Saturday, 22 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      नवी दिल्लीत इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

·      जालना जिल्ह्यात पहिली ते बारावी; औरंगाबाद आणि बीडमध्ये फक्त १० वी आणि १२वी तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू

·      दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनेच - शिक्षण मंडळाकडून स्पष्ट

·      सामाजिक न्याय विभागाची बंद केलेली वसतिगृहं पुन्हा सुरु करायचा राज्य सरकारचा निर्णय 

·      राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे नवे १४४ रुग्ण; बीड तसंच परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश

·      राज्यात कोविडचे नवे ४८ हजार २७० रुग्ण; मराठवाड्यात चौघांचा मृत्यू तर नव्या चार हजार ५१ रुग्णांची नोंद

आणि

·      सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू उपांत्य फेरीत दाखल

****

नवी दिल्लीत इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या होलोग्राम प्रतिमेचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. पंतप्रधानांनी काल एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. उद्या २३ जानेवारीला नेताजींची १२५ वी जयंती साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया गेट जवळच्या छत्रीत नेताजींचा पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. ग्रॅनाइटपासून साकारला जाणारा हा पुतळा तयार होईपर्यंत, त्याठिकाणी त्रिमिती छायाप्रकाशाच्या साहाय्यानं नेताजींची प्रतिमा साकारली जाणार आहे. या होलोग्राम प्रतिमेचं अनावरण उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होईल. हा पुतळा म्हणजे सुभाषबाबूंविषयी देशाच्या कृतज्ञतेचं प्रतिक असेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या छत्रीसमोर तेवत असलेली अमर जवान ज्योत याच परिसरात उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातल्या अखंड ज्योतीत काल समारंभपूर्वक विलीन करण्यात आली.

****

राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करताना विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देश, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू होत असलेल्या शाळांच्या पूर्वतयारीबाबत, गायकवाड यांनी काल आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं संपूर्ण लसीकरण करून घ्यावं, अशी सूचना त्यांनी केली.

****

जालना जिल्ह्यात शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग कोविड नियमांचं पालन करत परवा सोमवारपासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी परवानगी दिली आहे. सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना काल याबाबतचे आदेश देण्यात आले.

****

औरंगाबाद महानगरपालिकेअंतर्गत सर्व व्यवस्थापनं तसंच सर्व माध्यमांच्या शाळांचे १० वी तसंच १२ वी चे वर्ग, परवा सोमवारपासून सुरू करण्यास महापालिका प्रशासक डॉ. अस्तिककुमार पांडेय यांनी परवानगी दिली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचं लसीकरण झालेलं असावं, तसंच ज्या विद्यार्थ्यांना कोविड लसीची पहिली मात्रा मिळाली आहे, फक्त त्यांनाच शाळेत प्रवेश द्यावा, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये, असं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यातही फक्त इयत्ता दहावी तसंच बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी घेतला आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी आकाशवाणीशी बोलताना काल ही माहिती दिली. पुढील शुक्रवारी पुन्हा आढावा घेऊन शाळांचे इतर वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं शिक्षणाधिकारी बहिर यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यातल्या ग्रामीण तसंच शहरी भागात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग परवापासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परवानगी दिली आहे. कोविड लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचनांचं संबंधित शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसंच विद्यार्थ्यांनी पालन करावं, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, या दृष्टीकोनातून कामकाज करावं, अशा सूचना त्यांनी केल्या.

****

नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मान्यता दिली आहे.  कोविड- 19 च्या संदर्भात दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, तसंच १५ ते १८ वयोगटातल्या सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

****

लातूर जिल्ह्यातही शाळा सुरु कराव्यात यासाठी तयारी करावी, यादृष्टीनं मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन होईल, अशी व्यवस्था उभारण्याचे निर्देश, पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावेत अशी सूचना देशमुख यांनी केली आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचं, शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल ही महिती दिली. दहावीची परीक्षा १५ मार्चपासून तर बारावीची परीक्षा चार मार्चपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते चार मार्च दरम्यान, तर दहावीची परीक्षा २५ फेब्रुवारीपासून १४ मार्च दरम्यान होणार आहेत. गोसावी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले....

 

Byte….

ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनचं आपण घेत आहोत. विद्यार्थ्यांच लसीकरण यावेळी होत आहे. लसीकरणाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मला विद्यार्थ्यी, पालक आणि शिक्षकांना आवाहन करायच आहे. कोणताही संभ्रम न बाळगता, आपल्या विहित नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा होईल, असं आम्हाला वाटत. दुसरा मु्द्दा म्हणजे यावर्षी दहावीच्या परीक्षेला आमच्याकडे १६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आवेदन पत्र भरली आहे. तर बारावीच्या परीक्षेसाठी आमच्याकडे १४ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरली आहे. विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता, त्यापद्धतीने परीक्षेच्या नियोजनाचं कामकाज पूर्ण होत आलय.

****

सामाजिक न्याय विभागाची बंद केलेली वसतिगृहं कोरोनाविषयक नियमांचं पालन करत, पुन्हा सुरु करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्या-त्या जिल्ह्यातल्या कोरोना संसर्ग स्थितीचा आढावा घेऊन, स्थानिक प्राधिकरणाच्या निर्देश आणि समन्वयानं वसतिगृहे सुरू करावीत, असे निर्देश विभागाला दिल्याचं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून कळवलं आहे. वसतिगृहं बंद असल्यानं विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले १४४ नवे रुग्ण आढळले. यापैकी १३० रुग्ण पुणे जिल्ह्यातले, सोलापूर मधले आठ, तर बीड, परभणी, जळगाव, रायगड, सातारा आणि मुंबई इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता दोन हजार ३४३ झाली असून, यापैकी एक हजार १७१ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४८ हजार २७० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७४ लाख २० हजार २७ झाली आहे. काल ५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार २३ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९२ शतांश टक्के झाला आहे. काल ४२ हजार २९१ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७० लाख नऊ हजार ८२३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ६४ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल चार हजार ५१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार १४९ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ७५८, तर ग्रामीण भागातले ३९१ रुग्ण आहेत. लातूर जिल्ह्यात ७७१, नांदेड ७१९, परभणी ३७३, उस्मानाबाद ३२३, बीड २९५, जालना २८४ तर हिंगोली जिल्ह्यात १३७ रुग्णांची नोंद झाली. 

****

ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ८१ वर्षांचे होते. डेंग्यू आणि कोविड संसर्ग झालेले रायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर डेंग्यू संसर्गातून ते बरे झाले होते, गुरुवारी रात्री त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र काल पहाटे त्यांना श्वसनाचा त्रास झाला, त्यातच त्यांचं निधन झालं.

इंडियन एक्स्प्रेस समूहात प्रदीर्घ काळ पत्रकारिता केलेले रायकर, गेल्या अनेक वर्षांपासून लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. रायकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांनी शोक व्यक्त केला आहे.

****

राष्ट्रीय हरित लवादाने चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाच कोटी रुपये दंड ठोठावला आहे. चंद्रपूर इथले सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी औष्णिक केंद्राविरोधात एक याचिका दाखल केली होती, वीज केंद्रातल्या प्रदुषणावर आळा न घातल्यानं लवादाने ही कारवाई केली. प्रदुषणावर आळा घालण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करण्याचे आदेश देखील लवादाने दिले आहेत.

****

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ग्राहकांकरता, पाणीपट्टीच्या मूळ मुद्दलावरील विलंब आकार शुल्क माफीच्या सवलतीची अभय योजना, सरकारने राज्यभरात लागू केली आहे. पाणी पुरवठा तसंच स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल ही माहिती दिली. याबाबतचं परिपत्रकही पाणी पुरवठा विभागाकडून जारी करण्यात आलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी टप्प्या-टप्प्यानं पैसे भरावेत असं आवाहन, पाटील यांनी केलं आहे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान पाणीपुरवठा केंद्राच्या मागणीच्या आधारावर ही योजना आजपासून संपूर्ण राज्यात सुरु झाली आहे.

****


औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या कालव्यांचं व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने होण्याची गरज, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते काल मंत्रालयात कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. धरणाचे दरवाजे सेंट्रलाईज पद्धतीने उघडावेत, पाण्याची चोरी झाली तर त्याची माहिती तत्काळ मिळावी, मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवायचं असेल तर ही व्यवस्था आपल्याला करावीच लागेल, असंही पाटील यांनी नमूद केलं. या संकल्पनेबाबत जागतिक पातळीवर अभ्यास करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

****

एसटीच्या परभणी विभागात १४२ आंदोलनकर्ते कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे परभणी विभागातील परभणी, वसमत, पाथरी, गंगाखेड, जिंतूर, कळमनुरी या आगारातून काही बसच्या फेऱ्या सुरु झाल्या आहेत. काल बसच्या १५६ फेऱ्या झाल्या. त्यातून ४ हजार ८२६ प्रवाशांनी प्रवास केला.

****

पार्ल इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गडी राखून पराभव करत, तीन सामन्यांच्या मालिकेतही दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं निर्धारित षटकांत सहा गडी गमावत २८७ धावा करत, २८८ धावांचं लक्ष्य ठेवलं. दक्षिण आफ्रिकेनं हे लक्ष्य ४९व्या षटकात साध्य केलं. मालिकेतला अखेरचा सामना उद्या केपटाऊन इथं होणार आहे.

दरम्यान, टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जागतिक क्रिकेट संघटना - आयसीसीने जाहीर केलं आहे. ही स्पर्धा यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. भारतासह एकूण १० संघांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे.

****

लखनऊ इथं सुरु असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूने थायलंडच्या सुपानिडा कातेथोंग हिचा ११-२१, २१-१२,२१-१७ असा पराभव केला.

****

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर रिमोटच्या साहाय्यानं कापसाचं वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या टोळीला, वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथल्या प्राध्यापक डॉक्टरांनी, विविध मागण्यांसाठी काल आंदोलन केलं. सर्व अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवा नियमित कराव्यात, सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

औरंगाबाद शहरात कोविडची एकही लस न घेणाऱ्या एक हजार २६२ नागरिकांकडून महापालिका प्रशासनाने एकूण सहा लाख ३१ हजार रुपये दंड वसूल केला आहे. गेल्या महिनाभरात ही कारवाई करण्यात आली.

****

परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या पोहे टाकळी शिवारात, भरधाव   धावणाऱ्या एका ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्यालगत कोसळला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झाला.

****

छावा मराठा युवा संघटनेचे संस्थापक मिलिंद पाटील यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...