Saturday, 5 February 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.02.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०५ फेब्रुवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हैद्राबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते हैद्राबादच्या पाटणचेरू इथल्या इक्रीसॅट म्हणजेच आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्थेला भेट देतील आणि संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या सोहोळ्याला सुरुवात करतील. संध्याकाळी पंतप्रधान हैदराबादमधला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ म्हणजेच “समतेचा पुतळा” राष्ट्राला समर्पित करतील. हा २१६ फूट उंच पुतळा अकराव्या शतकातील भक्ती संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ उभारला आहे.

****

जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर शहराच्या झाकुरा भागात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. लष्कर-ऐ-तैय्यबाच्या एका गटाशी हे दहशतवादी निगडीत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. यापैकी एक दहशतवादी अनंतनाग जिल्ह्यात एका हेड कॉन्स्टेबलच्या हत्येत सहभागी होता.

****

खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारनं तेल साठ्यावरच्या निर्बंधांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती. कमाल तेलसाठ्याचे निर्बंध ठरवण्याचे अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत.

****

पीएमसी अर्थात पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातला मुख्य आरोपी, बँकेचा माजी संचालक दलजीत सिंग बल याला, काल बिहारमधल्या रक्सौल इथं भारत-नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आली. तो सहा हजार ७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मुख्य आरोपी आहे. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन ग्रामीण रुग्णालयात कॅनपॅक इंडिया कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारलेल्या वैद्यकीय ऑक्सिजन प्रकल्पाचं काल जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झालं. ग्रामीण भागात उपचारासाठी हा प्रकल्प पूरक ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

****

परभणी महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या नवा मोंढा परिसरात प्लास्टीक बंदी अंतर्गत काल दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी चार दुकानांवर, प्लास्टिक कॅरीबॅग आढळल्यानं एकूण ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. व्यापाऱ्यांनी प्लास्टीकचा वापर करु नये असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...