Saturday, 22 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये योग्य समन्वय असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभरातल्या आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते आज संवाद होते. उस्मानाबाद, हिंगोलीचे नंदुरबार, गडचिरोली, सिंधुदुर्ग, वाशिम, आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज आकांक्षित जिल्हे देशाच्या प्रगतीतले अडथळे दूर करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या जिल्ह्यांसमोर असलेली नवी लक्ष्यं आणि आव्हानांसाठी पंतप्रधानांनी जिल्हाधिकार्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. 

****

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या.

संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी रंगभूमीला समर्पित महान कलावंत आपण गमावला असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

****

मुंबईत ताडदेव भागातल्या एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या १३ गाड्यांच्या सहाय्यानं आग विझवण्यात आली. आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकले आहेत का, याचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

विविध जिल्ह्यांच्या आगामी आर्थिक वर्षाच्या प्रारुप विकास आराखड्याला, अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे. काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत पवार यांनी, औरंगाबाद जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षासाठी ३८५ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्याला, बीड ३६० कोटी रुपये, लातूर २९० कोटी रुपये, परभणी २४० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास, मंजुरी दिली. नांदेड जिल्हा नियोजन विभागाला आगामी वर्षासाठी ३०३ कोटी ५२ लाख रुपये मर्यादेत, आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र जिल्ह्याचा विस्तार तसंच विकास कामांची अत्यावश्यकता लक्षात घेता, वाढीव तरतुदीचा आग्रह पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत लावून धरल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली इथं झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळालं आहे. एकूण पंधरा संघ सहभागी झालेल्या या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचं अप्रतिम सादरीकरण केलं. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणार्या मुख्य सोहळ्यात,"महाराष्ट्रातील जैवविविधता आणि जैव मानके" या विषयावरचा चित्ररथ सहभागी होणार आहे.

****

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने औषध विक्रेत्या दुकानांवर लादलेले अनावश्यक निर्बंध न हटवल्यास, कोरोना प्रतिबंधक औषधांची विक्री बंद करण्याचा इशारा, राज्य औषध विक्रेते संघटनेनं दिला आहे. कोरोनाचे होम टेस्टिंग किट ज्या ग्राहकांना विकले आहेत त्यांची संपूर्ण माहिती ठेवणं, या औषध विक्रत्यांवर बंधनकारक करण्यात आलं आहे. या किटची ऑनलाईन विक्री जोरात सुरु असून, त्यावर कोणतेही निर्बंध नसताना औषध विक्रेत्या दुकानांवरचं ही सक्ती का अशी विचारणा संघटनेनं केली आहे.

****

औरंगाबाद शहरात सिडकोतल्या कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी, त्यांच्या नावाने ग्रामीण भागातल्या युवक- युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करावी, अशी मागणी, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन काल त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना दिलं. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर आणि सन्मान सैनिकी शाळाच असेल; या शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच, तसंच विविध इतर शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं जलिल यांनी नमूद केलं.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्यानं नांदेडच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागानं येत्या २६ ते २९ जानेवारी या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेदवारांनी, नोंदणी करण्याचं आवाहन, सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.

****

मराठवाड्यात २६ जानेवारीपासून आठवडाभर तापमानात घट होण्याची शक्यता, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान संशोधन केंद्रानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...