Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 June 2021
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०३ जून २०२१
सकाळी
७.१०
मि.
****
कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची संपूर्ण काळजी घेण्याचं, आणि सुरक्षित
राहण्याचं श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क
लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण
करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि
१ ० ७ ५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत
वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
कोविडमुळे पालकांचं छत्र हरपलेल्या बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची
मुदत ठेव ठेवण्याचा, तसंच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा
राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.
·
कोरोना विषाणू मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा.
·
राज्यात १५ हजार १६९ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात ५३ जणांचा मृत्यू
तर एक हजार ३८२ बाधित.
·
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला प्रस्ताव,
आपत्ती निवारण विभागाला पाठवणार- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड.
·
स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी, संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह
योजना सुरु करण्यास, राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.
आणि
·
औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये पाऊस.
****
कोविडमुळे आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या बालकांना आधार देण्याचा निर्णय राज्य
सरकारनं घेतला आहे. अशा बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा,
तसंच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्त्वपूर्ण
निर्णय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत
घेण्यात आला. ठेवीची ही रक्कम बालकाला वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणार
आहे. केंद्र सरकारच्या पीएम केअर योजनेतूनही अशीच योजना राबवण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त
ही योजना राज्य सरकार राबवणार आहे.
एक मार्च २०२० रोजी आणि त्यानंतर कोविड संसर्गामुळे आई आणि वडील मृत्यू पावलेले,
किंवा एका पालकाचा कोविड मुळे आणि दुसऱ्या पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास,
किंवा एका पालकाचा १ मार्च २०२० पूर्वीच मृत्यू झाला असेल, आणि त्यानंतर दुसऱ्या पालकाचा
कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास, अशा शून्य ते १८ वर्ष वयोगटातल्या बालकांचा या योजनेत
समावेश होणार आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या बालकांची कागदपत्रं कृतीदलासमोर सादर
करुन, अनाथ बालकांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी
यांची असेल, असं याबाबतच्या निर्णयात म्हटलं आहे. सध्या अशा १४१ बालकांची माहिती आतापर्यंत
मिळाली असून, सध्यातरी २०० बालकांसाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती, महिला आणि बालविकास
मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
****
राज्यातल्या ग्रामीण भागात कोरोना विषाणू मुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं
आणि गावं लवकरात लवकर कोरोना विषाणू मुक्त व्हावी यासाठी ‘कोरोनामुक्त गाव’ स्पर्धा
घेण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही घोषणा केली. गाव कोरोना
विषाणू मुक्त झाले तर तालुका, जिल्हा आणि याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र कोरोना विषाणू
मुक्त होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना
ते म्हणाले –
सहा विभागामध्ये आपण तीन बक्षीसं देणार आहोत. ५० लाखाचं पहिलं बक्षीस, २५ लाखाचं
दुसरं बक्षीस आणि १५ लाखाचं तिसरं बक्षीस अशा गावांना त्यांना लागणाऱ्या विकास कामांना
सुद्धा पहिल्या नंबरला ५० लाख, दुसऱ्या नंबरला २५ लाख आणि तिसऱ्या येणाऱ्या नंबरला
१५ लाख आमच्या ग्रामविकास विभागाच्या २५/१५ आणि ३०/५४ या विकास निधीमधून आम्ही विकास
कामांना निधी देणार आहोत.
****
राज्यात काल १५ हजार १६९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या ५७ लाख ७६ हजार १८४ झाली आहे. काल २८५ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ९६ हजार ७५१
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. काल २९ हजार २७० रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५४ लाख ६० हजार ५८९ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे.
सध्या राज्यभरात दोन लाख १६ हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल एक हजार ३८२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५३
जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २५, औरंगाबाद १३,
बीड सहा, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी तीन, तर जालना, हिंगोली आणि
नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ३७५ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात
३४०, औरंगाबाद १८५, नांदेड १५७, लातूर १५१, जालना १०७, हिंगोली ३४, तर परभणी जिल्ह्यात
काल ३३ नवे रुग्ण आढळून आले.
****
नादुरुस्त व्हेंटिलेटर्स बदलून नवीन आणि कार्यक्षम व्हेंटिलेटर्स प्राप्त करण्याची
जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं
आहे. कोविडसंदर्भात विविध माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन न्यायालयानं
दाखल करुन घेतलेल्या सुमोटो याचिकेवर काल सुनावणी झाली. पंतप्रधान मदत निधीतून मराठवाड्याला
प्राप्त झालेल्या नादुरुस्त व्हेंटिलेटर्स संदर्भात यावेळी सुनावणी झाली. केंद्र शासनातर्फे
असिस्टंट सॉलिसिटर जनरल अनिल सिंग या सुनावणीत ऑनलाईन सहभागी झाले होते. नवी दिल्ली
इथले दोन ज्येष्ठ डॉक्टर आज औरंगाबाद इथं येणार असून, या व्हेंटिलेटरची पाहणी करणार
असल्याचं, सिंग यांनी सांगितलं. यासंदर्भात पुढील सुनावणी सात जून रोजी होणार आहे.
****
आतापर्यंत खरेदी केलेली लस, भविष्यातील खरेदी, उपलब्धता आदींसह लस धोरणाबाबत
संपूर्ण तपशील दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला
दिले आहेत. लसीकरण आणि अन्य मुद्द्यांवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एल.
एन. राव आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट या तीन सदस्यीय पीठापुढे काल सुनावणी झाली.
केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली
असून, हा निधी कसा आणि कशासाठी खर्च केला याचा हिशोब सादर करावा, आणि हा निधी १८ ते
४४ वयोगटासाठी का खर्च केला जाऊ शकत नाही, याबाबतही स्पष्टीकरण द्यावं, असं न्यायालयानं
सांगितलं आहे.
****
आदर्श
भाडेकरू कायद्याच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. या माध्यमातून
राज्य आणि केद्रशासित प्रदेशांना आपापल्या भागात सध्या लागू असलेल्या भाडेकरू कायद्यात
आवश्यकतेनुसार सुधारणा करता येईल. देशभरात भाड्यानं घरं देण्यासंबंधीच्या सध्याच्या
कायदेशीर प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशानं, हा कायदा तयार करण्यात आला आहे.
आदर्श भाडेकरू कायद्यामुळे घर मालकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार होईल, आणि घर भाड्याने
देण्यासाठी ते पुढे येतील, असा विश्वास, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री
हरदीप सिंग पुरी यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
****
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला प्रस्ताव,
आपत्ती निवारण विभागाला पाठवला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी
ही माहिती दिली. या विभागाकडून याविषयी परवानगी दिली जाईल, आणि त्यानंतर अंतिम निर्णय
होईल, असं गायकवाड यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कोविड पार्श्वभूमीवर सीबीएसईची बारावीची
परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचं, त्या म्हणाल्या. मुलांच्या
शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरी, विद्यार्थ्यांचं आरोग्य
आणि सुरक्षा हेच सर्वांचं प्राधान्य असलं पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
****
स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी, संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह
योजना सुरु करण्यास, राज्य मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात
मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी १० वसतीगृह सुरु करण्यात येतील. बीड, अहमदनगर,
जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नाशिक आणि जळगाव, या १० जिल्ह्यांमधल्या
४१ तालुक्यांच्या ठिकाणी, प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमता असलेलं मुला-मुलींसाठी स्वतंत्र
असे एकूण ८२ वसतिगृहं उभारण्यात येतील. या ठिकाणी निवास, भोजन आदी सर्व सुविधा मोफत
उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. योजनेच्या पहिल्या टप्यात बीड जिल्ह्यात परळी, केज,
पाटोदा, गेवराई, माजलगाव आणि बीड, अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी आणि जामखेड, जालना जिल्ह्यात
घनसावंगी आणि अंबड या दहा तालुक्यात, मुला-मुलींसाठी २ असे एकूण २० वसतिगृह उभारण्यास
मंजुरी देण्यात आली आहे. सुरुवातीला ही वसतीगृह भाड्याच्या इमारतीत सुरु करण्यात येणार
आहेत. यासाठी गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळाला साखर कारखान्यांकडून प्रती टन
१० रुपये, आणि राज्य शासनाकडून १० रुपये, असे एकूण २० रुपये प्रमाणे प्राप्त होणाऱ्या
निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.
****
मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या जिल्ह्यांमध्ये काल
पावसाच्या सरी कोसळल्या. औरंगाबाद शहरात काल रात्री सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात मुरुड
आणि तांदुळजा भागात मुसळधार पाऊस झाला.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस
झाला. बदनापूर तालुक्यातल्या बाजार गेवराई, शेलगाव, धोपटेश्वर, गोकुळवाडी तसंच भोकरदन
तालुक्यातल्या राजूर, केदारखेडा या भागातही सायंकाळी पावसानं हजेरी लावली.
दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन, कृषी विभागानं केलं आहे.
येत्या पाच तारखेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी
मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, कृषी हवामान शास्त्र विभागानं
वर्तवली आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय
पेरणी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
****
संपूर्ण राज्यात कोविड रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्य सरकारनं लपवल्याचा
गंभीर आरोप, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल परभणी इथं पत्रकारांशी
बोलत होते. सरकारने स्वत:चं अपयश झाकण्यासाठी मृत्यूच्या संख्येचा आकडा लपवला, असं
ते म्हणाले. दरम्यान, फडणवीस यांनी त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोना संसर्गाचा दर पाच च्या
खाली आणला, तरच स्थिती नियंत्रणात येईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, फडणवीस यांनी काल नांदेड जिल्ह्याचाही दौरा करुन विष्णुपुरी इथल्या
शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती
घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी
ठरल्याचा आरोप केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा आणि लोहारा तालुक्याल्या सोळा गावातील कोविड संसर्ग
रोखण्यासाठी, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी, आजपासून १२ जून पर्यंत जनता संचारबंदीचा
निर्णय घेतला आहे. या कालावधीत गावांमध्ये अत्यावश्यक सेवांची दुकानं आणि आस्थापना
वगळता, इतर सर्व दुकानं तसंच आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
****
कोविड-19 मुळे हिंगोली जिल्ह्यातल्या ४० बालकांचं पालकत्व हिरावलं आहे. यामध्ये
३१ जणांनी वडील, आठ जणांनी आई तर एका बालकानं आई आणि वडील दोघेही गमावले आहेत. जिल्हा
महिला आणि बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांनी, या बालकांची काळजी तसंच सरंक्षणासाठी
स्थापन जिल्हास्तरीय कृती दलाच्या काल झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. या बालकांच्या
योग्य संगोपनासाठी विशेष काळजी घेत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
राज्यांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासापूर्वी आरटीपीसीआर चाचणी
करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडेय
यांनी काल एक पत्रक जारी करून ही माहिती दिली. राज्यातल्या अन्य शहरांतून औरंगाबाद
विमानतळावर येणाऱ्या आणि औरंगाबाद विमानतळावरून राज्यातल्या अन्य शहरात जाणाऱ्या विमान
प्रवाशांना आता ही चाचणी करावी लागणार नाही.
****
हिंगोली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं स्वस्त धान्याच्या ४६० गव्हाच्या पोत्यांसह
एक ट्रक जप्त केला. अकोला ते वाशिम मार्गावर ही कारवाई करण्यात आली. स्वस्त धान्य दूकानातला
४६० पोती गहू आणि १२ लाख रुपये किंमतीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला. ट्रकचालकासह अन्य
एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात
दरवर्षी सहा हजार रूपये जमा केले जातात. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन लाख ९४ हजार
शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा दोन हजार रूपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे.
पेरणीच्या हंगामाच्या दिवसात हे पैसे जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
****
लातूर इथं समाज कल्याण विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या
उमंग या दिव्यांग मुलांसाठीच्या रिसर्च सेंटला विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी
काल भेट दिली. सेंटर मध्ये देण्यात येणाऱ्या विविध थेरेपी प्रात्यक्षिकाची केंद्रेकर
यांनी पाहणी करून तिथले डॉक्टर, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. हा उपक्रम अत्यंत
चांगला असून असे उपक्रम राबवल्याबद्दल त्यांनी सर्वांचं अभिनंदन केले.
****
औरंगाबाद इथल्या खाम नदी पुनरुज्जीवनाच्या पहिल्या टप्प्यातली कामं मान्सून
पूर्व पूर्ण करण्याचे आदेश, महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिले
आहे. पाण्डेय यांनी काल व्हेरॉक कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांच्यासह
या कामाची पाहणी केली, त्यावेळी हे निर्देश दिले. जैन यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त
करुन कौतुक केलं.
****
No comments:
Post a Comment