Thursday, 20 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 20.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २० जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्राची प्रगती आपली प्रगती आहे, भारत देश आज जे काही करत आहे त्यात, ‘सबका प्रयास’ अर्थात सर्वांचे प्रयत्न समाविष्ट असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘आझादी के अमृतमहोत्सव से स्वर्णिम भारत की ओर’, या उपक्रमाचं उद्घाटन, आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. समता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर भक्कमपणे उभा असलेला समाज आपण निर्माण करत आहोत, नाविन्यपूर्ण विचार, दृष्टीकोन, आणि प्रगतीशील निर्णय घेणाऱ्या नवीन भारताच्या उदयाचे, आपण साक्षीदार आहोत, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. अमृत महोत्सवाचा हा काळ, डोळे बंद करुन स्वप्न पाहण्याचा नाही तर जागे होऊन संकल्प पूर्ण करण्याचा आहे, शेकडो वर्षांच्या गुलामीत आपल्या समाजाने जे गमावले आहे, ते परत मिळवण्याची ही पुढची २५ वर्षे असल्याचं, त्यांनी नमूद केलं. समाजासाठी विविध कामे करणारी प्रजापती ब्रह्मकुमारी संस्था, आत्मनिर्भर भारतासाठी निश्चितच हातभार लावू शकते, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत ब्रम्हाकुमारीतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित असलेले ३० अभियान आणि १५ हजाराहून अधिक विविध कार्यक्रम आणि उत्सव होणार आहेत. ब्रह्माकुमारीचे संस्थापक पिताश्री प्रजापिता यांच्या ५३ व्या स्वर्गारोहण दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ७३ लाख ३८ हजार ५९२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५९ कोटी ६७ लाख ५५ हजार ८७९ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ६१ लाख ७५ हजार ४९ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे. 

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या नऊ नगरपंचायतींपैकी सात नगर पंचायतींमध्ये मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचं दिसून येत आहे. मात्र, दक्षिणेकडील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली या नगर पंचायतींमध्ये सत्तेची चावी आदिवासी विद्यार्थी संघाच्या हातात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

धानोरा नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली. व्यापारिकदृ्ष्ट्या महत्वाच्या असलेल्या चामोर्शी नगरपरिषदेत वेगवेगळे लढहूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी १३ जागा जिंकल्या. याठिकाणी भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं.

कुरखेडा इथं भाजपनं नऊ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. याठिकाणी काँग्रेस-शिवसेना युतीला आठ जागा मिळाल्या. कोरचीमध्ये आठ जागा जिंकून काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला असून, भाजपनं सहा जागांवर विजय मिळवला.

****

राज्य मंत्रीमंडळानं विविध पदांच्या भरतीसाठी पॅनलवरच्या कुठल्याही कंपनीची सेवा घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. यापुढे पदभरतीच्या सर्व परीक्षा टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल च्या माध्यमातून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, यासंदर्भातला शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला. परीक्षेसाठी पॅनलवर असलेल्या सर्व कंपन्यांच्या पॅनलला मंत्रीमंडळानं स्थगिती दिली आहेत.

****

नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीच्या वतीनं अहमदनगर इथले नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व निवारण समितीचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र बोरुडे यांना नुकतंच प्रदान करण्यात आलं. फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी, महाराष्ट्रात सर्वाधिक मोफत शिबिरे आयोजित करून सर्वसामान्य गरजू रुग्णांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत.

****

परभणी जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीनं सुरू असलेल्या जल जीवन मिशन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयीची माहिती, येत्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये गावातल्या लोकांना दिली जाणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी काल ही माहिती दिली. जिल्ह्यातल्या एल लाख चार हजार ६८ कुटुंबांना या योजनेतून नळ जोडणीचं उद्दीष्ट देण्यात आलं आहे.

****

मध्य रेल्वेच्या ठाणे-दिवा भागात रेल्वेरुळांच्या कामासाठी ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे नांदेड विभागातून धावणारी नांदेड - मुंबई - नांदेड २२ जानेवारीला आणि परतीच्या प्रवासात २३ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे. तर जालना - मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस २३ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे. 

****

लखनौ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूनं तानिया हेमंतचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधुनं तानियाला केवळ २७ मिनिटात २१- नऊ, २१ - नऊ असं हरवलं.   

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...