आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधीमंडळाचं
हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालं. कोविडच्या पार्श्वभूमीवर केवळ पाच दिवस हे
अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात, महिला आणि बालकांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षेची
तरतूद असलेल्या शक्ती विधेयकासह, २६ नवीन विधेयकं सादर केले जातील.
****
मुलींच्या लग्नाची
वयोमर्यादा १८ वरून वाढवून २१ वर्ष करण्याची तरतूद असलेलं बालविवाह प्रतिबंधक सुधारणा
विधेयक २०२१ काल लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक सर्व जातीधर्मातल्या महिलांना विवाहात
समान हक्क पुरवेल, असं महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी विधेयक मांडताना
सांगितलं.
****
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त, देशी बनावटीचे अत्यधुनिक अर्व्ह हे चिलखती वाहन, लष्करप्रमुख
जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या उपस्थितीत, औपचारिकपणे काल भारतीय लष्करात दाखल करून
घेण्यात आलं. देशांतर्गत संरक्षण उपकरणांची निर्मिती झाल्यामुळे सैन्यदलाचं मनोबल वाढेल,
असं नरवणे यावेळी म्हणाले. हे चिलखती वाहन संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओनं
विकसित केलं आहे.
****
ओमायक्रॉन विषाणूच्या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही सूचना केल्या
आहेत. हा विषाणू डेल्टाच्या तिप्पट संसर्गजन्य असून, त्याला वेळीच आवर घालण्यासाठी
राज्यांनी गरज भासल्यास वॉर रुम्सची निर्मिती करुन रात्रीची संचारबंदी लागू करावी,
असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
औरंगाबादच्या
धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाला येत्या जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या
आणि तिसऱ्या आठवड्यात, नांदेड इथून, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातलं कामकाज
पाहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरित पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात औरंगाबाद
इथून, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांचं कामकाज करण्यास सांगण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात
काल २२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. परभणी जिल्ह्यात सात, औरंगाबाद सहा, नांदेड
चार, लातूर तीन, तर बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाची नोंद झाली.
उस्मानाबाद तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
No comments:
Post a Comment