Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 August 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ ऑगस्ट २०२१ दुपारी १.०० वा.
****
पेगॅसस
हेरगिरी प्रकरणावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं.
राज्यसभेचं
कामकाज सुरु झाल्यावर सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी, सरकार शेतकरी आंदोलन आणि महागाईच्या
मुद्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी विरोधी पक्षांनी दिलेले
स्थगन प्रस्ताव फेटाळले. त्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन
घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सभापतींनी या सदस्यांना निलंबित करण्याचा इशाराही
दिला, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दुपारी
दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.
लोकसभेतही
कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, डाव्या पक्षाच्या सदस्यांनी पेगॅसस
आणि कृषी विधेयकाच्या मुद्यावर गदारोळ करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी
या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं
लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
****
टोकियो
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं कांस्य पदक पटकावलं आहे.
आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात लवलीनाला तुर्कीच्या सुरमेनेली बुसेनाझ हिच्याकडून
शुन्य - पाच असा पराभव पत्करावा लागला. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी ती तिसरी भारतीय
मुष्टीयोद्धा आहे.
कुस्तीमध्ये
भारताच्या दिपक पुनिया आणि रवी दहिया यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. दीपकनं
८६ किलो वजनी गटात चीनच्या झुशेन लीन चा सहा - तीन असा पराभव केला. तर रवीनं फ्रिस्टाईल
प्रकारात ५७ किलो वजनी गटात बल्गेरियाच्या जॉर्जी वांगेलोव्ह याचा पराभव केला. दोघांचेही
उपान्त्य फेरीतले सामने आजच होणार आहेत.
कुस्तीमध्ये
महिलांच्या ५७ किलो वजनी गटात अंशु सिंगला बेलारुसच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा
लागला.
आज
पहाटे झालेल्या भालाफेक स्पर्धेत भारताचा नीरज चोप्रा अंतिम फेरीत पोहोचला आहे. गोल्फमध्ये
महिलांच्या एकेरी प्रकारात भारताच्या दीक्षा डागर आणि अदिती अशोक पहिली फेरी खेळत आहेत.
महिला हॉकी संघाचा उपांत्यफेरीचा सामना आज अर्जेंटिना संघासोबत होणार आहे.
****
देशात
आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या ४८ कोटी ५२ लाख ८६ हजार ५७० मात्रा देण्यात आल्या
आहेत. काल दिवसभरात ६२ लाख ५३ हजार ७४१ नागरीकांना लस देण्यात आली.
दरम्यान,
देशात काल नव्या ४२ हजार ६२५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५६२ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या तीन कोटी १७ लाख ६९ हजार १३२
झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत चार लाख २५ हजार ७५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काल ३६ हजार ६६८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत तीन कोटी नऊ लाख ३३ हजार २२ रुग्ण
कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख दहा हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेचे वर्ष २०२१ चे ग्रंथ पुरस्कार आज जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाड्मय
पुरस्कार बीडचे विजय जावळे यांच्या 'लोकमात' या कादंबरीला जाहीर झाला आहे. प्राचार्य
म भि चिटणीस वांङमय पुरस्कार नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्या 'अठराशे सत्तावन्न
आणि मराठी कादंबरी' या समीक्षा ग्रंथाला, कैलासवासी कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार
पुण्याचे देवा झिंजाड यांच्या 'सगळं उलथवून टाकलं पाहिजे' या काव्य संग्रहाला जाहीर
झाला आहे. बी रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातले संतोष जगताप यांच्या
'विजेने चोरलेले दिवस' या कादंबरीला, कुमार देशमुख नाट्य पुरस्कार औरंगाबादचे डॉ. अनंत
कडेठाणकर यांच्या 'साल्मन' या नाटकाला, तर रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार मुंबईच्या
'ग्रंथाली वाचक चळवळ' या संस्थेला जाहीर झाला आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य
कौतिकराव ठाले पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
****
औरंगाबाद
शहरातलं नियोजित क्रीडा विद्यापीठ पुणे इथं उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात
भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
करण्यात आली. या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या खेळाडूंसाठीचं एक
मोठं व्यासपीठ आघाडी सरकारने पुण्याला पळवल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी यावेळी
केला.
****
जालना
शहरापासून जवळच असलेल्या घाणेवाडी तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला. परमेश्वर भानुदास
खंडागळे आणि रोहित कृष्णा खंडागळे, अशी मृतांची नावं आहेत.
****
भारत
आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नॉटिंघम
इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment