Saturday, 22 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं, त्या ७१ वर्षांच्या होत्या. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सकाळी त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; तिथेच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी फार मोठं योगदान दिलं. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. जवळपास सहा दशकांच्या आपल्या अभिनयाने आणि गायनाने त्यांनी रंगभूमीवर एक वेगळाच ठसा उमटवला होता. २०१८ मध्ये त्यांनी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

****

१८ वर्षांखालच्या मुलामुलींनी कोरोना प्रतिबंधक रोखण्यासाठी घ्यायची खबरदारी आणि त्यांच्यावर करायचे उपचार यासाठीचे सुधारित दिशानिर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल जाहीर केले. त्यानुसार पाच वर्षांखालच्या मुलांनी मास्क वापरला नाही, तरीही चालणार आहे. १८ वर्षांखालच्या मुलांसाठी अँटी व्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार पद्धतीचा वापर करण्याची गरज नाही, असंही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****


केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी मार्गदर्शक तत्वं जारी केली असून, त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. त्यानुसार येणाऱ्या प्रवाशांना तसचं सर्व विमान कंपन्यांना आणि देशातल्या प्रवेशाच्या प्रत्येक केंद्रावर कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. धोकादायक देशांमधून आलेल्या आणि कोविड पॉझिटिव्ह असणाऱ्या प्रवाशांचं नियमांनुसार विलगीकरण केलं जाणार असून, त्यांना विलगीकरण कक्षात दाखल होणं बंधनकारक राहणार नाही, असं या आदेशात म्हटलं आहे.

****

कोविन या कोविड लसीकरणाच्या संदर्भातल्या अॅपवर आता एकाच मोबाईल क्रमांकावरुन सहा जणांची नोंदणी करता येणार आहे. देशातल्या विविध भागातल्या आणि विविध श्रेणीतल्या लोकांचं लसीकरण वेगानं आणि विनासायास व्हाव यासाठी ही पद्धत विकसित केलं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...