Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 August 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१
ऑगस्ट
२०२१ सकाळी ७.१० मि.
****
** कोविडचा संसर्ग तीव्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक
करण्याचे केंद्र सरकारचे
निर्देश
** रस्त्यांच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांचं आवाहन
** इतर मागास वर्गाची सामाजिक तसंच आर्थिक जनगणनेची माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी राज्य शासनाची सर्वोच्च न्यायालयात याचिका
** राज्यात सहा हजार ९५९ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात
बारा जणांचा मृत्यू तर ३८२ बाधित
** टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत
थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत
कौरचा अंतिम फेरीत तर भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य
फेरीत प्रवेश
** बॅटमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची चीनच्या
ही बिंग जियोसोबत कांस्य पदकासाठी आज
लढत
आणि
** सध्या
सुरू असलेल्या वैयक्तिक स्पर्धेत गोल्फमध्ये अनिर्बान लाहिरी ३९व्या तर घोडेस्वारीमध्ये
फौआद मिर्झा १७व्या स्थानावर
****
देशातील कोविड बाधितांची संख्या आणि संसर्ग दरात तीव्र वाढ होत असलेल्या
जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
महाराष्ट्रासह १० राज्यांतल्या कोविड परिस्थितीचा काल केंद्रीय आरोग्य सचिव राजेश
भूषण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला, त्यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिवांनी कोविड आजार नियंत्रण
तसंच व्यवस्थापन धोरण विशद केलं. गेल्या काही आठवड्यांमध्ये १०टक्क्याहून जास्त
संसर्ग दर आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये, लोकांची ये-जा
थांबवण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी तसंच जमावाने एकत्र येणं आणि एकमेकांत मिसळणं
टाळण्याच्या दृष्टीनं कडक निर्बंध घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गृह विलगीकरणात असणाऱ्या रुग्णांचं नियमित आणि परिणामकारक पद्धतीनं परीक्षण
करण्यात यावं, आणि ज्या रुग्णांना रुग्णालयात दाखल
करण्याची आवश्यकता जाणवेल त्यांना वेळेवर पुढील वैद्यकीय उपचार मिळतील, याची खात्री करुन घेण्याची सूचना करण्यात आली. १० टक्क्याहून कमी संसर्ग
दर असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करून तिथल्या लोकांचं लसीकरण पूर्ण
करण्याकडे अधिक लक्ष पुरवण्याचा सल्ला राज्य सरकारांना देण्यात आला आहे. राष्ट्रीय पातळीवरील सीरो-सर्वेक्षण मिश्र स्वरूपाचं असल्यानं या सर्व
राज्यांनी आजाराच्या व्यापकतेबाबत माहिती गोळा करण्यासाठी राज्य पातळीवर सीरो
सर्वेक्षण करावं असे निर्देशही राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.
****
रस्ते दुरुस्त करताना तसंच नवे रस्ते तयार करताना ते दीर्घ काळ टिकतील
अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी केलं आहे. नागपूर - नागभीड रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलांच्या काल झालेल्या
उद्घाटन सोहळ्यात, मुख्यमंत्री ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या वेळी उपस्थित
होते. नव्या रेल्वेमार्गामुळे विदर्भातील ऊर्जा प्रकल्पांना फक्त दोन तासांमध्ये
कोळशाची सुलभ वाहतूक होणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समृद्धी महामार्गाला जालना इथून जोडण्याचं आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं.
****
केंद्र शासनाकडे असलेली इतर मागास वर्ग- ओबीसींची सामाजिक तसंच आर्थिक
जनगणनेची माहिती राज्य शासनास उपलब्ध करून द्यावी, यासाठी
राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल ही माहिती दिली. केंद्र
शासनाच्या ग्रामीण विकास आणि नागरी विकास खात्यांनी २०११ ते २०१४ याकाळात ओबीसींचा
इंपिरिकल डाटा जमा केला. हा डाटा मिळावा म्हणून
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे तसंच ग्रामविकास विभागाच्या तत्कालीन सचिवांनी सन २०१९ मध्ये
केंद्र सरकारच्या संबंधीत खात्यांबरोबर अनेकदा पत्र व्यवहार केला होता. मात्र, केंद्र सरकारचे जनगणना
आयुक्त कार्यालय, सामाजिक न्याय मंत्रालय तसंच ग्रामविकास
मंत्रालय यांनी डाटा न देता टोलवाटोलवी केली. हा डाटा उपलब्ध न झाल्यानं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द
झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. केंद्र शासनानं ही माहिती राज्याला दिल्यास या
माहितीच्या आधारे विश्लेषण करुन ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग
आयोगाला योग्य शिफारस करता येणं शक्य होईल, असं भुजबळ
यांनी म्हटलं आहे.
****
आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार आश्रमशाळातील इयत्ता ८ वी ते १२
वी चे वर्ग उद्यापासून सुरु करण्यात येणार असल्याचं आदिवासी विकास आयुक्त हिरालाल
सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी तसंच
सुरु झाल्यानंतर पाल्याला शाळेत आणि वसतिगृहात पाठवण्याआधी पालकांचं संमतीपत्र
घेणं बंधनकारक राहणार आहे.
****
राज्यात ५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी संस्थांना, सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास
परवानगी देण्यात आली आहे. सहकार विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ५० पेक्षा
जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी, ऑनलाईन
पद्धतीनं वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते असणं आवश्यक असून
त्यासाठी प्रत्येक गावातल्या पाणंद रस्त्याचे माती काम आणि मजबुतीकरण गरजेचं
असल्याचं मत राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड जिल्ह्यात
कंधार तालुक्यातल्या कारतळा या गावातील पाणंद रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. पाणंद रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.
गावातील पाणंद रस्ते पक्के झाल्यास दळण-वळणाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होण्यास मदत
होईल. योग्य नियोजन आणि आराखडा तयार करुन शासनाच्या वेगवेगळ्या योजना गावा-गावात
राबवाव्यात, त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
****
राज्यात काल सहा हजार ९५९ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख ३ हजार ७१५
झाली आहे. काल २२५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३२
हजार ७९१ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के
झाला आहे. काल सात हजार ४६७ रुग्ण बरे झाले, राज्यात
आतापर्यंत ६० लाख ९० हजार ७८६ रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक
६२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७६ हजार ७५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३८२ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर बारा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी पाच रुग्णांचा तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
दोघांचा समावेश आहे.
नांदेड, हिंगोली, परभणी,
लातूर आणि जालना जिल्ह्यात काल एकाही मृत्युची
नोंद झालेली नाही.बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १९८ रुग्ण आढळले तर
उस्मानाबाद जिल्ह्यात शंभर नव्या रुग्णांची भर पडली. औरंगाबाद ३५, लातूर २८, जालना १२, नांदेड
पाच, हिंगोली तीन, तर परभणी जिल्ह्यात
एक रुग्ण आढळला.
****
नागरिकांनी शासकीय वैद्यकीय यंत्रणेकडे
असलेल्या सेवा लक्षात घेवून शासकीय
रुग्णालयांमध्येच उपचार घेण्याला प्राधान्य देण्याचं आवाहन परभणीचे पालकमंत्री
नवाब मलिक यांनी केलं. जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीत काल ते बोलत
होते. जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या
दृष्टीनं अल्पसंख्यांक विभागाकडून रुग्णालयासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिल्याची
माहिती पालकमंत्री मलिक यांनी यावेळी दिली. दरम्यान, ही बैठक
निव्वळ सोपास्कार ठरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना
साकोरे-बोर्डीकर यांनी केला. या बैठकीच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे
शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं
त्यांना मदत अत्यावश्यक असताना त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही, असं त्या
म्हणाल्या.
****
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये काल थाळीफेक मध्ये भारताच्या कमलप्रीत कौर हिने ६४ मीटर
थाळी फेकत अंतिम फेरीत प्रवेश केला. ही फेरी उद्या होणार आहे. थाळीफेक मध्येच सीमा
पुनिया तिच्या गटात सोळाव्या क्रमांकावर राहिली.
भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिका संघावर ४-३ अशी
मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या संघाचा उद्या ऑस्ट्रेलियासोबत उपांत्य
फेरीचा सामना होईल. काल वंदना कटारियाने तीन आणि नेहा गोयलने एक गोल केला. वंदना
कटारिया ऑलिम्पिक सामन्यात हॅटट्रिक करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. बॅटमिंटनच्या
उपांत्यफेरीत पी.व्ही. सिंधूचा चिनी तैपेईच्या ताई झू यिंन हिने २१-१८, २१-१२ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. आज सिंधूचा चीनच्या ही बिंग
जियो हिच्यासोबत कांस्य पदकासाठी सामना होईल. महिलांच्या ५० मीटर रायफल प्रकारात
पात्रता फेरीत अंजूम मौदगील आणि तेजस्वीनी सावंत अनुक्रमे १५ आणि ३३ व्या
क्रमांकावर राहिल्यानं, अंतिम फेरीत पोहोचू शकल्या नाहीत.
मुष्टीयोद्धा पूजा रानीलाही काल उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा
लागला. पुरुषांच्या फ्लायवेट प्रकारात अमित पंघलही पराभूत झाला. पुरुषांच्या लांब उडीच्या
पात्रता फेरीत भारताचा श्रीशंकर १३ व्या स्थानावर राहिला. तिरंदाजीमध्ये अतनु दास
उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला नाही. भारताचं तिरंदाजीतलं आव्हान आता
संपुष्टात आलं आहे. दरम्यान,
आज सकाळी सुरु झालेल्या वैयक्तिक स्पर्धेत गोल्फमध्ये अनिर्बान लाहिरी ३९व्या तर घोडेस्वारीमध्ये
फौआद मिर्झा १७व्या स्थानावर खेळत आहेत.
****
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या
पार्थिव देहावर सांगोला इथं काल दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकीय लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी देशमुख यांचं
अंत्यदर्शन घेऊन, श्रद्धांजली अर्पण केली. देशमुख यांचं
शुक्रवारी रात्री सोलापूर इथं खासगी रुग्णालयात निधन झालं. देशमुख यांच्या
निधनाबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते
प्राध्यापक किसनराव किनवटकर यांचं काल पहाटे हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. किनवटकर हे बळीराम पाटील महाविद्यालयात प्राध्यापक
होते. नांदेड जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे ते
अध्यक्ष होते.
****
राष्ट्र निर्माण कार्यात कन्नड इथलं छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ
चांगले कार्य करत असून, तरुण पिढी उत्तम प्रकारे घडवत असल्याचे
गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात
कन्नड इथं शिवाजी महाविद्यालयात लक्ष्मणराव मोहिते ग्रंथालय नामकरण काल थोरात
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. बाबुराव औराळकर
इनडोअर क्रीडांगणाचं उद्घाटन, तसंच औराळकरांच्या अर्धाकृती
पुतळ्याचे अनावरणही थोरात यांच्याहस्ते करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना
मदतीचं वाटप काल पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते
करण्यात आलं. आकांक्षा रमेश काळे, माऊली राम पवार,
काकासाहेब गोरोबा भंडे आणि मारोती सिदराम कांबळे यांच्या
कूटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत निधीचे धनादेश अदा करण्यात आले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर
इथं काल प्रधानमंत्री स्वनिधी योजना नोंदणी शिबीर घेण्यात आलं. कोविडच्या काळात
टाळेबंदीमुळे छोट्या व्यावसायिकांची आर्थिक परीस्थिती ढासळली असल्याने त्यांना
पुन्हा उभं करण्यासाठी सुरू केलेल्या स्वनिधी योजनेत दहा हजार रुपये कर्ज स्वरुपात देण्यात येत
आहेत. उस्मानाबादचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनात या नोंदणी
शिबीरात काल सुमारे साडे तीनशे लोकांची नोंदणी झाली.
****
समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १०१वी जयंती आणि लोकमान्य बाळ
गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. यानिमित्त आज औरंगाबाद जिल्ह्यात विविध
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
मराठवाडा कृष्णा प्रकल्पाचे पाणी दुधाळवाडी प्रकल्पापर्यंत यावं यासाठी खास
प्रयत्न केले. परिणामी या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र आता ओलिताखाली येणार
असल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं
आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील विविध गावातील विकास कामाच्या
शुभारंभप्रसंगी ते काल बोलत होते. तालुक्यात तीन गावांमध्ये जवळपास दीड कोटी
रुपयांहून अधिकच्या निधीतून विकास कामं करण्यात येत आहेत.
****
परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर काल शासनाच्या सेवेतून निवृत्त झाले. जिल्हा
प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी काल
सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मुगळीकर यांच्या निवृत्तीनंतर आंचल गोयल
या परभणीच्या जिल्हाधिकारी पदावर रुजू होणार होत्या. मात्र त्यांची ही बदली
रद्द झाल्याचं सांगण्यात आलं.
****
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आगामी २४ तासात हलक्या ते मध्यम
स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.या काळात आकाश ढगाळ
राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
//*****************//
No comments:
Post a Comment