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनस मुंबई-हुजुर साहिब नांदेड विशेष, पुणे-हजूर साहिब नांदेड विशेष, लोकमान्य टिळक
टर्मिनस - सिकंदराबाद विशेष, पनवेल- हुजुर साहिब नांदेड विशेष, अमरावती-तिरुपती उत्सव
विशेष, या गाड्यांच्या आरक्षणाचा कालावधी वाढवला असून, सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर
आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर, या गाड्यांचं आरक्षण सुरू होणार असल्याचं रेल्वे विभागानं
सांगितलं आहे.
****
जालना - मुंबई - जालना जनशताब्दी विशेष रेल्वे गाडी येत्या
रविवारी १४ फेब्रुवारी पासून सुरु होत आहे. ही रेल्वेगाडी जालना इथून दररोज सकाळी साडे
आठ वाजता सुटून, दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी मुंबई इथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला
पोहोचणार आहे. मुंबई इथून दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी ही गाडी सुटणार असून, संध्याकाळी
सात वाजून ४५ मिनिटांनी जालना इथं पोहचणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
भारतीय निवडणूक आयोगाचं बनावट ओळखपत्र बनवणाऱ्या दोन जणांना
काल औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन माहिती घेऊन
एका खाजगी संकेतस्थळाच्या मदतीनं हे बनावट ओळखपत्र बनवण्यात येत होतं. ‘महा ई सेवा’
केंद्रातला एक सेवक नवनाथ शिंदे आणि एक खाजगी संगणक केंद्र चालवणारा हरीश वाघमारे,
यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला असून, किती जणांचं बनावट ओळखपत्र तयार करण्यात आलं आहे, याचा शोध
घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्यासंदर्भातल्या
अडचणी सोडवाव्यात, तसंच चार नवीन उपकेंद्र मंजूर करावे, आणि सध्याच्या उपकेंद्रांची
क्षमता वाढवावी अशी मागणी, आमदार अभिमन्यू पवार यांनी केली आहे. ऊर्जा मंत्री नितीन
राऊत यांची भेट घेऊन त्यांना या आशयाचं निवेदन सादर केलं असल्याचंही, त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कालपासून शेतकरी
ते थेट ग्राहक, असा रयत बाजार सुरू करण्यात आला आहे. दर सोमवार ते शुक्रवार या दिवसात
तात्पुरत्या स्वरूपात शेड टाकून, हा रयत बाजार सुरू झाला असून, याठिकाणी १०० रसायन
मुक्त नैसर्गिक भाजीपाल्याची दुकानं लावण्यात आली आहेत.
****
लातूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी,
शासनाच्या संकेत स्थळावर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. नोंदणी करताना अडचण आल्यास समाज
कल्याण कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन, कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर ग्रामीण रूग्णालयात काल जागतिक
युनानी दिन आणि कर्करोग जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी दंत चिकित्सक डॉ.
राजाराम कोळेकर यांनी कर्करोग टाळण्यासाठी बीडी तंबाखू मुक्त राहणं गरजेचं असल्याचं
सांगितलं.
****
मानवाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रदूषण आणि प्लास्टिकला
हद्दपार करून, निसर्गाला अधिक समृद्ध करण्याचं आवाहन, परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या
गौर ग्रामपंचायतीमध्ये ‘माझं गाव, सुंदर गाव’ या उपक्रमांतर्गत, प्लास्टिक गोळा करणं
आणि नागरिकांशी संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं, तसंच कोरोना विषाणू संसर्ग काळात चांगलं काम केलेल्या
आशाताई, अंगणवाडीताईंचा सन्मान करण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात भारतीय जनता पक्षातर्फे पंडित दिनदयाळ
उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून समर्पण दिन साजरा
करण्यात आला.
****
No comments:
Post a Comment