Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21
January 2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२१ जानेवारी २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं
ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं,
आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं
आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा,
दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती
आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०-
२६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·
येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यास राज्य सरकारची मान्यता,
महाविद्यालयं सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवणार
·
राज्यातल्या क्रीडा संकुलांच्या अनुदानात वाढ, जनतेला माफक
दरात वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी रेती उत्खननाचं सुधारित धोरण लागू
·
राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे १२५ नवे रुग्ण
·
कोविड संसर्गाचे राज्यात ४६ हजार १९७ रुग्ण, मराठवाड्यात
तर सहा जणांचा मृत्यू तर तीन हजार ६०० बाधित
·
औरंगाबाद शहरातली लेबर कॉलनीतील रहिवाशांची याचिका उच्च न्यायालयानं
फेटाळली, घरं खाली करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ
आणि
·
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट
सामना
****
येत्या
सोमवारपासून राज्यातल्या शाळा सुरु करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. संबंधित जिल्ह्यांचे
जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी, यांना शाळा
सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आल्याचं, त्यांनी सांगितलं. शाळा
सुरू करण्यासंदर्भात सर्वच स्तरांतून मागणी होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची
काळजी घेऊन आणि कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून सोमवारपासून शाळा
सुरू होतील, असं गायकवाड यांनी नमूद केलं, त्या म्हणाल्या...
पालक वर्ग, स्कूल मॅनेजमेंट
कमिटी, शिक्षक, मुख्यध्यापक असतील आणि तिथलं स्थानिक प्रशासन असेल यांच्या माध्यमातून
स्थानिक लेव्हलला जे आहे ते यासंदर्भामधले निर्णय घेतले जातील. ज्याठिकाणी कोरोनाची
संख्या कमी असेल अशा ठिकाणी पूर्णपणे कोरोनाचा प्रोटोकॉल पाळून आम्ही ज्या एसओपीज ज्या
दिल्या आहेत त्या काटेकोर पद्धतीने पालन करुनच या शाळा २४ तारखेपासून सुरु केल्या जातील.
मग ते पहिली ते बारावी असेल आणि प्री प्रायमरी एज्यूकेशन या दोन्हीच्या बाबतीत सुद्धा
हा निर्णय झालेला आहे. या शाळा आता सुरु करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी
संमती दिली आहे.
१५
ते १८ वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातल्या मुलांचं शाळेतचं लसीकरण
करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे
यांनी सांगितलं.
दरम्यान,
राज्यातली महाविद्यालयं सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
करणार असून, यासंदर्भातला प्रस्ताव त्यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याची
माहिती, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
दरम्यान,
औरंगाबाद शहरातील शाळा सोमवार ऐवजी आठ दिवसानंतर सुरु करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं
घेतला आहे. कोविड रुग्णांची संख्या वाढती असल्यानं आठ दिवस निरीक्षणानंतर शाळा सुरु
करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय
यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
क्रीडा सुविधा वाढवण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल तसंच तालुका
क्रीडा संकुलांसाठी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत
घेण्यात आला. सध्या विभागीय क्रीडा संकुलांसाठी असलेली चोवीस कोटी रुपयांची आर्थिक
मर्यादा वाढवून, ती पन्नास कोटी रुपये करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा संकुलांसाठीची
मर्यादा पंचवीस कोटी रुपये, तर तालुका क्रीडा संकुलांसाठीची आर्थिक मर्यादा, पाच कोटी
रुपयांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. ही सुधारित अनुदान मर्यादा, यापुढे
प्रशासकीय मान्यता देण्यात येणाऱ्या आणि बांधकाम सुरू करण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलांसाठी
लागू राहील. ज्या क्रीडा संकुलांना यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली असून बांधकाम
पूर्ण झालं आहे अथवा बांधकाम सुरू आहे अशा तालुका क्रीडा संकुलांना तीन कोटी रुपये,
जिल्हा क्रीडा संकुलांना पंधरा कोटी रुपये आणि विभागीय क्रीडा संकुलांना तीस कोटी रुपये
अनुदान देण्यात येईल. या अनुदानातून या क्रीडा संकुलामध्ये अतिरिक्त क्रीडा तसंच मुलभुत
सुविधा निर्माण करणं, नवीन क्रीडा उपकरणं आणि साहित्य तसंच उपलब्ध क्रीडा सुविधांच्या
अद्ययावतीकरणासाठी वापरता येईल.
राज्यातल्या
नदी आणि खाडी पात्रातल्या वाळू, रेती उत्खननाबाबतचं सध्याचं धोरण रद्द करून, जनतेला
माफक दरात वाळू मिळावी या दृष्टीनं, वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वंकष असं सुधारित धोरण
लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मौलाना
आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत भागभांडवलाची मर्यादा, पाचशे कोटी
रुपयांवरुन सातशे कोटी रुपये वाढवण्यासंही, काल मंजूरी देण्यात आली.
यापूर्वी
मान्यता दिलेल्या जलसंपदा प्रकल्पांच्या निविदा निश्चितीच्या बाबींमध्ये बदल करून,
११४ कोटी रुपयांऐवजी ६२४ कोटी रुपये किंमतीच्या मर्यादेत निविदा निश्चिती करण्यासही
मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. धरण पुर्नस्थापना आणि सुधारणा प्रकल्प टप्पा
दोन आणि तीन बाबत विभागानं सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करुन हा निर्णय घेण्यात
आला आहे.
****
राज्यात
काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले १२५ नवे रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुणे जिल्ह्यातले
आहेत. यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता दोन हजार एकशे ९९ झाली
असून, यापैकी एक हजार एकशे ४४ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
राज्यात
काल कोविड संसर्ग झालेले नवे ४६ हजार १९७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ७३ लाख ७१ हजार ७५७ झाली आहे. काल ३७ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार
९७१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९२ शतांश टक्के झाला आहे. काल ५२ हजार २५ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६९ लाख ६७ हजार ४३२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
दोन लाख ५८ हजार ५६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल तीन हजार ६०० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन, लातूर दोन, तर नांदेड जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात एक हजार ८९ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ७३४,
तर ग्रामीण भागातले ३५५ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ७२०, लातूर ६३३, उस्मानाबाद ३१०,
बीड ३३९, परभणी २३२, जालना २२४, तर हिंगोली जिल्ह्यात १५५ रुग्णांची नोंद झाली.
****
गडचिरोली
जिल्ह्यातल्या नऊ नगरपंचायतींपैकी सहा नगर पंचायतींमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळालं
आहे, तर एटापली आणि अहेरीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही. सिरोंचात आदिवासी विद्यार्थी
संघानं विजय मिळवला आहे.
****
वीज
देयकाच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणार असल्याचे बनावट संदेश पाठवून वीज ग्राहकांची
फसवणूक करणाऱ्यांविरोधात, फौजदारी कार्यवाही करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार
दाखल करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल दिले.
महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना यावर कार्यवाहीच्या सूचना त्यांनी
केल्या. अशा फसव्या संदेशांना बळी पडू नये, असं आवाहनही त्यांनी ग्राहकांना केलं आहे.
****
औरंगाबाद
शहरातली लेबर कॉलनी ही ३३८ घरांची वसाहन जमीनदोस्त करण्याच्या नोटिसीला आव्हान देणारी
याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली आहे. मात्र कोविड महामारीचा
विचार करुन रहीवाशांना घरं रिकामी करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.
३१ ऑक्टोबर २०२१ रोजी अतिरिक्त आयुक्तांनी लेबर कॉलनी निष्कासित करण्याची नोटिस प्रसिद्ध
केली होती. या नोटीसीला कॉलनीतल्या रहीवाशांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात लग्न समारंभात कोविड नियमांच्या निर्देशांसह बँड पथकाला परवानगी देण्यात
आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या संदर्भातले निर्देश काल दिले. बँड व्यावसायिक,
वादक, कलाकार यांच्या उदरनिर्वाहाचा विचार
करुन ही विशेष परवानगी देण्यात येत आहे. मात्र, यासाठी बँड पथकाच्या सदस्यांनी लसीच्या
दोन्ही मात्रा घेतल्या असणं बंधनकारक आहे. बँड पथकानं लग्न समारंभात आंतर राखून बँड
वाजवावा, बँड मालकानं पथकासाठी ताप मापक, निर्जंतुकीकरण सोबत ठेवावं आणि वेळोवेळी कोविड
चाचणी करण्यात यावी, असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी म्हटलं आहे.
****
पाण्याचा
शाश्वत स्रोत असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरींची कामं तात्काळ पूर्ण करावीत, असं आवाहन,
परभणी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. पूर्णा
तालुक्यातल्या गौर या गावात, विहिरी आणि सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजना- नरेगा अंतर्गत विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत, त्यांनी कुठलाही
विलंब न करता सदर विहिरींची कामं तात्काळ पुर्ण करावीत, असं आवाहनही टाकसाळे यांनी
यावेळी केलं.
****
हिंगोली
जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दुर करावा तसंच कयाधू नदीवर बंधारे बांधावे या प्रमुख मागण्यांसाठी,
सिंचन संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी काल सालेगाव इथल्या कयाधू नदीपात्रात
उपोषण सुरु केलं. अनेक गावकऱ्यांनीही या मागणीसाठी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
निश्चित उपाय योजले जात नाहीत तोवर हे आंदोलन सुरू राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी
दिला आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण असलेल्या प्रलंबित प्रकल्पांच्या विकास कामांसाठी
अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी,
उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पवार यांच्या
अध्यक्षतेखाली आज जिल्हा वार्षिक आराखडा बाबत बैठक होणार असून, त्या अनुषंगानं ही मागणी
करण्यात आली आहे. उस्मानाबादी शेळीचं संवर्धन आणि अनुषंगिक मूल्य वृद्धी, कौडगाव इथं
उपलब्ध जमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती, आनुषंगिक उपकरण निर्मिती, `तांत्रिक टेक्सटाईल
हब` यासारखे प्रकल्प उभारल्यास, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य असल्याचं,
पाटील यांनी या पत्रात नमुद केलं आहे.
****
भारत
आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान सुरू तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा
सामना आज पर्ल इथं होत आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. पर्ल
इथंच झालेल्या पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिका संघानं मालिकेत एक- शून्य अशी आघाडी
घेतली आहे.
****
बीड
जिल्ह्यातल्या परिवहन कार्यालयातला सहाय्यक उपप्रादेशिक निरीक्षक रविकिरण भड आणि त्याचा
खाजगी सहाय्यक चंद्रकांत गायकवाड यांना काल लाच घेताना अटक करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते
बक्शु अमीर शेख यांनी या संदर्भात तक्रार केली होती.
****
No comments:
Post a Comment